२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

समाजवादी विचारांचे आकर्षण

येरवडा तुरुंगात असताना एस्‌. एम्‌. यांनी मानवेन्द्र नाथ रॉय यांचे " ' हे पुस्तक वाचले. रॉय यांनी रशियन राज्यक्रांतीत लेनिनचे सहकारी म्हणून कार्य केले होते. पुढे कम्युनिस्टांबरोबर वैचारिक मतभेद झाल्यावर ते भारतात आले आणि डॉ. महंमद या नावाने वावरू लागले. कराची काँग्रेसला पं. नेहरू आणि सुभाषबाबू यांचे सहकारी म्हणून डॉ. महंमद म्हणूनच हजर होते. पुढे त्यांना अटक झाली आणि १२ वर्षांची शिक्षा झाली. एम. एन. रॉय यांच्या व्यक्तिमत्वाभोवती तेजोवलय होते. त्यांचे लेखनही अत्यंत प्रभावी असे. एस्‌. एम्‌. यांनी रॉय यांचे विचार वाचल्यावर त्यांची समाजवादी भूमिका अधिक दृढ झाली. रॉय यांच्याबद्दल आकर्षण वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबाबतच्या भूमिकेला रॉय यांनी खंबीर विरोध केला होता. कम्युनिस्टांची अशी भूमिका होती की

" म. गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची चळवळ, ही एक भांडवलशाही चळवळ आहे आणि त्या चळवळीपासून कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांनी दूर राहिले पाहिजे." या भूमिकेवरून १९३० च्या स्वातंत्रय आंदोलनास डांगे, रणदिवे आदी कम्युनिस्ट नेत्यांनी विरोध केला होता. रॉय यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मते साप्राज्यवाद्यांच्या जोखडाखाली पारतंत्र्यात असणाऱ्या देशामध्ये राष्ट्रवाद हा पुरोगामी विचार असून या विचाराच्या आधारे होणाऱ्या स्वातंत्रय चळवळीत समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी झालेच पाहिजे. रॉय यांच्या 'ब्लू बुक'ची एक प्रत येरवडा तुरूंगात एस्‌. एम्‌. यांना मिळाली, त्यांनी ती अभ्यासिली आणि त्यांना त्यातील भूमिका पुरेपुर पटली. एस्‌. एम्‌. यांच्याप्रमाणेच त्यांच्याबरोबर तुरूंगात असलेले यशवंतराव चव्हाण, द्वा. भा. कर्णिक, ह. रा. महाजनी आदींनाही रॉय यांचे विचार पटले. एस्‌. एम., यशवंतराव, आचार्य भागवत आदींना येरवडा तुरूंगातून विसापूर तुरूंगात पाठविण्यात आले. शिक्षेची मुदत संपल्यावर नोव्हेंबर १९३३ मध्ये एस्‌. एम्‌. सुटून आले.

एस्‌. एम्‌. येरवडा तुरूंगात होते त्या वेळी त्यांचे सहकारी ना. ग. गोरे नाशिकच्या तुरुंगात होते. १९३०च्या तुरुंगवासानंतर गोरे यांनीही मार्क्सच्या ग्रंथाचे वाचन सुरू केले होते आणि समाजवादी विचारसरणीबद्दल त्यांनाही आकर्षण वाटू लागले होते. नाशिकच्या तुरुंगात त्यांच्या समवेतच जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेरअल्ली, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता आदी मंडळी होती. जयप्रकाश नारायण हे अमेरिकेत शिकण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथेच मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. अच्युतरान पटवर्धन हे बनारस हिंदू युनिव्हसिर्टीच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना थिऑसफीबद्दल आकर्षण वाटे. परंतु स्वातंत्रय चळवळीत पडल्यावर त्यांनाही मार्क्सचे विचार पटू लागले. या सर्व मित्रांनी तुरुंगात असे ठरविले की सुटून बाहेर गेल्यावर काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करावयाची. तुरुंगातून सुटल्यावर बिहार मध्ये पाटणा येथे पहिली समाजवादी परिषद भरली. एस्‌. एम्‌., गोरे,मेहेरअल्ली, अच्युतराव, मिनू मसानी, अशोक मेहता आदी मित्र त्या परिषदेला गेले होते. काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्फूर्तिस्थान असणारे इतिहासाचे गाढे अभ्यासक, आचार्य नरेन्द्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी या परिषदेत पुढाकार घेतला. मार्क्सच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेल्या या सर्वांना स्वातंत्रय चळवळीत समाजवादी आशय आलाच पाहिजे असे उत्कटतेने वाटत होते. गांधीजींच्या केवळ रचनात्मक कामामुळे या देशात पुरेशी शक्ती निर्माण होणार नाही. ती निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कामागारांच्या संघर्षशील संघटना बांधल्या पाहिजेत, असा समाजवादी विचारांच्या या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून दूर जायचे नाही. कम्युनिस्टांनी केलेली चूक करायची नाही, याबद्दलही या सर्वाचे एकमत होते. २१ ऑक्टोबर १९३४ला मुंबईस काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. जयप्रकाश नारायण हे जनरल सेक्रेटरी आणि नानासाहेब गोरे हे जॉईंट सेक्रेटरी झाले. एस्‌. एम्‌.कार्यकारीणीचे सदस्य होते.

एम. एन. रॉय हे तुरूंगात होते आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी चौपाटीवर सभा होती. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीतर्फे एस्‌. एम्‌.ना सभेत बोलण्यासाठी पाठविण्यात आले. जेलमध्ये उर्दुचा अभ्यास उत्तम असल्यामुळे एस. एम यांनी हिंदीत भाषण केले. भाषणात ते म्हणाले, "जब फ्रेंच रेव्होल्युशन हुआ तब बॅस्टिल जेल तोडके लोगो ने अपने साथिर्योंको रिहाई किया था। जब हमारी जीत होगी तब कॉ. रॉय रिहा होंगे!" त्या भाषणाला खूप टाळ्या पडल्या. एस्‌. एम्‌. पुण्याला गेल्यावर आठ दिवसांनीच त्यांना अटक करण्यात आली. चौपाटीवरील भाषणाबद्दल त्यांना ४ डिसेंबरला दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली.

Hits: 115
X

Right Click

No right click