काव्यदीप - अर्पणपत्रिका
अर्पण
आई म्हटले म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नेहमी - पांढरी शुभ्र नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, एका हातात घड्याळ, बेतशीर उंची, सावळा वर्ण, सतत अनवाणी चालण्याने भेगाळलेले पाय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चेहऱ्यावरील जिद्द, तेजस्वी व बाणेदार डोळे असलेली तिची मूर्ती उभी राहते.
शालेय शिक्षण इयत्ता ४थी पर्यंतच झालेले. परिस्थितीने स्वतःला शिक्षण घेता आले नाही तरी आपल्या मुलांना मात्र सुशिक्षित करायचेच ही जिद्द. तिच्या लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे 'उकसाण' या कामशेतजवळच्या खेडेगावी गेली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला आली. सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतील एका खोलीत स्वत:च्या हिंमतीबर संसार सुरू केला. नर्सिंग कोर्स केला आणि ताराचंद रामनाथ हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. अनंत अडचणी येत होत्या. भरीत भर म्हणजे अकाली आलेले वैधव्य. पण ती खचून गेली नाही. डगमगली नाही. स्वत:च्या एकटीच्या खांद्यावर संसाररथाची धुरा समर्थपणे पेलली. संसाररथातील प्रवासी म्हणजे आम्ही पाच मुले. केवळ मुलांनाच शिक्षण देऊन ती थांबली नाही तर नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तिने सहजी पार पाडली.
हे सारे करताना तिने कधीही कोणासमोर हात पसरला नाही. लाचारी पत्करली नाही. प्रचंड स्वाभिमान व लागतील तेवढे कष्ट करण्याची तयारी. 'कंटाळा' हा शब्द तर तिच्या शब्दकोशातही नव्हता. आणि म्हणूनच ताराचंद हॉस्पिटलमध्ये ३५ वर्षे सलगपणे नोकरी केली. दिवसपाळी, रात्रपाळी असे. पण तिचे वैशिष्ट्य म्हणजे २१ वर्षे रात्रपाळी केली. सदाशिव पेठेतील आमचे घर ते ताराचंद हॉस्पिटल हा पल्ला काही थोडा नव्हता. ती कायम चालतच जात-येत असे. बस तिला ठाऊक नव्हती. रिक्षाचे तर नावच सोडा. पण यामुळे शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा आजार तिच्या जवळ सुद्धा
फिरकला नाही. चालत जाता-येता न चुकता कविता तिच्या सोबतीला यायची. संकटकाळी तर ती हमखासपणे कवितेला साद घालायची. तिची कविता मनाला भिडणारी, ऐकणाऱ्याचे काळीज हेलावून सोडणारी होती. कारण ती कविता प्रत्यक्ष धगधगत्या जीवनातून फुलून आली होती. बहुतेक कविता प्रसंगांच्या किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने सहजगत्या प्रकट व्हायच्या. तिच्या कवितेत आशयघनता किती असायची हे सोबत दिलेल्या देहाची नाव' या तिच्या कवितेवरून आपणास कळून येईल. अशा परमेश्वरस्वरूप आईला 'काव्यदीप ' हा माझा पहिलावहिला काव्यसंग्रह मी प्रेमपूर्वक अर्पण करत आहे.
---सौ. शुभांगी रानडे
काव्यदीप - प्रस्तावना
॥श्री॥॥
पसायदान
प्रिय सौ. शुभांगीताई
विश्रामबाग, सांगली.
स. न.
तुम्ही अत्यंत अगत्याने व विश्वासाने तुमच्या कविता मला वाचण्यासाठी दिल्यात या तुमच्या आपुलकी व जिव्हाळ्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. कवितांसंबंधी माझ्या मनात आलेले काही विचारतरंग आपल्यापुढे ठेवीत आहे.
तुमची साधीसुधी, भावनोत्कट कविता मला मनापासून आवडली. साऱ्याच फुलांना गुलाब, रातराणी किंवा निशिगंध-कुंद-बकुळीच्या फुलांसारखा वास असतोचं असे नाही. पण प्रत्येक फुलाला ('सदाफुली' सारखे काही अपवाद वगळता ) त्याचा म्हणून एक मनमोहक, गोड वास असतो. लेखकाच्या लेखनाचेही तसेच असते ना? तुमची कविता अगदी सहजस्फूर्त आहे. म्हणून तिच्यातले अनेक विषय (आई, मुरली, चैत्रगौर, बाग, ईश्वर, मुले इ.) सुपरिचित व दैनंदिन असले तरीही त्यांच्यात एक ताजेपणा, टवटवीतपणा आहे. स्त्रीचे (विशेषत: भारतातल्या) जग अनुभवाच्या दृष्टीने अजून फार विस्तृत झालेले नसल्याने तिच्या कवितांचे विषय तिचा संसार, घर, परिसर यांच्याशीच निगडित राहणार यात अस्वाभाविक असे काही नाही.
मला तुमच्या कवितातून एक अतिशय कृतज्ञ, सश्रद्ध, सुसंस्कृत शालीन, विनीत अशा आणि भक्तिभावपूरित, नाजूक, हळुवार मन असलेल्या प्रेमळ स्त्रीचे जे दर्शन झाले त्यामुळे मला एक गुणी मैत्रीण मिळाल्याचा आनंद वाटला. ही कवयित्री मैत्रीण लहान मुलांतही विशेष रमते ('आज्जी ग आजी', 'ड्रायव्हर', 'खिरापत' इ.). ते स्वाभाविक वाटते कारण लेखिकेचे मनही निरागसच राहिले आहे. ते तसे ठेवणे ही संसारातली फार अवघड गोष्ट आहे. काव्यदीप चार परमेश्वर, कुटुंबातली वडीलधारी मंडळी यांच्याबद्दलची तिची आदराची भावना अतिशय प्रांजल व आज दुर्मिळ असल्याने त्या कविता एक वेगळेच शांत समाधान देतात.
'वेलीबरची फुले', 'राऊळ' (फार छान), 'याद' (साधी पण मनाला भिडणारी), 'तुळस' (घरच्या कष्टाळू आतिथ्यप्रिय गृहिणीला दिलेली सुरेख उपमा), 'सोनुला' (वात्सल्याचे हृदयंगम चित्र), 'बाग' (चांगले वर्णन), 'तीच' (छोटीशी पण बोलकी), 'तिळगूळ' (कल्पना नवीन), 'स्मृतिसुमने', 'काव्यदीप' (आईजवळ झोपण्याची भावना डोळ्यांना पाणी आणते), 'मराठी माऊली' (चांगली कल्पना), 'पुसू नको', आणि 'पूर्तता' (काव्यनिर्मितीची प्रक्रिया. हा विषय अनेक कवींचा आवडता. कारण ती भावस्थिती अवर्णनीयच असते.) अशा अनेक कविता मला भावल्या. 'फटका' हा काव्यप्रकार स्त्रियांनी फारसा हाताळलेला दिसत नाही. तथापि तुमच्या 'नक्को नक्को ' या कवितेत अशा “फटका' या काव्यप्रकाराच्या लिखाणात तुम्ही चांगले यश मिळवलेले दिसते. त्यातून व्यावहारिक शिकवणही मिळते.
कल्पनाविलासात एक आगळेच सौंदर्य असते. अलंकारांनी स्त्री जशी अधिक सुस्वरूप दिसते तशीच कविताही अलंकारांनी दिसते. तुमच्या कवितेत अलंकारांचा सर्रास वापर दिसला नाही. अर्थात मुद्दाम ते घालण्याचे कारणही नाही. बालकवींची कविता 'फुलराणी', 'निर्झरास', 'अरूण' इ. त्यातल्या कल्पनाविलासामुळेच सुदीर्घकाळ मनात रेंगाळतात. तुमच्या कवितेतील भावनांचे सच्चेपण आणि सहजस्फुरणाची शक्ति हाच गुणविशेष अधिक महत्वाचा आहे.
असाच हात सदैव लिहिता ठेवावा. जुन्या कर्वींच्या काव्यसंग्रहाप्रमाणेच नवनवे काव्यसंग्रह पण वाचत रहावे.
आपली
मालतीबाई शं. किर्लोस्कर
काव्यदीप - मनोगत
हा काव्यसंग्रह आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. देवाघरी जाताना माझ्या आईने दिलेल्या आपल्या काव्यधनातील थोडासा भाग माझ्याकडे आला असावा असे मला वाटते. कारण 'काव्यदीप'मधील जवळजवळ सर्व कविता मी तिच्या मृत्यूनंतर लिहिल्या आहेत; नव्हे तिने माझ्याकडून लिहून घेतल्या आहेत.
खरं म्हणजे मला स्वप्नात सुद्धा बाटलं नव्हतं की कवितेच्या प्रांतात आपल्याला प्रवेश करता येईल. आणि अशा माझ्याकडून एकापाठोपाठ एक कविता लिहिल्या जाव्यात यामागे तिची प्रेरणा हेच सर्वात महत्वाचे कारण असावे असे मला वाटते. आपल्या प्रत्येकालाच अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. अनुभव जसाच्या तसा लिहिणे म्हणजे डायरी किंवा रोजनिशी लिहिण्यासारखे होय. अनुभव मनात पुन्हापुन्हा घोळवला गेला की त्यातील व्यक्तींचे संदर्भ गळून पडतात आणि केवळ भावनांचा आशय लोण्यासारखा तरंगून वर येतो. वस्तूंचे निखळ वर्णन म्हणजे कविता नव्हे अशी आपली माझी समजूत आहे. कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यातून, भावनांचा ओलावा घेऊन आलेले शब्दांचे एकसंध, एकात्म मिश्रण होय. दूध तापवताना जसे कधी कधी उतू जाते तशी एखादी कल्पना मनात भरून ओसंडू लागली की ती कागदावर उतरविण्याची ऊर्मी अनावर होते. मनाला भावलेल्या कल्पनेला आपोआपच गाण्याचे वळण लागते. माझ्या सर्व कविता याच प्रकारच्या आहेत.
काव्यविश्वात माझे मन पार बुडून जाते. क्षणभर भोवतालच्या सर्व गोष्टींचा विसर पडतो. त्योळी मनाला जे सुख, समाधान, आनंद मिळतो त्याची सर कशालाच येणार नाही. मला मिळालेला हा आनंदाचा ठेवा मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना वाटून देत आहे.
तसे पाहिले तर माझे अनुभवविश्व मर्यादित आहे. आणि म्हणूनच नातेसंबंध, भक्ती याबद्दल अनेक कविता लिहिल्या गेल्या. मन तितके कणखर नसल्याने, मनाच्या हळवेपणामुळे साधारणत: प्रत्येक कवितेला कारुण्याची झालर लागली जाते. का कोणास ठाऊक पण राजकारण, समाजकारण यासारख्या विषयांनी माझ्या मनाचा ठाव घेतला नाही. त्यामुळे ते कवितेचे विषय बनू शकले नाहीत. माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे. तेव्हा काव्यगुणांच्या दृष्टीने त्या किती सरस उतरल्या आहेत हे मला ठाऊक नाही. भावनेला धक्का न लावता ती शब्दबद्ध करताना शब्दांना कचित् बोजडपणा आलेला असेल. पण आपण सर्वजण मोकळ्या मनाने त्यामागची भावना समजून घ्याल अशी आशा आहे.
कवितालेखनाचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. खरं म्हणजे कवितेच्या विषयाला बंधन, वर्गवारी नसते. पण मायमराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर ह्या सर्व कविता घातल्या आहेत आणि संगणकशास्त्राप्रमाणे त्याची वर्गवारीही केली
आहे. म्हणून पुस्तकछपाईच्यावेळीही तीच पद्धत बापरली आहे. वाचकांनी या काव्यसंग्रहावरील आपले अभिप्राय विनासंकोच कळवावेत. त्याचा मला फार उपयोग होईल.
या पुस्तकाच्या कामात अनेकांचे सहकार्य लाभले. टायपिंगच्या कामात श्री. नितीन वैद्य यांची मदत झाली. तसेच श्री. अमोघ कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ काढून दिले. छपाईचे काम गजानन मुद्रणालय यानी योग्य रीतीने, वेळेवर करून दिले. त्याबद्दल या सर्वांची मी ऋणी आहे.
हे मनोगत लिहिताना 'मला, माझे, मी 'अशी “म 'च्या बाराखडीतील शब्दांचा वरचेबर आधार घेतलेला दिसतो असे कोणासही सहजपणे वाटेल. पण खरं सांगायचं तर अहंकारप्रदर्शनासाठी या शब्दांची योजना केलेली नाही. तेव्हा कृपया गैरसमज नसावा. मनातले विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी या 'म ' च्या बाराखडीचा प्रपंच करावा लागला याबहल क्षमस्व.
सौ. शुभांगी सु. रानडे
“ज्ञानदीप ', विजयनगर,
शिल्परचिंतामणी सोसायटी,
वानलेसवाडी (सांगली ४१६ ४१४)
६ डिसेंबर २००२
देहाची नाव
पुराणी नाव पुराणी नाव
देवा हिला तिराला लाव --- ध्रु.
अवेळी तिजला बुडवू नको रे
कार्य संपता उचल मुरारे
मम हाकेला धाव
देवा हिला तिराला लावा --- १
सुत स्नुषा हे संपत्तीचे
तनु थकल्यावर कुणी न कुणाचे
प्रेमाचा अभाव
देवा हिला तिराला लावा --- २
बुद्धिहीन मी असे बापुडी
तब नामाची कळली गोडी
चरणाशी दे ठाव
देवा हिला तिराला लाव --- ३
ध्यान तुझे मम हृदयी राहो
नाम मुखाने अखंड येवो
अमर करी तू नाव
अपुले अमर करी तू नाव
देवा हिला तिराला लाव --- ४
- यशोदाबाई शिंत्रे
सौ. शुभांगी रानडे यांच्या मातोश्री