७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

जनजागृती

नानासाहेब गोरे यांनी राज्यसभेत निर्भयपणे आणीबाणी वर टीका केली आणि लोकशाही पुन्हा प्रस्थापित करावी, अशी आग्रहाने मागणी केली. एस्‌. एम्‌. त्या वेळी खेड्यापाड्यांत जाऊन आणीबाणीसंबंधीचे विचार लोकांना समजून सांगत. एकदा सासवडजवळच्या एका खेड्यात ते गेले आणि त्यांनी इंदिरा गांधोंचे सरकार अन्याय कसा करते ते सांगितले. सभा संपल्यावर एक शेतकऱ्याने एस्‌. एम्‌. ना घरी चहा प्यायला बोलाविले, म्हणून ते त्याच्याकडे गेले. तो शेतकरी एस्‌. एम्‌. ना म्हणाला 'आम्हांला तुमचं म्हणणं पटतं पण तुम्ही लोक पन्नास पक्षांत वाटलेले आहात, त्यामुळे तुम्हांला मत देऊन उपयोग होत नाही. त्यामुळे दारुडा नवराही बाईला खपवून घ्यावा लागतो, तसं आमचं झालंय. तुम्ही थोडी आशा दाखवली की काँग्रेसचा पराभव होऊ शकेल, तर आम्ही तुम्हांला मत देऊ.' एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या आत्मकथेत हा अनुभव सांगून शेवटी लिहिले आहे. 'एका चहाच्या कपाबरोबर केवढी चालना दिली त्या शेतकऱ्याने माझ्या विचारांना. मी त्याचे प्रबोधन करायला गेलो होतो. पण मीच प्रबोधित होऊन आलो. आणीबाणी घालवायची असेल तर आपल्याला असे काही करावे लागेल या दिशेने माझ्या विचारांना चालना मिळाली.' एस्‌. एम्‌. आणि नानासाहेब गोरे हे दौरे काढून नागरिकांचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजे, असे सांगत. कार्यकर्तें या बैठका आयोजित करीत. शहरात सभा घेणे शक्‍य होत नसे.

अणीबाणीला सहा महिने झाल्यावर, एस्‌. एम्‌. नानासाहेब, डॉ. मंडलिक आणि प्रभुभाई संघवी यांनी, ज्या कुटुंबांतील मिळवत्या पुरुषाला 'मिसा'खाली तुरूंगात डांबण्यात आले होते, त्या कुटुंबांत प्रापंचिक खर्चासाठी दरमहा पैसे पाठविण्याचा निर्णय घेतला. अशा मदतीसाठी फक्त 'साधना' आणि 'भूमिपुत्र' या वर्तमानपत्रांतून आवाहन केले गेले. एस्‌. एम्‌., गोरे, आचार्य वि. प्र., लिमये, दादा धर्माधिकारी यांनी हे आवाहन केले आणि काही मित्रांना पत्रे लिहिली. लागलीच मदतीचा ओघ सुरू झाला. पैसे गोळा करणे, ते योग्य ठिकाणी पोहोचविणे, पैशांचा हिशोब ठेवणे ही कामे प्रभुभाई संघवी, लालजी कुलकर्णी, वामन भिडे, एकनाथ कोपर्डे, राजा चिंबुलकर आदींनी चोखपणे केली. एस्‌. एम्‌. म्हणाले, 'आपण हे केले पण जेलमध्ये आपल्या मित्रांची बौद्धिक भूकही आपण भागवली पाहिजे. त्यांना वाचण्यासाठी पुस्तके पाठवली पाहिजेत.' हे काम राष्ट्र सेवादलाचे विठूभाऊ वैद्य आणि त्यांची मुलगी मीना यांनी नियमाने केले. बंगलोरच्या तुरुंगात मधु दंडवते, एस्‌. एन्‌., मित्रा, लालकृष्ण अडवाणी ही मंडळी होती. दंडवत्यांना खूप पुस्तके हवी असायची. विठूभाऊंनी ती सारी पाठवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनाही विठूभांऊनी पुस्तके पाठविली,

पुण्यातील एक प्रकाशकही या योजनेत हवी ती पुस्तके पाठवीत. एस्‌. एम्‌. आणि गोरे लखनौ, पाटण्यापासून देशातील सर्व प्रमुख तुरुंगांतील राजबंद्यांना भेटून आले. एस्‌. एम्‌. नेहमी म्हणत, "आम्हां राजकीय कार्यकर्त्यांचे एक कुटुंब आहे असे मी आयुष्यभर मानले." एस्‌. एम्‌. या आपल्या राजकीय कुटुंबीयांना सतत आधार देत, सल्ला देत, कधी त्यांची वडीलकीच्या नात्याने कानउघडणीही करीत, म्हणूनच कार्यकर्त्यांना ते आधारवड वाटत. आणीबाणीत आम्हां सर्वांना याचा उत्कट अनुभव आला.

५ नोव्हेंबर १९७५ला जयप्रकाशजींचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १२ नोव्हेंबरला त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आणि २३ नोव्हेंबरला मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. डॉ. मंडलीक एस्‌. एम्.ना म्हणाले, 'जयप्रकाशजी फार दिवस जगतील असे मला वाटत नाही.' एस्‌. एम्‌. ना हे ऐकून मोठा धक्काच बसला. जसलोकमधील डॉक्टरांचे हेच निदान होते. परंतु आठवड्यातून तीन दिवस 'डायलेसिस' करून हे कसेबसे वाचले. जे. पीं. च्या मू्त्रपिंडाचे कार्य पार पाडण्यासाठी यंत्र विकत घ्यायचे ठरले. एस्‌. एम्‌. आणि त्यांचे सहकारी यांनी ६ लाख रुपये जमविले. इंदिण गांधींनी ९० हजार रुपयांचा ड्राफ्ट पाठविला. एस्‌. एम्‌., जे. पी.ना म्हणाले, 'आपण हे पैसे स्वीकारू नयेत, असे मला वाटते,' जयप्र्काशजींनी त्यांचा सल्ला ऐकला. त्यांनी इंदिरा गांधींना आभाराचे पत्र लिहिले आणि पंतप्रधान निधीतील या पैशाचा उपयोग नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करावा, असेही लिहिले.

जयप्रकाशजी आजारी असताना काही सर्वोदयवाद्यांनी सत्याग्रहाची चळवळ मागे घ्यावी, असे सुचविले. तेव्हा एस्‌. एम्‌. आणि गोरे यांनी या सूचनेला विरोध केला. त्या दिवाशी संध्याकाळी एस्‌. एम्‌ आणि नानासाहेब गोरे, जयप्रकाशजींकडे गेले, तेव्हा जे. पी. म्हणाले, "एसेम, आप सुबह कह रहे थे की हम लोगों को कुछ करना चाहिये। मगर मै आपसे वह पूछना चाहता हँ कि इंदिराजी तो डेमॉक्रसी नही चाहती तो हमारा कोई कर्तव्य है या नही?" एस्‌. एम्‌. यावर म्हणाले, "आपले कर्तव्य जरूर आहे. आपण उपक्रमशीलता दाखवून आपल्या बाजूने त्यांना एक पत्र लिहावे." नानासाहेब गोऱ्यांनी पत्राचा मसुदा तयार केला आणि जयप्रकाशजींनी तो मान्य केला. त्यात त्यांनी लिहिले होते, 'मी एकटा काही चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला मदत केली, त्यांच्यापैकी काहींना मला भेटावे लागेल.' जयप्रकाशजींनी नंतर कोणाला भेटले पाहिजे, त्या नावांची यादी दिली. जयप्रकाशजींनी आपण होऊन पत्र पाठविले, परंतु इंदिरा गांधींच्याकडून पत्राची साधी पोचही आली नाही,१६-१७-१८ जानेवारीला १९७७ जयप्रकाशजींनी पाटण्याला बैठक घेतली. बैठकीत एस्‌. एम्‌., नानासाहेब गोरे आणि शंभर एक सर्वोदयवादी कार्यकर्ते आले होते. बैठकीचा निर्णय असा झाला की, दोन महिने दौरे करून सत्याग्रही नोंदवावयाचे आणि दोन महिन्यांनी पुन: सत्याग्रह मोहीम सुरू करावयाची. एस्‌. एम्‌. सभा आटोपून घरी आले आणि जयप्रकाशांनी त्यांना सांगितले को, मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे इंदिराजींनी आकाशवाणीवरून जाहीर केले. एस्‌. एम्‌. यावर आनंदाने म्हणाले, 'तर मग आपली योजना यशस्वी झाली असेच म्हणावयास हवे. कारण आपण नव्याने सत्याग्रह करण्याचे ठरवीत होतो. आता ते करण्याचे कारणच नाही. आपण निवडणुकीद्वारेच सरकारशी लढू.'

X

Right Click

No right click

Hits: 136
X

Right Click

No right click