Parent Category: मराठी पुस्तके
Category: पुस्तक परिचय
Written by सौ. शुभांगी रानडे
‘Far from the madding crowd’ (गर्दी व कोलाहलापासून दूर) या शीर्षकाचे थॉमस हार्डीचे पुस्तक मी पाहिले तेव्हा त्यात काय असेल याविषयी माझ्या मनात कुतुहल निर्माण झाले.
यापूर्वी मी ‘Two on a Tower’ ( मनोर्यावरील दोघे) ही याच लेखकाची कादंबरी वाचली होती.
अवकाशातील तार्यांचे संशोधन करणारा स्विदिन व त्याच्यावर प्रेम करणारी व्हिवियन या दोघांच्या व्यक्तिचित्रणावर आधारलेली व आकाशदर्शनाची दुर्बीण असणार्या मनोर्याची पार्श्वभूमी असणारी ती कथा कादंबरीच्या नावाला साजेशी होती. तसेच काहीसे या नव्या कादंबरीत मला वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. माझी त्याबाबतीत थोडी निराशा झाली मात्र कादंबरीच्या नावाने मात्र मला विलक्षण भुरळ घातली.
माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ते Monk who sold his Ferrari हे पुस्तक. मानसिक तणावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपली संपत्ती सोडून हिमालयात जाणार्या माणसाची कथा त्यात सांगितली आहे. पूर्वी याच कारणासाठी आत्मज्ञानाचा शोध घेण्यासाठी साधु संन्यासी वनात वा लोकवस्तीपासून दूर जात असत.
गर्दी आणि कोलाहल यांनी माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे.सकाळी उठल्यापासून वर्तमानपत्रे, रेडिओ व दूरदर्शन यातील भडक बातम्या व जाहिराती यांचा मारा सुरू होतो. गडबडीने सर्व आवरून कामावर जायचे म्हटले की रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. बस स्टॉपवरील वा रेल्वे तिकिटांसाठी रांगा, बस वा लोकलमधील गर्दी नेहमीची असतेच. पण मोर्चे, रास्ता रोको, सभा वा नेत्यांचे दौरे असले की अशा प्रवासातही बराच मनस्ताप होतो.कामावरून येतानाही यापासून सुटका नसते. जेवणाचा डबा असला तर ठीक अन्यथा हॉटेल वा ठेल्यावरही गर्दी चुकत नाही. संध्याकाळी फिरायला वा देवळात जायचे म्हटले तरी तेथेही हातगाड्या, खेळ व खाद्याची दुकाने व माणसांची वर्दळ असतेच मार्केटिंगला जायचे म्हटले की झगमगाट करणार्या दिव्यांनी उजळून निघालेल्या दुकानातूनच फिरावे लागते. कामावरून घरी आले की टीव्ही आपली वाटच पहात असतो. रात्री झोपेपर्यंत तो आपल्याला सोडत नाही.
वर उल्लेखिलेली गर्दी व त्यामुळे होणारा मानसिक तणाव शहरी माणसाला अंगवळणी पडला आहे. शहरातील माणसे एखाद्या यंत्रातील भागाप्रमाणे बिनतक्रार असे तणाव सोसत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी जाऊन ते मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करतात.
मला ज्या गर्दी व कोलाहलाबद्द्ल काळजी वाटते त्याचा वरील भौतिक पातळीवरील गर्दी व कोलाहलाशी काही संबंध नाही. आज राजकीय व समाजजीवनात फार वेगाने स्थित्यंतरे होत आहेत. पक्ष व निष्ठा सोयीनुसार बदलल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांतून संस्कारक्षम, विधायक बातम्यांऎवजी अन्य भडक बातम्यांना व विषयांना अवास्तव महत्व दिले जात आहे व दुर्दैवाने समाज अशा कल्लोळात गुरफटला जाऊन भोगवादी व आत्मकेंद्रित बनत चालला आहे. सौहार्द, सहसंवेदना, प्रेम, आदर, विश्वासार्हता यांना वैयक्तिक जीवनात महत्व उरलेले नाही. आदर्श लोप पावत आहेत. ‘सर्वे गुणाः कांचनमाश्रयंती’ या उक्तीप्रमाणे पैसा व सत्ता असणारे लोकच आपले कल्याण करू शकतात हा समज दृढ होत आहे.
स्वार्थ, परस्पर हेवेदावे, भ्रष्टाचार, जुलूमजबरदस्ती व विध्वंसक कारवाया यामुळे समाज कधी नव्हे एवढा अस्थिर, असुरक्षित व विघटित झाला आहे.
लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली तरी माणसे एकमेकांपासून दूर गेली आहेत. अपघात झाला, एखादा भूकबळी गेला, एखाद्याने आत्महत्या केली, कोठे आग लागली तर भोवताली मदतीसाठी गर्दी जमत नाही तर असलेली गर्दी विखरुन जाते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरही गुन्हेगारीचा शिक्का बसला की समाज त्या माणसाचे सारे गुण व कर्तृत्व विसरून त्याला प्राण्याहून हीन वागणूक देत आहे. चोरीत सापडलेल्यांना वा अपघात करणार्यांना वा मोर्चा काढणार्या लोकांना वा शासकीय नियम पाळणार्या अधिकार्यांना निर्दयपणे मारहाण करताना समाजाला माणुसकीचा विसर पडतो आहे.
भ्रष्टाचाराखाली बड्या नेत्यांना व अधिकार्यांना अटक झाल्याच्या बातम्या आवडीने वाचणारी व त्यावर तासन् तास गप्पा मारणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात वा व्यवहारात पैसे देणे व घेणे निषिद्ध समजत नाहीत.त्यामुळे या चर्चा, मुलाखती, मेळावे व आंदोलने, बातम्या आणि भांडणे म्हणजे समाजाला शाश्वत जीवनमूल्यांपासून दूर ठेवण्यासाठी केलेला अर्थहीन कोलाहल वाटतो.
अशा गर्दीपासून व कोलाहलापासून दूर गेले तरच मनाला खरी शांतता मिळेल. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शांततेसाठी अशा जागाच नाहिशा होत आहेत व माणसेही तेथे जाण्यास सुरक्षेच्या कारणास्तव घाबरत आहेत. वाघसिंहांपेक्षा माणसांचीच भिती त्यांना वाटत आहे.
Ayn Rand च्या Atlos Shrugged या कादंबरीत ज्याप्रमाणे सर्व सृजनशील माणसे भ्रष्ट व स्वार्थी समाजापासून दूर जाऊन त्यांचे वेगळे विश्व तयार करतात व त्याचा परिणाम उरलेल्या समाजाचे सारे जीवनव्यवहार ठप्प होण्यात होतो हे दर्शविले आहे. त्याप्रमाणे सध्याच्या काळात ज्याला काही विधायक कार्य करायचे असेल, ज्ञान संपादन करायचे असेल वा नवनिर्मिती करायची असेल त्याने या कोलाहलापासून
स्वतःला शरिराने शक्य झाले नाही तरी मनाने दूर रहावयास हवे.
Hits: 142