८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ७

१८) सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याच्या अम्मलबजावणीत ब्रिटिश नोकरशाहीकडून अडथळे येऊ लागले. ते पैशाची अडचण दाखवीत. भाऊरावांच्या प्रचाराचा शासनाने तसेच सातारा जिल्हा बोर्डने उपयोग केला नाही. तेव्हा भाऊरावांना वाटू लागले की आपण स्वत:च स्वावलंबनाच्या तत्त्वावर स्वयंसेवी शाळा सुरू कराव्यात.

परंतु त्यासाठी त्यांना सन १९२७ पर्यंत वाट पाहावी लागली. त्या साली लोकनियुक्त मंत्रिमंडळे प्रांतांत स्थापन झाली; आणि भाऊरावांच्या स्वयंसेवी शाळांचा प्रस्तावही शासनाच्या आर्थिक अडचणीच्यावेळी कमी खर्चाचा म्हणून मुंबईच्या कॉंग्रेस मंत्रिमंडळाने स्वीकारला.

१९) १७ सप्टेंबर १९३७ रोजी श्री. बाळासाहेब खेर यांनी 'शक्‍य तितक्या लवकर व कमी खर्चात रयतेचे जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण करण्याचे मुंबई कायदे मंडळात अभिवचन दिले. भाऊरावांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता सातारा व नाशिक जिल्ह्यात अनुक्रमे डबेवाडी व आंबोली या खेड्यांत व्हॉलंटरी शिक्षकामार्फत ता. २७-११-१९३६ पासून व्हॉलंटरी शाळा सुरू करण्याचा ठराव करून संस्थेमार्फत तेथे पहिल्या दोन शाळा सुरू केल्या. मुंबई प्रांतात व्हॉलंटरी शाळांची योजना सुरू करण्याचे त्रेय व दूरदृष्टीपणा भाऊरावांकडे जातो. याबाबत रावबहादूर काळ्यांचे चरित्रकार श्री. चंडिराम हरी पळणीटकर म्हणतात, “बहुजनसमाजात साक्षरतेचा प्रसार करून थोड्या खर्चात बहुजनांना भरीव प्राथमिक व दुय्यम शिक्षण आणि धंदेशिक्षण देण्यासाठी ट्रेंड व स्वार्थत्यागी शिक्षक तयार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. जनतेच्या शिक्षणाचा राष्ट्रोद्वाऱाचा - मूलभूत प्रश्‍न ज्या अनेक रीतीने सोडविण्याची रावबहादुरांची इच्छा होती तिची पूर्ती करणारे हे उद्दिष्ट असल्यानेच त्यांचे मन तिकडे (संस्थेकडे) आकृष्ट झाले. श्री. पाटलांना हा उपक्रम का करावा लागला? याचे थोडक्यात पण बरेचसे उत्तर स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या अगर स्थानिक स्वराज्यसंस्थांतर्गत शिक्षणसंस्थांच्या कर्तव्यभ्रष्टतेत आढळून येईल. बहुजनसमाजाच्या शिक्षणाचे ध्येय या संस्थांना धडपणी गाठता येत नसल्यानेच जेथे जेथे याबाबत हयगय होत असेल तेथे तेथे या योजनेतील ज्ञानी शिक्षक अल्पवेतन घेऊन अशा शाळा काढणार आहेत. त्यामुळे सदर स्थानिकस्वराज्यसंस्थांचे अगर स्थानिक
स्वराज्यसंस्थांतर्गत शिक्षणसंस्थांचे डोळे उघडठे, डोके ताळ्यावर आले, तरी पुष्कळच कार्यभाग झाला असे होईल. इतकचे नव्हे, तर शिक्षणकार्यातील व खात्यातील “अव्यापारेषु व्यापारा' ला थोडातरी पायबंद बसेल.” (चं. ह. पळणीटकर, पुरुषोत्तम : १९३७, पृष्ठे ११२-११४)

२०) नामदार खेरांनी असेंब्लीत धोरण जाहीर केल्यानंतर भाऊरावांनी आपली व्हॉलंटरी (स्वयंसेवी) शाळांची योजना श्री. वि. द. घाटे, शासनाच्या (मास लिटरसी ड्राइव्ह) साक्षरताप्रसार मोहिमेचे मुख्य यांचे कानी घालून चर्चा केली. त्यानंतर त्यावेळचे अर्थमंत्री नामदार अण्णासाहेब लठ्ठे (भाऊरावांचे गुरू) यांच्याशी आपल्या योजनेवर चर्चा केली. श्री. लट्ट्यांना ती योजना पसंत पडल्याने त्यांनी श्री. खेर यांना ती सांगितली. त्यानंतर भाऊरावांनी सन १९३८ च्या पुण्यातील असेंब्लीच्या पावसाळी अधिवेशनात एके दिवशी कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांना महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या घरी चहापानास बोलाविले. त्यांना आपली व्हालंटरी शाळांची योजना समजावून सांगितली. व अशा शाळा सुरू करण्याचा मनोदयही प्रगट केला. मंत्र्यांना ही योजना पसंत पडल्याने श्री. लट्ट्यांनी श्री. घाटे यांच्याकडे असलेल्या साक्षरताप्रसार मोहिमेद्वारा अशा व्हालंटरी शाळांना मदत करण्यासाठी त्या साली अंदाजपत्रकात दुप्पट रकमेची तरतूद केली.

Hits: 101
X

Right Click

No right click