९. शिक्षणातील प्रयोग - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

प्रकरण नववे

९. शिक्षणातील प्रयोग - १

१) रयत शिक्षण संस्थेचे सगळ्यात मोठे काम माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात झाले आहे. त्याला कांही महत्त्वाची कारणेही होती. पहिले होते

(अ) प्राथमिक स्वयंसेवी शाळांच्या द्वारा सातारा जिल्ह्यातील रयतेचा फार मोठा पाठिंबा भाऊरावांच्या शैक्षणिक कामास मिळू लागला. विशेषत: १९२३८-१९४० सालात संस्थेने १९९ व्हालंटरी शाळा चालविल्या होत्या. या शाळेतील शिक्षक म्हणजे ग्रामीण भागातल्या नाड्या होत्या. लोकांना काय हवंय ते या शिक्षकांकडून कळे. भाऊराव नेहमी म्हणत, "प्राथमिक शिक्षकांचे माझ्यावर मोठे ऋण आहे.” या प्राथमिक शाळांपैकी काही सातवीच्या होत्या. तेथील मुलांना जिल्ह्याच्या किंवा ताठुक्याच्या ठिकाणी राहून शिक्षण घेणे अशक्य होते.

(ब) स्वयंसेवी शाळांच्या माध्यमातून संस्थेने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ध्येयधोरणाप्रमाणे बरीच मजल मारली होती. त्याच्या पुढची पायरी होती
माध्यमिक शिक्षणाची.

(क) सन १९३९-४० मध्ये सातारा जिल्ह्यात पाचगणीच्या सात पब्लिक स्कूल्स व २ मुलींच्या माध्यमिक शाळा वगळता सातारा जिल्ह्याच्या ११,७९,७१२ लोकसंख्येस फक्त ११ शाळा सात शहरांतच उपलब्ध होत्या. म्हणजे माध्यमिक शिक्षण गरीब रयतेच्या मुलांच्या आटोक्यात नव्हते. अकरा तालुक्यांपैकी पाटण, माण, खटाव, खानापूर, जावली व पेटा खंडाळा व मेढा येथे माध्यमिक शाळाच नव्हत्या आणि हे तालुके डोंगराळ, मागासठेले व अतिदरिद्री होते. भाऊरावांनी ठरविले की, छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसमध्ये येणाऱ्या गरीबातल्या गरीब मुलास माध्यमिक शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी ध्येयधोरणात समाविष्ट केलेल्या स्वावलंबन व आत्मनिर्भरता', 'कमवा व शिका" या तत्त्वांचा अवलंबच नव्हे, तर अम्मलबजावणी करण्यास माध्यमिक शाळा क्षेत्र योग्य आहे. २० जून १९४० रोजी रयत शिक्षण संस्थेचे पहिले माध्यमिक विद्यालय सातार्‍यात सुरू करण्यात आले.

२) या माध्यमिक शाळेस 'महाराजा सयाजीराव फ्री अन्ड रेसिडेन्शिअल हायस्कूल असे नाव देण्यात आले. मराठीत 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' व इंग्रजीत 'सेल्फ हेल्प इज अवर मोटो' हे शाळेचे ध्येयवाक्य ठरविण्यात आले. या माध्यमिक शाळेस बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांचे नाव देण्यामागेही त्यांच्या सामाजिक कार्याचा मोठा गौरव करण्याचा हेतू होता. महाराष्ट्राच्या मुख्य भूमीपासून बडोदा संस्थान दूर होते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांइतकेच अस्पृश्यता निवारणाचे व सामाजिक एकतेचे मोठे काम सयाजीराव महाराजांनी केले होते. पण त्याची महाराष्ट्रातील रयतेस फारच कमी माहिती होती. मुंबईत ३०-१२-१९०४ रोजी सामाजिक परिषदेपुढे आपल्या भाषणात महाराज म्हणतात, “जातीचे सर्वात मोठे भयंकर परिणाम घडतात ते राष्ट्रीय वृत्तीवर व राष्ट्रीय एकीवर. जात स्थानिक द्वेष वाढविते. जातीजातीच्या हितात विरोध माजविते. जे एकराष्ट्रीय वृत्तीरूप व समानहितरूप असे एक उदात्त कल्पनाचित्र सर्व जातींच्या लोकांच्या डोळ्यापुढे स्पष्ट रेखाटलेले असावे, ते जात अस्पष्ट करते. देशात दुही माजवून राष्ट्राची व्यंगे ती दुरुस्त करू देत नाही व पाश्‍चात्त्य सुधारणेच्या सहवासाची फळेही लाभू देत नाही.”

( श्रीमन्महाराज सयाजीराव गायकवाड यांची भाषणे, प्रथम खंड, पृ. ७०, प्रका. दामोदर सावळाराम आणि मंडळी - १९३६) सयाजीराव महाराजांनी बडोदे संस्थानात अस्पृश्यांसाठी २५१ प्राथमिक शाळा व दोन वसतिगृहे सुरू केली होती. तेथे त्यांना उच्चवर्णीय शिक्षक न मिळाल्याने त्यांनी मुसलमान व ख्रिश्‍चन शिक्षक नेमले.

३) ता. ४ एप्रिल १९३३ रोजी सयाजीराव महाजारांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला भेट दिली. जातीभेद मोडून एकसंध समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणार्‍या या महाराजांनी भाऊरावांचे जातीनिर्मूलनाचे काम पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “या शाहू बोर्डिंग (हऊस) चे काम पाहून मला विशेष आनंद होत आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीस लागलेल्या अत्यंत जालीम जाती विशिष्टरूपी किडीच्या मूळावरच रा. भाऊराव यांनी कुऱ्हाडीचा घाव घातल्यामुळे ती ह्या बोर्डिंगच्या व्यवस्थेमुळे मूळातूनच नष्ट होणार आहे. असे बोर्डिंग व याची तत्त्वे अंमलात आणण्याची रीत हिंदुस्थानात कुठेच दिसून येत नाही. इतक्या थोड्या खर्चात नीटनेटकेपणा, टापटीप, मुलांची शिस्त, उत्साह त्यांचा उत्कृष्ट अभ्यास, ऐक्य, परस्परांवरीळ अकृत्रिम प्रेम पाहून वाटेल तितका खर्च करून एकाद्या राजा-महाराजांकडूनही असली संस्था इतक्या सुंदर व उपयुक्‍तपणे चालविणे कठीण आहे. याबद्दल रा. भाऊराव पाटलांना जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे. ही व अशा संस्था समाजाच्या जागृतीची चिन्हे
असल्यामुळे त्यांचे मला कौतुक करावेसे वाटते. या संस्था कार्यकर्त्यांची बुद्धी, विचार, कला व आकांक्षा दर्शवितात व त्या वाढल्या म्हणजे देशाचे पाऊल पुढे पडण्यास मदत होते. त्यांना उत्तेजन देऊन त्यांना समाजाची सेवा करण्यास संधी देणे हे विचारी, विद्वान, धनिक व दूरदर्शी लोकांचे पवित्र कर्तव्य आहे असे मी समजतो. त्यांचा उत्साह अभंग ठेवण्याची सर्व पुढाऱ्यांवर जबाबदारी आहे.”

Hits: 99
X

Right Click

No right click