१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ९
१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ९
२९) भाऊरावांचा बंडखोरपणा ही नाण्याची दुसरी बाजू. सत्यान्वेषी गुण हे त्याचे एक स्वरूप. अण्णासाहेब लठ्ठ्यांविरुद्ध खोटी साक्ष देण्याचे नाकारून कोल्हापूर डांबर प्रकरणात व खुद्द लठ्ठ्यांच्या विरुद्ध बंड करून वसतिगृहाचा त्याग करण्यात हा सत्यान्वेषी गुण प्रगट झाला आहे. या
बंडखोरपणातच सत्य अहिंसेचा त्यांनी पुरस्कार केला होता. जैनांनी अस्पृश्यता पाळणे व अस्पृश्यांना दूर राखणे म्हणजे जैनांच्या 'अभयदान' या
' तत्त्वाची व मानवतेची हिंसा आहे असे ते जैनांना व्याख्यानातून सांगत. ब्राह्मण किंवा मराठ्यांना अहिंसेचे व अस्पृश्यता न पाळण्याचे तत्त्व पटविताना
त्यांनी शारीरिक बळाचा उपयोग केला नाही. औदुंबर किंवा सज्जनगड येथे प्रसादाची पंगत सर्वांच्यासाठी एक असावी म्हणून व्याख्यानाचा उपयोग
केला, अनुयायांना सबुरीचा उपदेश केला, बळाचा नाही.
३०) रंजल्या गांजठेल्याची सेवा करण्यासाठी या सत्य-अहिंसायुक्त बंडखोरीचा उपयोग भाऊरावांनी केल्याचे दिसते. म्हणून 'कर्मवीर' उपाधीपेक्षा 'रयत सेवक' ही उपाधी त्यांना प्रिय होती व प्रत्येक पत्रात आपल्या सहीखाली 'रयत सेवक' उपाधी लिहीत. जनतेच्याकडून मिळणार्या साहाय्यात ईश्वरीय प्रेरणा असल्याची त्यांची श्रद्धा होती. महात्मा फुले, महात्मा गांधी, सद्गुरू गाडगे महाराज या महामानवांच्या ठिकाणी त्यांना ईश्वरीय मोठेपणा जाणवत असे. स्वावलंबन व आत्मनिर्भरता ही ईश्वरीय देणगी आहे आणि शारीरिक कष्टातून कपाळावर उभे राहिलेले घामाचे मोती हा मानवाचा सर्वश्रेछ अलंकार आहे असे ते मुलांना सांगत.
३१) सारांश, जनतेची सेवा करण्यासाठी महाराष्ट्रात जन्मलेले भाऊराव एक महामानव होते. त्यांनी जनतेचे मन व धन आपल्या निष्काम कृतीने मिळविले व ते तिच्याचसाठी वापरले. लोकशाही ही मानवतेचे अपत्य आहे. भाऊराव मानवतेचे व लोकशाहीचे मोठे भक्त होते. लोकशाहीसाठी लोकशिक्षणाचे सार्वत्रिकरण हा त्यांचा ध्यास होता. मात्र या लोकशिक्षणातून बुद्धिजीवी परोपजीवी वर्गही तयार होऊ नये म्हणून बुद्धी व श्रम यांची 'कमवा व शिका' योजनेत सांगड घालण्याचा प्रयत्न या महामानवाने नव्हे, महान समाजशिक्षकाने केला.
अमेरिकेचे महान अध्यक्ष अब्राहम लिंकन हे आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहितात, “सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात. नसतात सगळेच सत्यनिष्ठ. हे शिकेल माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे शिकवा, जगात प्रत्येक बदमाषांगणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात; तसे असतात अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा - घाम गाळून कमावलेला एक छदाम आपल्याला मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कधी स्वीकारावी हे त्याला शिकवा आणि विजयाचा आनंद संयमाने व्यक्त करायला.... त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं. त्यांना नमवणं सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा.” अध्यक्ष लिंकन हे मानवाचे महान शिक्षक होते. आपल्या मुलाच्या रुपाने ते अमेरिकन तरुणांना पाहत होते.
२२) भाऊरावही महाराष्ट्राचे महान शिक्षक होते. अब्राहम लिंकनच्या वरील स्वरूपाचाच उपदेश ते आपल्या संस्थेतील तरुण शिक्षकांना करीत होते. यापूर्वी मी म्हटले आहेच की पॉल फेअरी या शिक्षणशास्त्रज्ञाने सामाजिक शिक्षकास लावलेली बिरुदावली "Radical humanist liberator & educationist " भाऊरावांना तंतोतंत लागू पडते.
२२) असा हा महान समाजसुधारक, समाजाचा ऋषितुल्य शिक्षक सन १९५९ साली अंतर्धान पावला. आपल्यात समजूत आहे की दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तसा हा महान समाजसुधारक मृत्यूपर्वी अनेक पदव्या व सत्काराने मोठा व विभूषित होऊन, ग्रामीण शिक्षणाची नवी दिशा दाखवून, मोठ्या सन्मानाने आपल्यातून निघून गेला तो नांदणी मठाचा पीठाचार्य न बनता महाराष्ट्राच्या लोकशिक्षण पीठाचा आचार्य बनून.
Hits: 153