आजच्या युवापिढीसाठी नवे अर्थशास्त्र

Parent Category: मराठी पुस्तके Category: पुस्तक परिचय Written by सौ. शुभांगी रानडे
लहानपणापासून आपल्या मनावर श्रीमंत होण्यासाठी खूप अभ्यास करणे अत्यावश्यक आहे हे बिंबविलेले असते. मात्र प्रत्यक्षात बहुतेक वेळा आपल्याला अभ्यासात फारशी प्रगती न केलेली माणसेच श्रीमंत झालेली दिसतात. हे असे का याचे कोडे आपल्याला उलगडत नाही. याचे कारण म्हणजे  जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे खरे अर्थशास्त्रच आपल्याला ठाऊक नसते.

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या  रिच डॅड पुअर डॅड ( Rich Dad Poor Dad) या जगप्रसिद्ध पुस्तकात मोठ्या मनोरंजक गोष्टीच्या स्वरुपात या अर्थशास्त्राची ओळख करून दिली आहे. पुस्तक वाचल्यानंतर भारतातील नोकरी की उद्योग या संभ्रमात पडलेल्या  युवा पिढीला यातून चांगले मार्गदर्शन मिळेल असे मला जाणवले. मराठी वाचकांसाठी त्याचा मतितार्थ पुढे देत आहे.

रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात अमेरिकेतील श्रीमंत आणि गरीब वडील असणार्‍या दोन शाळकरी मुलांची गोष्ट आहे. प्रत्यक्षात दोघांची आर्थिक स्थिती उत्तम आहे.  तरीदेखील एकाला श्रीमंत व दुसर्‍याला गरीब संबोधण्यामागे लेखकाचा उद्योजक व नोकरदार यांच्यातील आर्थिक स्थितीतील फरक दाखविण्याचा उद्देश आहे.

आत्मकथनाच्या स्वरुपात रॉबर्ट कियोसाकी यांच्या जीवनातील अनुभव शेरॉन लेश्टर लेखिकेने या पुस्तकात मांडले आहेत. पुस्तकाचा नायक एका प्रतिथयश विद्वान प्रोफेसरचा मुलगा आहे. नऊ वर्षाच्या या मुलाला त्याच्या उच्चशिक्षित आईवडिलांकडून ‘नियमितपणे चांगला अभ्यास कर. उत्तम मार्काने पास हो. पुढे उच्च शिक्षण घेतलेस की तुला उत्तम नोकरी मिळेल व जीवनात तू सुखी होशील’ असे सांगितले जाई. पण या मुलाला जेव्हा असे दिसते की शाळेतला त्याचा मित्र माईक याचे वडील फारसे शिकलेले नसूनही आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून श्रीमंत होण्याची विद्या मिळविण्याचे तो ठरवितो.

माईकचे वडील छोटे उद्योजक असतात. त्यांचे ऑफिस अगदीच साधे कामचलाऊ स्वरुपाच्या इमारतीत असते. ही दोन्ही मुले त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटतात व श्रीमंत होण्याचा मार्ग विचारतात. माईकचे वडील म्हणतात. मी ते शिकवीन पण त्याबदलात तुम्ही माझ्याकडे काम करावयास हवे. मोठ्या उत्साहाने शाळा सांभाळून शनिवार रविवार यादिवशी ते इतर कामगारांप्रमाणे काम करू लागतात. दिवसाच्या कामाचे वेतनही त्यांना दिले जाते. मात्र माईकचे वडील महिनाभर झाला तरी त्यांना भेटतच नाहीत. रॉबर्टचे वडीलही म्हणतात तुमच्या कामाच्या मानाने पगारही अगदी तुटपुंजा आहे.  ते तुमची पिळवणूक करीत आहेत. 

रॉबर्ट शेवटी धाडस करून माईकच्या वडिलांना भेटतो व विचारतो की आम्हाला तुम्ही काहीच शिकविले नाही आमच्याकडून काम मात्र करून घेत आहात. आणि पगारही खूपच कमी आहे. ते हसतात व म्हणतात. ‘आता खरे तुमचे शिक्षण सुरू झाले आहे. तुमच्या पगारात मी वाढ करतो. पुन्हा नंतर भेटू. ’ काही शिक्षण न होताच वाढीव पगारावर काम चालू रहाते. 

थोडे दिवसांनी रॉबर्ट कंटाळतो व त्यांच्याकडे जाऊन आपली चीड व्यक्त करतो व नोकरी सोडत असल्याचे सांगतो. त्यावेळी माईकचे वडील त्याला सांगतात. ‘आता तुझ्या शिक्षणातील महत्वाचा टप्पा पार पडला आहे. मला तुझे कौतुक वाटते की तू इतर कामगारांसारखा पगारवाढीची मागणी न करत नोकरी सोडण्याचा विचार करीत आहेस. प्रत्यक्षात बहुतेक सर्व लोक अधिक पगाराची नोकरी हाच श्रीमंतीचा मार्ग आहे असे समजतात व उंदरांच्या धावण्याच्या स्पर्धेप्रमाणे ठराविक मर्यादेतच धडपड करीत राहतात. याउलट उद्योजक किंवा भांडवलदार हे स्वतः अगदी काम करतात. मात्र पैसा मिळविण्याचे काम त्यांनी उभारलेल्या उद्योगातील कर्मचारी वा घातलेल्या भांडवलामार्फत केले जाते.

नोकरदार मिळालेले पैसे अनुत्पादक गोष्टी म्हणजे घर, गाडी वा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरतात. त्यासाठी बॅंकांकडून दिलेल्या कर्जाचा व क्रेडिट कार्डचा वापर करतात.  या गोष्टी त्यांना गुंतवणूक वाटते. मात्र घर व गाडीचे कर्ज फेडण्यासाठी बॅंकांचे ते कायम कर्जदार बनतात. शिवाय पगारवाढीबरोबर सरकारी करांचा बोजाही त्यांच्यावर पडतो. त्यामुळे पगार वाढला तरी त्याप्रमाणे खर्चही वाढत जातो व कर्ज फेडीचे दायित्व त्यांना श्रीमंत होऊ देत नाही.

 याउलट उद्योजक चैनीसाठी खर्च न करता ज्यामुळे उत्पादन वाढेल अशा यंत्रसामुग्रीत वा कुशल कामगार नेमण्यासाठी कर्ज काढतात. या कर्जातून संपत्तीची निर्मिती होते. उद्योजकाच्या खिशाला या्ची चाट बसत नाही. भांडवलदार आपले पैसे फायद्याच्या उद्योगात गुंतवितात व त्यातून श्रीमंत होतात.’

भारतात आज नोकरीसाठीच मुख्यत्वे शिक्षण घेतले जाते. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकर्‍या मिळण्याची शक्यता असणार्‍या व्यावसायिक शिक्षणासाठी पालक प्रचंद खर्च करण्यास मागेपुढे पहात नाहीत. विद्यार्थीही परिक्षेत जास्त मार्क मिळण्यासाठी कसून अभ्यास करतात. तरी नोकरी हवी असणार्‍या युवकांच्या प्रचंड संख्य्च्या मानाने उपलब्ध नोकर्‍या अगदी कमी असल्याने बहुतेकांची निराशा होते व कमी पगारावर खालच्या दर्जाची नोकरी स्वीकारणे किंवा आणखी शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी एमबीए वा स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करीत वेळ पैसा घालवतात.

 अशावेळी उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी लागणारे अर्थशास्त्र वेगळ्या पद्धतीने शिकविण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे.

 प्रस्तुत लेखकानॆ रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाच्या यशानंतर कॅशफ्लो क्वाड्रंट (Cash Flow Quadrant) या नावाचे दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले व सर्वांना सहज हे खरे अर्थशास्त्र शिकण्यासाठी एक खेळ विकसित केला आहे. 
Hits: 147
X

Right Click

No right click