Parent Category: मराठी पुस्तके
Category: पुस्तक परिचय
Written by सौ. शुभांगी रानडे
स्वतः समाजवादी असूनही रशियातील स्टॅलिन राजवटीतील विदारक सत्य लोकांसमोर आणण्यासाठी जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने ‘अॅनिमल फार्म’ या नावाची रुपक कथा १९४३ मध्ये लिहिली. मात्र त्यावेळी रशिया नाझी जर्मनीच्या विरुद्ध असल्याने इंग्लंड, अमेरिकेत स्टॅलिनची राजवट लोकप्रिय होती व कोणीही ते पुस्तक छापण्यास तयार होईना. दुसर्या महायुद्धानंतर ते छापले गेले.
अॅनिमल फार्म ही कथा इंग्लंडमधील मिस्टर जोन्स नावाच्या शेतकर्याच्या फार्ममध्ये असणार्या प्राण्यांच्या क्रांतीविषयी आहे. या फार्ममध्ये गाई, घोडे, डुकरे, कुत्री असे अनेक प्राणी असतात. आपण कष्ट करतो पण आपला मालक आयता बसून खातो व आपल्यावर हुकुमत गाजवतो हे मनोर नावाचे वृद्ध रानटी डुक्कर सर्वांना सांगते व ही सत्ता झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचा सल्ला देते. त्याप्रमाणे सर्व प्राणी एकत्र होऊन मालकाला पिटाळून लावतात.
नेपोलियन नावाचे डुक्कर त्यांचा नेता बनते. पण तेही हुकुमशहासारखे वागून स्वतः चैन करते व पोलिस कुत्र्यांच्या मदतीने इतर सर्व प्राण्यांवर जुलूम करते. त्याच्या राजवटीची भलावण करत स्क्वीलर हे हुशार डुक्कर आपल्या प्रचार यंत्रणेचा वापर करून सर्व प्राण्यांना नेपोलियनच त्यांचा उद्धारकर्ता आहे व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यातच त्यांचे कसे हित आहे हे पटवून देते. सर्व प्राणी समान आहेत पण त्यातले काही प्राणी जास्त समान आहेत हे नवे तत्व उदयास येते.
मिस्टर जोन्स पुनः फार्मवर कबजा करण्यासाठी येतो त्यावेळी स्नोबॉल हे उदारमतवादी डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून तो प्रयत्न हाणून पाडते. मात्र स्नोबॉल आपल्याला प्रतिस्पर्धी होईल या भितीने नेपोलियन त्याच्या सुधारणांना विरोध करून त्याच्यामागे त्याचे कुत्री सोडून त्याला फार्ममधून पळवून लावतो. त्याची सत्ता मग पूर्वीच्या स्थितीपेक्षाही अधिक वाईट आहे हे इतर प्राण्यांच्या लक्षात येते.
कथेचा शेवट फार मार्मिक केला आहे. नेपोलियन व त्याचे साथीदार दारु पीत व जुगार खेळत बसलेले इतर प्राण्यांना खिडकीतून दिसते. ही आपल्यातली डुकरे आहेत की पूर्वीच्या मालकाची माणसे आहेत असा त्यांना संभ्रम पडतो.
राज्य भांडवलशाही असो, साम्राज्यवादी असो वा समाजवादी विचारसरणीचे असो, राजकीय सत्तेतून भ्रष्टाचार कसा जन्माला येतो आणि खॊटे तत्वज्ञानही लोकांच्या गळ्यात उतरवण्यास भाषा व प्रचारयंत्रणा कशी साहाय्यभूत ठरते. हे या रुपकाचे सार आहे.
(Animal Farm’s commentary on the corruptive nature of political power and the power of language as a tool of ideology and control rings so true that it continues to play out in the political world as a sort of self-fulfilling prophecy.)
Hits: 112