सांगावा - मनोगत
सुमारे चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या माझ्या “काव्यदीप” या काव्यसंग्रहानंतर आज “सांगावा” हा दुसरा काव्यसंग्रह सादर
करताना मला अतिशय आनंद होत आहे. वाचकांकडून “काव्यदीप”ला मिळालेल्या अभिप्रायांमुळे मला नव्या कविता
करण्यास उत्साह आला. माझ्या आईच्या प्रेरणेनेच “काव्यदीप”च्या लेखनाला स्फूर्ती मिळाली. तर स्वत: झिजून दुसऱ्याला सदैव आनंद देणाऱ्या माझ्या अत्यंत प्रेमळ सासूसासऱ्यांच्या स्मृती ही माझी “सांगावा”ची प्रेरणा ठरली
आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला पाठविलेला निरोप म्हणजे “सांगावा” आहे.
एखाद्या विषयावर कविता लिहू म्हणून ती लिहिली जात नाही. तर मनाला भिडणाऱ्या एखाद्या प्रसंगातून वा एखाद्या
गाण्याच्या भावणाऱ्या लयीतून तिची निर्मिती होते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षाच्या काळात अशाच
प्रसंगानुरूप तयार होत गेलेल्या या कवितात काव्यगुण कितपत आहेत हे मला ठाऊक नाही. पण माझ्यासाठी मात्र प्रत्येक
कविता ही एकेक भावसंबंधाची चिरंतन स्मृतिठेव बनली आहे.
माझ्या बहुतेक कविता ह्या घरगुती स्वरूपाच्या आहेत. पण जे मी मनापासून अनुभवले, मनात घर करून बसले तेच
शब्दातून उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ही कविता जुन्या धाटणीची आहे. पण गेयता ही तिच्यात ठासून
भरली आहे. कविता वाचल्यावर वाचकाला जेवढी भावते त्याहून अधिक ती गाऊन दाखविल्यावर श्रोत्यांच्या मनाला भिडणारी होते अशी माझी धारणा आहे. मी माझ्या आवाजातील सी. डी. (कोणत्याही बाह्य संगीताची जोड नसलेली) या
संग्रहाबरोबर देत आहे. म्हणूनच ही सी. डी. म्हणजे 'सांगावा'चे अंग बनले आहे.
'काव्यदीप' व 'सांगावा' ह्या संग्रहातील कविता 'मायमराठी डॉट कॉम या वेबसाईटवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच वेबसाईटवर इतर कवींसाठीही त्यांच्या कविता आवाजासह प्रसिद्ध करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'सांगावा' चे समर्पक मुखपृष्ठ आमची स्नुषा सौ. मधुरा हिने मोठ्या उत्साहाने करून दिले आहे. तसेच ज्ञानदीपमध्ये काम करणाऱ्या सर्व संगणक तंत्रज्ञांचे विशेषतः श्री. सुशांत यडगूळकर व श्री. अमोल भोकरे यांचे अनमोल साहाय्य लाभले आहे. या प्रकाशनाच्या निमित्ताने मला गुरुस्थानी असलेल्या श्रीमती मालतीबाई किर्लोस्कर यांचीही मी ऋणी आहे.
हा नवीन काव्यसंग्रह वाचून आपला अभिप्राय ज्ञानदीपकडे पाठविल्यास पुढील पाऊल टाकण्यास मोलाची मदत होईल. धन्यवाद.
सौ. शुभांगी सु. रानडे
सांगली.
१४ ऑगस्ट २००६