चाल एकला

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

चाल एकला ऽऽ चाल एकला
चाल एकला रे मना चाल एकला . . .॥ध्रु.॥

कोणी न येती तुज सावरण्या
सारे टपले निंदा करण्या
ऐकू नको त्याजला
ऐकू नको त्याजला रे मना चाल एकला ... १

कष्टाची तू करी ना क्षिती
यशोवेली ही फुले निश्‍चिती
यत्नचि हो सुफला
यत्नचि हो सुफला रे मना चाल एकला .. . २

विरोध सारे तुजला करिती
उपरोधे मग हासुनि बघती
मानी न तू त्याला
मानी न तू त्याला रे मना चाल एकला .. . ३

कदाचित्‌ त्या पुढच्या वळणी
संधि उभी ती तुझिया पुढती
घेऊनि वरमाला
घेऊनि वरमाला रे मना चाल एकला . . . ४

सशापरी तू धरी ना गती
कूर्माची त्या धरी संगती
देवचि साहाय्याला
देवचि साहाय्याला रे मना चाल एकला... ५

कुतूहले मग विचारताती
कैसी झाली इतुकी प्रगती
सांगा आम्हाला
सांगा आम्हाला रे मना चाल एकला ... ६

प्रगती पाहूनी हर्ष होऊनी
तुजसाठी मग येई धावूनी
जग हे मदतीला
जग हे मदतीला रे मना चाल एकला ... ७

रीत जगाची ऐसी आहे
विचार परि तू करूनी पाहे
क्षमा करी त्याजला
क्षमा करी त्याजला रे मना चाल एकला . .. ८

Hits: 89
X

Right Click

No right click