६. समाजवादी चळवळीची वाटचाल - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

समाजवादाला नवी दिशा

डॉ. लोहिया यांनी मांडलेल्या या विचारांनी एस्‌. एम्‌. फार प्रभावित झाले. ते. एकदा कार्यकर्त्यांच्यासमोर भाषण करताना म्हणाले, 'आम्ही एका वेळी ठोकळेबाज मावर्सवादी होतो. उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची केली की समाजवाद येईल असे आम्हांला वाटत होते. डो. लोहिया १९४६ साली ज्या वेळो 'आपण मार्क्सच्या पलीकडे गेले पाहिजे' असे म्हणाले त्या वेळी त्यांच्या म्हणण्यातून आपण गांधीजींच्या विचारांचीही दाखल घेतली पाहिजे, इतकेच उमगले. परंतु लोहियांच्या पंचमढीच्या भाषणामुळे माझ्या विचाराला नवी दिशा मिळाली. भारतात बेकारीचा प्रश्‍न भीषण आहे. अशा वेळी सर्वांच्या हाताला काम देणारे, सर्वांच्या श्रमाचा वापर करणारे छोट्या यंत्रावर आधारलेले तंत्रविज्ञानच भारताला अनुरूप होईल हा डॉक्टर लोहिया यांचा विचार फार मौलिक आहे. कम्युनिस्ट पक्ष कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचा पुरस्कार करतो आणि आपण लोकशाही समाजवादी आहोत हा विचार मी मांडत असे, परंतु कम्युनिस्टांनी स्वीकारलेली, मोठ्या यंत्रावर आधारलेली उत्पादनपध्दती ही
भांडवलशाही उत्पादन पध्दतीपेक्षा वेगळी नाही, हा विचार समाजवादी पक्षात डॉ. लोहियांनीच मांडला. समाजवादी समाजरचनेत मानवाची मुक्ती हा केन्द्रबिंदू असला पाहिजे आणि त्यासाठी आपण राजसत्तेच्या व अर्थसत्तेच्या केन्द्रीकरणाला विरोध केला पाहिजे, ही जाणीव आम्हांला डॉ. लोहिया यांनी दिली. समाजवादी चळवळीला नवी दिशा डॉ. लोहियांच्या विचारांमुळे मिळाली आहे'. एस्‌. एम्‌. पुढे म्हणाले, 'राजकीय पक्षाने आपले उदिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावी साधने बापरली पाहिजेत, असे आपण म्हणतो. डॉ. लोहिया यांनी ही कल्पना स्पष्ट करताना फावडे, तुरुंग आणि मतपेटी ही. लोकशाही समाजवादी चळवळीची तीन प्रभावी साधने आहेत, असे सांगून आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. नवभारताच्या निर्मितीसाठी आपण श्रमिकांची सेना (लॅण्ड आर्मी) उभी केली पाहिजे, हा डॉ. लोहियांचा विधायक मार्ग मला फार मोलाचा वाटतो".

अशोक मेहतांची भूमिका

अशोक मेहता हेही समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी समाजवादावर लिहिलेल्या ग्रंथातील विश्लेषण अत्यंत उद्बोधक होते. १९४७ ते १९५२ या काळात अशोक मेहता यांनी मुंबईमध्ये ट्रेड युनियन क्षेत्रात धडाडोने काम केले, केवळ मुंबईतच नव्हे तर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील ते एक मान्यवर नेते होते. १९५२च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाने देशात जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असा त्यांचा आग्रह होता. बिहारमध्ये समाजवादी पक्षाच्या हातात सत्ता येईल आणि काँग्रेसला पर्याय देऊ शकेल असा पक्ष म्हणून समाजवादी पक्षाला भारतात सार्वत्रिक निवडणुकीनंतर मान्यता मिळेल, असा विवार अशोक मेहता मोठ्या आत्मविश्वासाने मांडीत असत. एस्‌. एम्‌. जोशींना असे वाटे की अशोक मेहतांना जनमानस नीटसे कळले नाही. एस्‌. एम्‌. ज्या वेळी अशोक मेहतांना म्हणाले की मुंबई प्रांतात समाजवादी पक्षाला २५च्या वर जागा मिळू शकणार नाहीत त्या वेळी अशोक मेहता नाराज झाले. प्रत्यक्षात समाजवादी पक्षाला फक्त ९ जागा मिळाल्या.
अशोक मेहतांचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या मुंबईत तर पक्षाचा साफ धुव्वा उडाला. या. पराभवानंतर अशोक मेहतांनी समाजवादी पक्षाला मिळालेल्या मर्यादित जागांपेक्षा मतांची टक्केवारी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आणि या टक्केवारी प्रमाणे समाजवादी पक्ष हा देशातोल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे असे समर्थन केले. परंतु हे दुबळे समर्थन होते.

Hits: 124
X

Right Click

No right click