उपोद्धात - १२

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

मराठ्यांशी पहिलें युद्ध सुरू झाल्यानंतरच्या वर्षे सहा महिन्याच्या अवधीत इंग्रनांनी जे लेख लिहिले आहेत, त्यांत मराठ्यांचे राज्य केवढे, त्यांची फौज किती छत्रपति, पेशवे, भोसले, गायकवाड, शिंदे, होळकर यांत तारतम्याने कोणाचे महत्व किती, त्यांचे परस्पर संबंध कोणते, त्यांची घरगुती भांडणे कशाबद्दलची, कोणास काय मिळालें असतां तो आपणास अनुकूल होण्याचा संभव आहे, इत्यादि तपशील- वार माहिती बहुधा बिनचूक लिहिलेली आढळते. पण याचें आश्चर्य मानण्याचे कांही कारण नाही. कारण, यावूर्वी पुष्कळ दिवसांपासून या हिंदुस्थान देशाचें राज्य हप्त्या हप्त्याने आमच्या पदरांत पडणार आहे, अथी सुखस्वप्ने इंग्रजांस पडू लागली होती. त्यातल्या कर्त्या माणसांचे चिंतन यांच विषयावर नेहमी चाललेले होते. एक पुस्तक आम्ही पाहिलेले आहे. ते एका इंग्रजाने अठराव्या शतकांत लिहिलेलें आहे. त्याचा विषय हिंदुस्थानचे राज्य कसे घ्यावें हाच आहे. अर्थात या विषयावर त्या काळांत दुसरी पुष्कळ पुस्तकें व निबन्ध टिपणें वगैरे लिहिलेली असतीलच. त्या वेळी या देशांत मिशनर्‍्यांचा फैलाव नव्हता. परंतु फिरस्ते व व्यापारी इंग्रज शेकडो होते. ते प्रत्येक प्रांतांत फिरत. त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रवासवर्णनांत शहरे, किल्ले, मार्ग, लोकरिवाज स्थानिक राजकारणे सर्व कांहीं बारीकसारीक माहिती आस्थेने लिहून ठेवलेली असे व ती कंपनी सरकारच्या उपयोगी पडे. कांही तरी निमित्त काढून लष्करी अम्मलदार प्रवास करीत तेव्हां मिलिटरी खात्याच्या उपयोगाची माहिती गोळा करीत व मोठमोठया देशी राजांच्य़ा दरबारांतून जे इंग्रज वकील होते, ते राजकारणाची सर्व माहिती मुख्याधिकाऱ्यांकडे लिहून पाठवत. इंग्रज लोक शोधक बुद्धीचे आहेत व विद्यार्जनाचा त्यांचा हव्यास दांडगा आहे. वेद शास्त्रे स्मृती पुराणे वगैरे ग्रंथांची सर माहिती त्यांनी हिंदुस्थानचे अधिराज्य मिळविण्या आ्धींच गोळा केली होती. पेशवाइंच्या अखेरपर्यंत सवे बाजूंचे ज्ञान संपादन करण्याचा त्यांचा उद्योग एकसारखा सुरू होता. सन १८०३ साली नॉक्स या नांवाचा इंग्रज म्हैसुराहून पुण्यास जात असतां मिरजेस थोडा वेळ मुक्काम करून राहिला होता. पण तितक्याही धांदलाीत त्यानें मिरजेच्या जहागीरद!रास पत्र लिहिले की ' तुम्हांस जहागीर कधी कोणीं दिली, तिचे उत्पन किती, तुमच्या घराण्यातल्या लोकांनी पेशवे सरकारच्या कोणकोणत्या कामगिऱ्या केल्या. या सव गोष्टींची मेहेरबानीने तारखेसह लिहून मला द्याल तर यी आभारी होईन.

अशा तरतरीत चौकस स्वभावाच्या इंग्रज लोकांशी लढण्याची मराठ्यांवर पाळी आली; पण त्यांस या इंग्रज लोकांविषयी कांहींच माहिती नव्हती. या लोकांचा मूळ देश कोण, हे येथें कशाकरिता आले, यांची पहिली वसाहत कोठची, मागून कोणकोणत्या बंदरांत त्यांना वसाहती केल्या, यांचा स्वभाव गुणदोष कोणचे, यांची राज्यवस्था ब सैन्य्यवस्था कशी, यांचें सैन्यबळ व द्रव्यबळ किती, इत्यादि मुद्यांची माहिती मराठी मुत्सद्यांनी ब सरदारांनी अवश्य मिळवावयास पाहिजे होती; पंरतु आमच्या आळसामुळें व हलगर्जीपणामुळें आमच्या राजकारणाचे हें अंग नेहमी लुळें पडे. एकट्या नानाने मात्र इंग्रजांविषयी कांही सटरफटर माहिती गोळा केली होती व ती बातमी फार चांगली राखीत होता असे त्याच्या लेखांवरून दिसतें. एरवी पहावे तो चोहोकडे गाढ निद्राच लागलेली होती. इंग्रज लोक किती आहेत व कोठून येतात हें ठाऊक नसल्यामुळें त्यांची दहशत मराठ्यांच्या मनावर उगीचच्या उगीच बसली होती. इंग्रजांशी लढाई सुरू असता बातम्या येऊं लागल्या काी, इंग्रज मुंबईकडून आले, त्यांचा गुजराथेंत धुमाकूळ सुरू आहे, कांही मद्रासेकडून जलमार्गाने येत आहेत, कांही हैदराशी लढत आहेत, काही यमुना उतरून काल्पी- वर चालून येत आहेत. अशा चोहोकडच्या बातम्यांनी भांबावून गेलेला एक सरदार त्रासून लिहितो की, ' हे शिंदळीचे इंग्रज आहेत तरी किती. जेथे तेथे तेच उद्भवतात हें काय आहे न कळे' ? अशा बिकट परिस्थितीत सुद्धां नानाने इंग्रजांच्या कारस्थानांवर ताण करून त्यांस हातटेकीस आणले; तह करण्याविषयी त्यांनी मराठ्यांची आर्जवे करूं लागावे असली स्थिती उत्पन्न केली, याबद्दल त्याची वाहवा होत असते ती योग्यच आहे. सालबाईच्या तहांत इंग्रजांस साष्टींचा टापू मिळाला हा कांही त्यांनी पांचसात वर्षे मोठें नुकसान सोसून चालविलेल्या युद्धाचा योंग्य मोबदला नव्हे.

सालबाईच्या तहानंतर पेशवाईच्या अखेरपर्यंत इंग्रज ब मराठे यांचे राजकारणाचे सामने पुष्कळ वेळां झाले, व लढायाही पुष्कळ झाल्या. ह्यांत जे वैगुण्य मराठ्यांस नेहमी जाचत असे ते हेच काी, त्यांस इंग्रजांची कांह्री एक बातमी कळत नसे. घरभेदे हे केव्हांही कोठेही झाले तरी असायचेच; पण पेशवाईत त्यांचा सुळसुळाट फारच झाला होता. मराठी फौजांचे बेत व हालचाली इंग्रजांस नेमक्या कळाव्या व त्यांची बातमी मात्र यांस कांहीच कळूं नये, असें नेहमी होत असे. इंग्रजांच्या जातीचा एकही घरभेद्या मराठ्यांस कथी भेटू नये हे केवढें आश्चर्य आहे.

इंप्रजांची राहणी व भाषा निराळी. त्यांचे रिवाज व शिस्त निराळी. ते कारणाशिवाय आम्हांशी बोलतसुद्धां नाहीत.. मग आम्हांशी मिळूनमिसळून वागायचे दूरच राहिले. त्यांच्या अंगी जात्याभिमानाचा ताठा असल्यामुळें हिंदी लोकांशी फटकून वागणेंच त्यांना आवडतें. त्यामुळे त्यांचे बेत बातम्या सर्व कांही त्यांचें त्यांच्यांत राहते; बाहेर फुटत नाही. त्यांची कोणतीही बातमी मराठ्यांस न कळण्याचें मुख्य कारण हेंच होय. पण याबरोबरच त्यांच्या संबंधाच्या खोठ्या बातम्या पसरण्यास ह्या इंग्रजांचा एकलकरीपणा कारण होता हेंही ध्यानांत ठेवलें पाहिजे.

शिंदे व भोसले यांचा पराजय झाला तरी यशवंतराव होळकराच्या पराक्रमावर मराठ्यांचा फार विश्वास होता. त्यामुळें होळकराचें व इंग्रजांचे युद्ध जुंपलें तेव्हा होळकरांची जागोजाग फत्ते झाल्याच्या बातम्या पुण्याच्या बाजारांत नेहमी पसरत होत्या. या बातम्यांत अतिशयोक्ति व विसंगतपणा फार असे व उत्तर हिंदुस्थानांतून पत्रे येत त्यांत त्या लिहिलेल्या असत, खुद्द पुण्यांतल्या पुण्यांत ज्या बातम्या उडत त्यांतल्याही कांही कांहीं फारच विचित्र असत. उदाहरणार्थ, पुढील मासला पहाः-
' होळकरानें गोरे लोक धरले, त्यांपेकी तीन लोक नाके कापून सोडून दिले. त्यांतले दोनशे येथे पुण्यास आले. तेव्हां येथल्या इंग्रजांनी त्यांस विलायतेस रवाना करण्याकरितां मुंबईस पाठविलें. हे नकटे विलायतेस जातील तर आपली इज्जत जाईल व आपणास शिक्षा होईल या भयाने मुंबईवाल्यांनीं त्या लोकांस गलबतांत घालून समुद्रांत नेऊन बुडविले !

असल्या बातम्यांवर विचारी माणसांचा विश्वास बसणें दुर्घट होते. पण सामान्य लोकांस मात्र त्या खऱ्या भासत असल्या पाहिजेत असे वाटतें. होळकरांच्या लढाईत इंग्रज फार जेर झाले असून संकटांत पडले आहेत अशी बातमी पटवर्धनांचा वकील पुण्यास होता तो त्यास नेहमी लिहून पाठवी. एका पत्रांत ' डाकेबरोबर सावकारी वर्तमान आलें. अश्वदल ( होळकर ) यांची प्रबलता जलचर (इंग्रज ) पेचांत आहे. ऐसे लिहिले आहे. शिंदे यांची पत्नें छ.- ९ साबानची आली त्यांत वर्तमान लिहिलें आहे त्यांत अतिबलवत्ता अश्वदळांची लिहिली आहे. लील (लॉल लेक) साहेबाची पलटणे बुडविली; दहाबारा पलटणें घेऊन यमुनापार लखनौकडे जात होता. त्यांस भोवती घेरा पडला, असे लिहिलें आहे. 'इतके लिहून सदरहू वकील इंग्रजांच्या घरी शोध घेऊन तेथील बातमी प्रत्यंतरादाखल लिहितो ती अशी:--' छ. १६ रमजानी इंग्रजांकडील डाक आली. जेवावयाला जात होते. इतकियात डांक येऊन दाखल जाहली, सबब तीनचार असामी फरशीबर बसोन डाकेवे तीन फर्द पाहिलेवर डोईची टोपी काढून भूमीवर आपटली. नेत्राश्रु पतन करू लागले. चौकीदार वगैरे होते त्यांस दूर दूर उभें केले. सारेजण जमा होऊन खुरशांवर बसोन कौशल होऊन नंतर एक इंग्रजाने एक अधिकारियास हाती धरून उठविले. ' वकिलानें कोणा बुटलेरास शेपन्नास रुपे देऊन इंम्रजांच्या घरची म्हणून विकत घेतलेली ही बातमी आपल्या धन्यास लिहून कळविली. तिने त्या धन्याचे कितपत समाधान झालें असेल हें जाणणे आम्ही वाचकांवरच सोंपवितो.'

आमचा पुणे-सातारा इंग्रजांनी का घेतला आणि त्यांचा मद्रास--कलकत्ता आम्ही कां घेऊं शकलो नाहीं, याचा संक्षेपाने येथपर्यंत विचार केला. देशाभिमानशून्यता, समूहरूपानें कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची संवय, इत्यादि दुर्गुण आमच्या समाजाच्या अंगी जे खिळले आहेत तेच आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. असल्या दुर्गुणांनी खिळखिळे झालेले कोणतीही पौरस्त्य राष्ट्र सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्राची बिरोध प्राप्त झाला असता टिकाव धरूं शकत नाही. हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते. तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहांत पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असतां त्यांतले कोणतें फुटावयाचें, मातीचे की लोखंडाचें, हे ठरलेलेंच आहे. हल्लीचा काळ असा आला आहे कीं, आम्ही पाश्चात्त्यांची बरोबरी तरी करावी, नाहीं तर त्यांचे मजूर तरी होऊन रहावें. राजकारण, उद्योगधंदे, कलाकौशल्य, भौतिक शास्त्रांचा उपयोग, प्रत्येक गोष्टींत हीच स्थिति आहे. जर आम्हांस पाश्चात्यांची बरोबरी करण्याची हिंमत असेल तर या लेखांत वर्णिलेले आमचे दुर्गण आम्ही टाकले पाहिजेत. पूर्वी स्वराज्य होतें तें याच दुर्गुणांमुळें गेलें हे समजून जर आम्ही सावध झालों नाहीं, तर नवीन स्वराज्य मिळून सुद्धां व्यर्थच आहे, हाच इतिहास डिंडिमाचा घोष प्रत्येकाच्या कानी घुमत राहिला पाहिजे.

वासुदेव वामन खरे, मिरज,ता. ८-३-१९१८. | मराठे आणि इंग्रज - न. चिं. केळकर

Hits: 151
X

Right Click

No right click