६. समाजवादी चळवळीची वाटचाल - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

समाजवादी पक्षातील फाटाफूट

१९५२च्या निवडणुकीतील पराभवानंतर अशोक मेहतांनी समाजवादी पक्षासमोर त्यांचा नवीन राजकीय सिद्धांत मांडला. अशोक मेहतांचे म्हणणे असे होते की, अविकसित देशातील मागास अर्थव्यवस्थेमुळे काही गोष्टीं अपरिहार्य ठरतात आणि त्यांच्यांतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकारारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकमत होणारी क्षेत्रे शोधून त्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याने काम करून देशाचा विकास साधला पाहिजे. अशोक मेहतांच्या या भूमिकेला डॉ. लोहिया आणि मधू लिमये यांनी कडाडून विरोध केला. डॉ. लोहिया यांच्या मते विरोधी पक्ष म्हणून समाजवादी पक्षाने काँग्रेस विरोधाची धार अधिकाधिक तीव्र केली पाहिजे. समाजवादी पक्ष जर काही बाबतीत काँग्रेसशी सहकार्य करू लागला तर त्या पक्षाच्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही आणि समाजवादी पक्षाला काही दिवसांनी काँग्रेसमध्ये विलीनच व्हावे
लागेल. अशोक मेहता आणि डॉ. लोहिया यांच्यात तीव्र वैचारिक मतभेद असले तरी प्रजासमाजवादी पक्ष फुटू नये असे एस्‌. एम्‌. जोशी आणि गोरे यांना वाटत होते. परंतु हे दोघेजण असा समझौता पक्षात घडवून आणू शकले नाहीत. ते प्रजासमाजवादी पक्षातून बाहेर पडून डॉ. लोहिया, मधू लिमये, विनायकराव कुलकर्णी आदींनी समाजवादी पक्ष स्थापन केला आणि त्याचे कार्य सुरू केले. अशोक मेहतांवरील डॉ. लोहिया यांची टीका कटू वाटली तरी अशोक मेहतांच्या भूमिकेमुळे प्रजासमाजवादी पक्षाच्या कार्यावर विपरीत परिणाम झाला हे कटू सत्य होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीही अशोक मेहता आणि एस्‌. एम्‌. यांच्यामध्ये मतभेद झाले.

मुंबईच्या समाजवादी पक्षामध्ये बहुसंख्य कार्यकर्त्यांनी एस्‌. एम्‌. यांच्याच भूमिकेस पाठिंबा देऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यात हिरिरीने भाग घेवला. १९६३ साली अशोक मेहतांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि डॉ.लोहिया यांचे भाकित खरे ठरले. यानंतर प्रजासमाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांची एकजूट होऊन संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन झाला. परंतु हे ऐक्यही अल्पकालीन ठरले. १९६५ साली वाराणसी अधिवेशनात पुन्हा फूट पडून प्रजासमाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष एकमेकांपासून दूर झाले. एस्‌. एम्‌. जोशी आणि ना. ग. गोरे हे शाळेपासूनचे एकमेकांचे मित्र. यूथ लीगमध्ये दोघांनी बरोबर काम केले आणि स्वातंत्रय लढ्यातही दोघांनी बरोबरच उडी घेतली. दोघांच्या विचारांवर मावर्सच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला आणि दोघांनीही १९३४ साली समाजवादी पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. १९४२च्या चले जाव आंदोलनात एस्‌. एम्‌. आणि गोरे या दोघांनाही ब्रिटिश सरकारने महाराष्ट्र कटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी केले होते. कारावासातून दोघांची बरोबरच सुटका झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ साली जेव्हा समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला तेव्हा दोघेही समाजवादी पक्षाचे पदाधिकारी झाले.
१९५४ साली गोरे यांनी गोव्यात सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एस्‌. एम्‌. यांनी त्यांना पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्र समितीने निवडणुका लढविण्याचे ठरविले त्या वेळी गोरे गोव्याच्या तुरुंगात होते. तरी देखील एस्‌. एम्‌. यांनी गोरे यांना पुण्यातून लोकसभेसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला. गोरे सुटून आले आणि निवडणुकीत गोरे लोकसभेवर आणि एस्‌. एम्‌. विधानसभेवर निवडून आले. १९६५ पर्यंत दोघेजण एकत्र होते. परंतु बनारसला मात्र एस्‌. एम्‌. जोशी यांनी पक्षात फूट पडत्ता कामा नये, अशी भूमिका घेऊन प्रजासमाजवादी पक्षातील नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै आदींना पक्षातून बाहेर पडू नये असे आग्रहाने आणि आर्जवानेही सांगितले. गोरे यांचे म्हणणे असे होते की डॉ. लोहिया यांची 'नॉन काँग्रेसिझम' ही भूमिका आणि तिच्यामुळे जनसंघ आणि कम्युनिस्ट यांच्याबरोबर आघाडी करण्याच्या त्यांचा पवित्रा प्रजा समाजवादी पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांना अमान्य होता. एस्‌. एम्‌. यांचे म्हणणे होते को धोरणविषयक मतभेद एकत्र बसून संपविता येतील. परंतु गोरे यांना ते मान्य झाले नाही आणि प्रजासमाजवादी व संयुक्त समाजवादी पक्ष एकमेकांपासून दूर झाले. एस्‌. एम्‌. जोशींनी संयुक्त समाजवादी पक्षातच राहण्याच्या निर्णय घेतला. त्या वेळी त्यांच्या प्रजा समाजवादी पक्षातील सहकाऱ्यांना फार वाईट वाटले. परंतु फूट टळू शकली नाहो. समाजवादी चळवळीतली ही अत्यंत दुर्देवी घटना झाली. महाराष्ट्रात या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या फाटाफुटीमुळे तीव्र दुःख झाले. समाजवादी पक्षातील या फाटाफुटीनंतर एस्‌. एम्‌. आणि नानासाहेब गोरे एकमेकांपासून दूर होऊन दोन समाजवादी पक्षांचे अध्यक्ष झाले, यावर विशेषत: महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी कठोर टीका केली. एका मान्यवर संपादकांनी त्यांच्या या विषयावरील अग्रलेखाचा शेवट पुढील संस्कृत श्लोकाने केला,

यथा काष्ठंच काष्ठं च
समेयातां महोदधौ ॥
समेत्य च व्यपीयाताम्‌
तद्रत्‌ भूतसमागम:॥

Hits: 119
X

Right Click

No right click