ज्येष्ठ अभिनेते रवी. पटवर्धन
भारदस्त देहयष्टी आणि तितकाच भारदस्त आवाजाने कोणतीही भूमिका असो आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे ५ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीता, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
वयाच्या 7 व्या वर्षांपासून रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या पटवर्धन हे वयाच्या 83 वर्षापर्यंत रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये कार्यरत होते. आमची माती आमची माणसं ह्या दुरदर्शन मालिकेपासून ते सध्या सुरू असलेल्या अग्गोबाई.. सासूबाई... ह्या मालिकेतील त्यांच्या दत्ताजी - आजोबांच्या भूमिकेमुळे ते पुन्हा घराघरांत पोहचले. कोरोनामुळे ते अग्गोबाई मालिकेच्या चित्रीकरणात पुन्हा सहभागी होवू शकले नाहीत.
दिवंगत नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या समवेत1974 मध्ये रंगभूमीवर साकारलेल्या आरण्यक नाटकातच वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांनी पुन्हा रंगमंचावर त्याच तडपेने भूमिका साकारली. हिंदी - मराठीतील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी भूमिका साकारल्या. सुमारे 200 हून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केला. अंकुश, प्रतिघात, तेजाब या हिंदी तर मराठीत उंबरठा, सिंहासन यासारख्या अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. त्यांनी 200 हून आधिक हिंदी - मराठी चित्रपट आणि 125 हून अधिक नाटकात त्यांनी काम केले. अनेक मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या.
आमची माती-आमची माणसं या दूरदर्शन मालिकेने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. बीबीसी वाहिनीने या मालिकेतील गप्पा - गोष्टींची दखल घेतली. या मालिकेने त्यांना खूप नाव मिळवून दिले. दमदार आवाज, भारदस्त देहयष्टीमुळे त्यांना खलनायक, सरपंच, राजकीय पुढारी यांच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. तेजाब मधला त्यांनी रंगवलेला वकील आज तरूण पिढीच्या मनात आहे. अभिनय क्षेत्रातल तीन - चार पिढ्यापर्यंत सुसंवादी सूर ठेवत त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दोन वर्षापूर्वीच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीचा पुरस्कार देवून गौरव केला होता.
रवी पटवर्धन यांची नाटके आणि (त्यांतील त्यांची भूमिका)
- अपराध मीच केला
- आनंद (बाबू मोशाय)
- आरण्यक (धृतराष्ट्र)
- एकच प्याला (सुधाकर)
- कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)
- कोंडी (मेयर)
- कौंतेय
- जबरदस्त (पोलीस कमिशनर)
- तुघलक (बर्नी)
- तुझे आहे तुजपाशी (काकाजी)
- तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू)
- पूर्ण सत्य
- प्रपंच करावा नेटका
- प्रेमकहाणी (मुकुंदा)
- बेकेट (बेकेट)
- भाऊबंदकी
- मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
- मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
- विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)
- विषवृक्षाची छाया (गुरुनाथ)
- वीज म्हणाली धरतीला
- शापित (रिटायर्ड कर्नल)
- शिवपुत्र संभाजी (औरंगजेब)
- सहा रंगांचे धनुष्य (शेख)
- सुंदर मी होणार (महाराज)
- स्वगत (एकपात्री प्रयोग, जयप्रकाश नारायण)
- हृदयस्वामिनी (मुकुंद)
रवी पटवर्धनांनी काही नाटकांची निर्मितीही केली आहे, ती नाटके अशी :
- एकच प्याला
- तुफानाला घर हवंय
रवी पटवर्धनांची भूमिका असलेले चित्रपट
- अंकुश (हिंदी)
- अशा असाव्या सुना
- उंबरठा
- दयानिधी संत भगवान बाबा
- ज्योतिबा फुले
- झॉंझर (हिंदी)
- तक्षक (हिंदी)
- तेजाब (हिंदी)
- नरसिंह (हिंदी)
- प्रतिघात (हिंदी)
- बिनकामाचा नवरा
- सिंहासन
- हमला (हिंदी)
- हरी ओम विठ्ठला
सौजन्य संदर्भ - दैनिक पुढारी - ६ डिसेंबर २०२०