१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ८
१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ८
२४) ता. ३ नोव्हेंबर १९५८ रोजी भाऊराव किर्लास्करवाडीच्या कारखान्याच्या सुवर्ण महोत्सव समारंभातील सत्कारास हजर राहिले. वाडीहून साताऱ्यास परतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना पुण्यास उपचारासाठी हलविण्यात आले. या किर्लोस्करवाडीच्या
किर्लोस्करांच्या कारखान्यातील कामगारांनी सन १९५२ मध्ये ता. ११ मार्च रोजी नामदार डी. पी. करमरकर यांच्या हस्ते रु. २५ हजारांची थैली
दिली होती व सत्कार केला होता.
२५) सन १९५८ मधील हा आजार शेवटचा होता. बाबुराव सणसांच्या बंगल्यावर भाऊरावांना ठेवून डॉ. बोधे त्यांच्यावर उपचार करीत होते. पण तो आजार वाढत चालला होता. २० नोव्हेंबरला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारत सरकारच्या दप्तरी भाऊरावांच्या कार्याची नोंद सन १९४९ साली २० सप्टेंबरला प्रा. हुमायून कबीर यांनी संस्थेस भेट दिल्यापासून होती. विशेषत: मौलाना आझाद व डॉ. आंबेडकर यांनी मध्यस्थी केल्याने महाराष्ट्र शासनाने संस्थेवरील अन्याय्य ग्रॅंटबंदी उठविली होती. नोव्हेंबर ५८ मध्ये भाऊराव अत्यवस्थ असल्याने ता. २६ जानेवारी ५९ रोजी भाऊरावांना राष्ट्रपतींनी पद्मभूषण हा किताब बहाल केला. त्यानंतर ५ एप्रिळ १९५९ रोजी पुणे विद्यापीठाकडून भाऊरावांना सन्माननीय डी. लिट. पदवी रॅंग्लर डॉ. र. पु. परांजपे यांच्या हस्ते ससून हॉस्पिटलमध्ये देण्यात आली.
२६) ता. ६ मे १९५९ रोजी अहमदनगर येथे डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते भाऊरावांना अहमदनगर जिल्ह्याने जमविलेले रु. १ लाख डॉ. धनंजयराव यांच्यामार्फत देण्यात आठे. भाऊरावांना दवाखान्यातून हलण्यास डॉ. मोदींनी परवानगी दिली नव्हती. हा अहमदनगरचा सत्कार व गौरव समारंभ भाऊरावांच्या आयुष्यात शेवटचा ठरला. कारण ता. ९ मे १९५९ रोजी भाऊरावांनी ससून इस्पितळात वॉर्ड नं. ७ मधील बिछान्यावर शेवटचा श्वास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपविली. डॉ. चिंतामणराव सो. दुर्गाबाई देशमुखांसह ता. ७ रोजी ससून इस्पितळात भाऊरावांना मृत्यूपूर्वी भेटले. सन १९५७ साली डॉ. देशमुखांच्या हस्तेच भाऊरावांचे डॉ. मॅथ्यूलिखित इंग्रजी चरित्र प्रसिद्ध झाले होते. भाऊरावांच्या मृत्यूने सारा ग्रामीण महाराष्ट्र हळहळला. सार्या प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्यावर मृत्युलेख लिहिले. विशेषत: आचार्य अत्र्यांचा लेख हृदयस्पर्शी होता.
२७) भाऊरावांच्या वरील चरित्राकडे व कार्याकडे पाहिल्यानंतर असे दिसून येते की त्यांना सुखात लोळण्याची संधी असूनही त्यांनी हे समाजसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वेच्छेने स्वीकारले होते. भाऊराव हे मानवतेचे पुजारी होते. भाऊरावांच्या काळात पारतंत्र्य हटविण्याचे दोन मार्ग होते. पहिला मार्ग राजकीय चळवळीचा व दुसरा मार्ग होता सामाजिक सेवेचा.
भाऊरावांनी पणतीप्रमाणे मंदपणे, कणाकणाने जळून प्रकाश देण्याचे सामाजिक व शैक्षणिक कार्य स्वीकारले. त्यास प्रमुख कारण म्हणजे तत्कालीन सत्यशोधक समाजाची सामाजिक चळवळ व छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक प्रबोधनाची प्रेरणा. भाऊरावांचे समाजसुधारक म्हणून सर्वात मोठे कार्य कोणते? असा प्रश्न विचारल्यास त्यास उत्तर हे की, शिक्षण हे दास्यविमोचनाचे प्रभावी शस्त्र असून व्यक्तिगत व राष्ट्रीय उत्थानाची ती मोठी शक्ती आहे. याची जाण गरीब व अठराविश्वे दारिद्र्यात लोळणार्या जनतेस त्यांनी करून दिली. हितसंबंधी लोक दास्यविमोचनाच्या कार्यात अडथळे आणतात तेव्हा शिक्षणाचा प्रसार करणे म्हणजे हा अडथळा नष्ट करणे होय. समाजातील सुशिक्षित व अशिक्षित यांतील दंड नष्ट करण्यानेच भारतीय समाज एकसंध होईल अशी त्यांची धारणा होती.
२८) भाऊरावांचा एक व्यक्ती म्हणून विचार करीत असताना त्यांच्या अंगी असलेल्या संन्यस्त वृत्ती व बंडखोरपणा या गुणांचे बारकाईने अध्ययन केल्यास असे दिसते की हे दोन गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या संन्यस्त वृत्तीमध्ये, सत्याची आराधना, त्याग, साधेपणा व करुणा या गुणांचा अंतर्भाव होता. जनसेवेसाठी ही संन्यस्त वृत्ती राबवीत असताना त्यांची श्यामवर्ण धिप्पाड देहयष्टी पांढऱ्याशुभ्र दाढीने, शुभ्र खादीने, अनवाणी पायाने चालताना पाहून न्यायमूर्ती डॉ. पी. बी. गर्जेंद्रगडकरांना भाऊरावांच्या ठिकाणी प्राचीन ऋषीचा भास झाला.
डॉ. ध. रा. गाडगीळांनी भाऊरावांना यती म्हटलेच होते. अस्पृश्य, परित्यक्त, मातृपितृविहीन बालकांना पाहून त्यांची संन्यस्त वृत्ती करुणेचे रूप धारण करी व त्यांना मदत देऊन या करुणेत सहभागी होण्यास इतरांनाही ते भाग पाडीत. हा असा होता त्यांच्या संन्यस्त वृत्तीचा परिणाम.
Hits: 137