अनंत काणेकर
अनंत काणेकर हे आधुनिक मराठी कवी, लघुनिबंधकार, आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे संपूर्ण नाव अनंत आत्माराम काणेकर असे होते. त्यांचा जन्म इ.स.१९०५ मध्ये मुंबईत झाला. अनंत काणेकर यांनी काही काळ ‘चित्रा ’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले होते. इ.स. १९३४ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘पिकली पाने ’हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह. अनंत काणेकर पुरोगामी लेखक म्हणून ओळ्खले जातात. त्यांच्या सर्व लेखनात सामान्य माणसाविषयी त्यांना वाटत असलेला जिव्हाळा व आपलेपणा प्रत्ययास येतो.
‘धुक्यातून लाल तार्याकडे ’ हे त्यांचे प्रवासवर्णन तर खूपच गाजले होते. अनंत काणेकरांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून ही नियुक्ती झाली होती. ते साहित्य अकादमीचे सदस्य होते. इ.स.१९६५ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री ’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.
ग्रंथसंपदा : चांदरात आणि इतर कवितासंग्रह. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघडया खिडक्या, राखलेले निखारे, बोलका ढलपा हे लघुनिबंधसंग्रह. दिव्यावरती अंधेरे हा लघुकथासंग्रह. धुक्यातून लाल तार्याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती हे प्रवासवर्णनपर ग्रंथ इत्यादी.
Hits: 487