७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - १
एस्. एम्. जोशी आणि जयप्रकाश हे जिवाभावाचे मित्र होते. एस्. एम्. यांना जयप्रकाशजींच्या बदल प्रेम आणि आदर वाटे. त्याचबरोबर ते योग्य वेळी जयप्रकाशजींना सुनावीतही असत. १९७२ साली देशातील भ्रष्टाचाराबद्दल जयप्रकाशजींनी तीव्र असमाधान व्यक्त करणारे लेख लिहिले. शासनावर त्यांनी कठोर टीकाही केली. त्यामुळे अनेक तरुणांना भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करावे असे वाटू लागले. ११ सप्टेंबर १९७३ला मुंबईला 'मणिभवन'मध्ये भरलेल्या सभेत जयप्रकाशजींना उद्देशून एस्. एम्. म्हणाले, "जयप्रकाशजी, आपणाला पक्षविरहित अशी लोकशाही या देशात यावी असे वाटते. ती जेव्हा केव्हा अवतरणार असेल तेव्हा अवतरो. पण तूर्तास, जी लोकशाही अस्तित्वात आहे ती ठीक रहावी असे आपणाला वाटते की नाही? वाटत असेल तर ती ठीक ठेवण्यासाठी आपले काही कर्तव्य उरते. देशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे इशारे आपण करता आणि मग त्यांचे नेतृत्व करण्यासाठी मात्र जाग्यावर नसता. लेख लिहून आपण लोकांना जागृत केल्यावर त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी, अशी माझी आपल्याला विनंती आहे."
एस्. एम्. यांनी या भाषणात जयप्रकाशजींना जे खडे तात्विक बोल ऐकविले त्याचा योग्य तो परिणाय झाला. एस्. एम्. यांना काय म्हणायचे आहे ते जयप्रकाशजींच्या लक्षात आले आणि त्यांनी जनआंदोलनाचे नेतृत्व करावयाचा निर्णय घेतला. १९७४ साली गुजरातेत विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन करायचे ठरविले. तांदुळाची चोरटी निर्यात होत होती. मुख्यमंत्री चिपमणभाई पटेल यांनी तेलगिरण्यांचे राष्ट्रीयीकरण लांबणीवर टाकण्यासाठी काही लाख रुपये घेतले, असा जाहीर आरोप केला जात होता. कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भोजनखर्च एकाएकी तीस टक्क्यांनी वाढला. त्यामुळे ते एकदम बिथरले. ही अशांत परिस्थिती पाहून गुजरातमधील ज्येष्ठ सर्वोदयी नेते रविशंकर महाराज यांनी जयप्रकाशजींना तिकडे बोलावून घेतले. युवाशक्तीचा आविष्कार जयप्रकाशजींना दिसल्या, तेव्हा त्यांनी गुजरातेतील, युवकांना भ्रष्टाचाराविरुद्ध व्यापक आंदोलन करण्यास सांगितले. आंदोलन सर्वत्र पसरले. चिमणभाई पटेलांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभाही विसर्जित झाली.
जन आंदोलन
त्याच सुमारास बिहारमधील वेगवेगळ्या राजकीय प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. तेथील कॉंग्रेस शासनाने हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी लाठीमार आणि गोळीबार केला. तेव्हा विद्यार्थी, गफूर सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करू लागले. जयप्रकाशजींनी तरुणांना अहिंसक आंदोलन करण्याचा आदेश दिला. ८ एप्रिल १९७४ला पाटण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या अभूतपूर्व अहिंसक शांती मोर्चात बिहारमधील ख्यातनाम लेखक, कवी, विचारवंत आणि कलावंत सामील झाले. १९७४च्या एप्रिलमध्ये रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप जॉर्ज फनॉँडिस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. ५ जूनला निघालेल्या पाटण्यातील अहिंसक मूक मोर्चावर इंदिरा ब्रिगेडच्या लोकांनी गोळीबार केला. या छर्रेबाजीचा आचार्य विनोबा भावे यांनी निषेध न केल्यामुळे जयप्रकाशजी फार अस्वस्थ झाले.
या वेळी एस्. एम्. सतत जयप्रकाशजींबरोबर होते. ते दोघेजण वर्षा येथील सर्व सेवा संघाच्या संमेलनास गेले. सर्वोदयाच्या नेत्यांमध्ये मतभेद झाले. एस्. एम्. म्हणाले, 'अन्याय आणि भ्रष्टाचार, या विरुद्ध लढावयास आम्हांला महात्मा गांधीनीच शिकवले. जयप्रकाशजी आज तरुणांना तेच सांगत आहेत.' सर्व सेवा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत होईना. तेव्हा आचार्य विनोबा भावे म्हणाले, 'ज्यांना कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी जायचे असेल त्यांनी पाटण्यास जावे. ज्यांना युद्ध कराववाचे नसेल त्यांनी सर्वोदयास वाहून घ्यावे.' एस्. एम्. यावर म्हणाले, "आम्ही आता पाटण्यास जाऊन जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन सुरू करणार आहोत."
१९७५च्या फेब्रुवारी महिन्यात जयप्रकाशजींनी विरोधी पक्षांच्या सर्व पुढाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांनी एस्. एम्. यांना लिहिले, 'या बैठकीस तू येणे आवश्यक आहे' एस्. एम्. प्रथम दिल्लीस गेले आणि १५ फेब्रुवारीस पाटण्यात विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीस हजर राहिले. जयपक्राशजींनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार विरोधी लढा करावा, असे सांगितले. तेव्हा चौधरी चरणसिंग आणि अन्य काही नेत्यांनी विनंती केली की, जयप्रकाशजींनी पुढाकार घेऊन तेथे जमलेल्या सर्व पक्षांना. आपापले पक्ष बरखास्त करावयास लावावेत आणि सर्वांचा मिळून एक पक्ष बनवावा. यावर जयप्रकाशजी म्हणाले, 'हे माझे काम नाही. हे सर्व तुमचे राजकारण आहे. मला केवळ राजकीय लढा द्याववाचा नाही. मला समाजपरिवर्तन करावयाचे आहे.' एस्. एम्. यांनी जयप्रकाशजींच्या भूमिकेस पाठिंबा दिला. बैठकीहून पुण्यास परत आल्यावर एस्. एम्. यांनी 'साधना' या साने गुरुजींनी सुरू केलेल्या साप्ताहिकात लिहिले की, समाजपरिवर्तनाच्या चळवळीला केवळ सत्तासंघर्षाचे रूप आले तर आपले उद्दिष्ट सफल होणार नाही. एस् एम्. यांनी त्या लेखात लिहिले, "जे. पी.चे ध्येय विरोधी पक्ष उभा करणे, हे नाही, त्यांना तो उपद्व्याप करायला सांगणे म्हणजे ज्या रांजणाला तळाशी छिद्र आहे तो भरायला सांगण्यासारखे आहे. इंदिराबाईंच्या राज्यातील भ्रष्टाचाराला जयप्रकाशजींचा आणि माझा विरोध आहे. या अध:पाताला त्या जबाबदार आहेत. परंतु केवळ त्यांना सत्तेवरून हटवून समाजपरिवर्तन होणार नाही, हे विसरू नका.'
जयप्रकाश नारायण यांनी ६ मार्चला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. मोर्चाच्या प्रचारासाठी एस्. एम्. दिल्लीत गेले. चंद्रशेखर आणि मोहन धारिया हे दोघेही काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जयपक्राश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या भूमिकेस पाठिंबा दिला. तेव्हा इंदिरा गांधींनी २ मार्चला धारियांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. ६ मार्चचा मोर्चा फारच प्रचंड होता. या मोर्चाने जनतेच्या मागण्यांची सनद लोकसभेला आणि राज्यसभेला सादर केली.
Hits: 148