४. उपजीविकेच्या शोधात -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

१)कोल्हापुराहून भाऊरावास कोरेगावला परत बोलाविल्यानंतर आईवडिलांना वाटले की, भाऊरावाचे लग्नाचे वय झाले आहे. त्याचे लग्न लावून दिल्यास त्याच्या बंडखोरपणास आळा बसेल.. सौ. गंगाबाई मातोश्रीने कुंभोज येथील आपल्या माहेरच्या नातेवाइकांपैकी कु. अदक्का पाटील हिची निवड करून लौकिक अर्थाने भाऊरावाच्या पायात लग्नाची बेडी १९०९ साली अडकवून दिली. भाऊराव मॅट्रिक पास नसल्याने पायगोंडा पाटील कष्टी होते. चांगली नोकरी लावण्यास अडचण येत असे.
पायगौंडा पाटलांना आपला एखादा मुलगा तरी पदवीधर व्हावा असे वाटत होते. चारी मुलांपैकी कोणीही त्यांच्या नजरेसमोर पदवीधर झाला नाही. परंतु पायगौंडाच्या मरणोत्तर सतरा वर्षांनी या भाऊरावांस सन १९५९ साली पुणे विद्यापीठाने त्यांच्या असामान्य शैक्षणिक कार्याबद्दल सन्माननीय डी. लिट. पदवी दिली. भाऊरावांना मिळालेली पदवी पाहण्याचे भाग्य मात्र मातोश्री गंगाबाईंना लाभले. सन १९२८ साली ऑक्टोबर महिन्यात राज्यपाल सर रॉजर लम्ठे यांनी रयत शिक्षण संस्थेत भेट दिली. आपल्या मुलाचा -भाऊरावाचा मोठेपणा पायगौंडा पाटलांना राज्यपालाकडून भाऊरावांच्या
स्तुतीनंतरच कळून आला. आपला मुलगा आपले आयुष्य फालतू गोष्टीवर खर्च करीत नाही हे त्यांना कळून चुकले.
२) हे जरी खरे असले तरी १९०९ साली भाऊराव हा निरुद्योगी, भारभूत मुलगा आहे असे पायगौंडा पाटलांना वाटे. कारण कोणत्याही नोकरीत स्थिरावयाचे भाऊरावांच्या स्वभावात नव्हते. कारकून म्हणून आपल्या खात्यात लावून दिले तर ते काम मनाजोगते नाही म्हणून त्या कामावर जाण्याचे भाऊरावाने टाळले. मुलाने पोलीस खात्यात शिरण्यास पायगौंडा पाटलांनाच तिटकारा होता. सैन्यात शिरण्याचा भाऊरावाने प्रयत्न केला, पण तेथे निवड झाली नाही. सारांश, लग्नानंतरचे काही महिने काय करावे याचा फारसा विचार न करता दोन वेळ जेवावे व मनसोक्त हिंडावे हेच काम भाऊराव करीत राहिळे. तोच १९१० साल उजाडले व श्रवणबळगोळ येथील गोमटेश्रराचा उत्सव आला. या उत्सवाला जोडून जैन समाजाचे अधिवेशन होते. १९०५ साली कोल्हापूरच्या दिगंबर जैन वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या उद्‌धाटनापासून मुंबईचे जव्हेरी श्री. माणिकचंद हिराचंद दरसाल या
वसतिगृहाच्या आवारात भरणार्‍या अधिवेशनास किंवा सभेस हजर राहत असत. भाऊरावाकडे स्वयंसेवकाचे काम असे. विशेषत: माणिकचंद
शेठजींच्या दिमतीस भाऊरावांना दिलेले असे. सदर शेठजी व त्यांचे कुटुंबीय स्नानादी प्रसंगी व कोल्हापुरात मुक्काम असे तोपर्यंत या
भाऊरावाकडे आपले जडजवाहीर निर्धास्तपणे सोपवीत. भाऊराव त्यांचे जिवापाड रक्षण करून मुंबईस परतताना त्यांच्या हवाली करीत.
अवणबेळगोळच्या अधिवेशनाचे अध्यक्ष माणिकचंद शेठजीच होते.
कोल्हापूरच्या वसतिगृहातील बरेच तरुण स्वयंसेवक म्हणून या अधिवेशनास जाणार होते. संयोजकांना भाऊरावाचे चोख काम आठवले.
भराऊरावास या अधिवशेनास बोलावून स्वयंसेवक दलाची जबाबदारी त्यांच्यावर व बेळगावचे दामोदार लेंगरे या वयस्कर व बलदंड तरुणावर
सोपविण्यात आली. येथेही माणिकचंद व त्यांचे कुटुंबीय यांच्या वसतिस्थानावर देखरेख करण्याची जबाबदारी भाऊरावांवर सोपविण्यात
आली होती. कोल्हापुरात असतानाच भाऊरावांची शेठजींशी ओळख झाली होती. मुंबईस परतताना श्री. माणिकचंदजींनी भाऊरावास, “सध्या काय
करतोस ?” म्हणून विचारले. भाऊरावांनी बेकार असल्याचे सौंगितले. अशा विश्‍वासू व प्रामाणिक तरुणाच्या जीवनास वळण देण्याच्या हेतूने
माणिकचंद शेठजींनी भाऊरावास मुंबईस नेले. स्वतःच्या वडिलांच्या नावे मुंबईत सुरू केलेल्या हिराचंद गुमानजी वसतिगृहात दाखल केले. दरमहा
तीस रुपये विद्यावेतन देऊन दावर्स वाणिज्य विद्यालयात भाऊरावास व्यापारी कला शिकविण्यास दाखल केले. भाऊरावास टंकलेखन आदी
विषयांत इंग्रजी भाषेच्या कच्चेपणामुळे गती आली नाही. त्यांनी दावर्स वाणिज्य विद्यालय काही महिन्यांतच सोडले.

Hits: 108
X

Right Click

No right click