६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ४

१०) किर्लोस्करांकडे विक्रेता प्रतिनिधी म्हणून काम करताना भाऊराव सूटबूट आदी पाश्चात्य पद्धतीचा पेहराव करीत असत. कापडही पाश्चात्त्य होते. १७ नोव्हेंबर १९२१ रोजी ब्रिटिश राजपुत्रास मुंबईकर राजनिष्ठातर्फे मानपान व सत्कार आयोजित केलेला होता. महात्मा गांधींनी या समारंभावर बहिष्काराचे हत्यार उपसले होते. राजपुत्राच्या निषेधार्थ परदेशी कपड्यांची होळी करण्याचे ठरविले होते. याप्रसंगी चौपाटीवरील म. गांधींचे रचनात्मक कार्यक्रमावरील भाषण व त्यातील स्वदेशीच्या पुरस्कारार्थ परदेशी कपड्यांची केलेली होळी पाहून भाऊरावांनी आपल्या अंगावरील परदेशी कपड्यांची त्या अग्नीत आहुंती दिली, व त्या दिवसापासून आजन्म खादी वापरण्याचे व्रत घेतले व पाळले. या सर्व महामानवांना भाऊरावांनी आपले वैचारिक गुरू मानले. रंजले गांजलेल्यांचे श्रेष्ठ सेवक गाडगे महाराजांना त्यांत वरचे स्थान होते. 'ज्यांचा मी धेतला गुण, तो तो गुरू मी केला जाण' या उक्तीप्रमाणे हे गुरू असले तरी भाऊरावांचे व्यक्तिमत्त्व स्वयंभू होते. कोणाच्या खांद्यावर उभे राहून ते मोठे
झाले नव्हते. त्यांना मिळालेले मोठेपण व लौकिक स्वकष्टाने, स्वार्थत्यागाने व जनसेवेने मिळालेले होते. अनुभव हाच त्यांचा मोठ्यातला मोठा गुरू होता.

११) काले येथीळ वसतिगृह चालविताना येणार्‍या आर्थिक अडचणींचा विचार करून भाऊरावांनी लक्ष्मणराव किर्लोस्करापुढे पुढील प्रस्ताव मांडले.

(१) कारखान्याचे परिसरात शाळा व वसतिगृह सुरू करावे व कारखान्याच्या नफ्यापैकी १०% रक्कम कामगाराच्या मुलांच्या शिक्षणावर व कामगारांच्या कल्याणकार्यावर खर्च करावी.
(२) शक्‍यतो कामगारांच्या मुलांना कारखान्यात अंशकाऴरिक काम देऊन त्यांच्या शिक्षण व भोजनाचा खर्च परस्पर भागवावा.

किर्लोस्करांना या प्रस्तावापैकी एकही अट मान्य नव्हती. भाऊरावांनी काल्याच्या परिषदेत रयत शिक्षण संस्थेची घोषणा केल्यानंतर तिचा पाठपुरावा करणे आवश्यक होते. शेवटी दोन वर्षांनी किर्लोस्करांकडील आपली. नोकरी सोडण्याचे भाऊरावांनी ठरविले व राजीनामा दिला. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ता. २९-१०-१९२१ च्या पत्राने भाऊरावांचा राजीनामा मंजूर करताना म्हटले, (इंग्रजीत), “त्यांनी (भाऊरावांनी) जाणीवपूर्वक अतिशय परिश्रम (कारखान्यासाठी) केले आहेत. सत्यशोधक समाजाकडे त्यांच्या मनाची ओढ असल्याने मी त्यांना सदर मार्गाने जाण्यास पूर्ण मोकळीक दिली होती. त्यांच्या कामाचा कारखान्याच्या हितास बाध येत नव्हता.” भाऊरावांच्या बाबतीत लक्ष्मणरावांचा उदार दृष्टिकोन असण्याचे मुख्य कारण म्हणजे किर्लोस्करवाडीत अस्पृश्यता किंवा जातीभेदास प्रतिबंध होता. कारण कारखान्याचे रखवालदार अस्पृश्य समाजातले होते. कारखाना लहान असल्याने मालक व कामगारांत एककुटुंब भावना होती. याच पत्रात लक्ष्मणराव म्हणतात, “भाऊरावांच्या शुद्ध आणि देशभक्तीपर सेवेची नोंद कारखान्याच्या दप्तरी ठेवून अतिखेदाने त्यांचा राजीनामा एक नोव्हेंबर १९२) पासून मंजूर करीत आहे. कारण मातृभूमीची अधिक चांगल्या त-हेने सेवा करण्यासाठी ते आम्हास सोडून जात आहेत.”

Hits: 91
X

Right Click

No right click