गणपतराव वडगणेकर
गणपतराव वडगणेकर हे कोल्हापुरातले एक नावाजलेले चित्रकार. बाबूराव पेंटरांप्रमाणे वडगणेकरही कोणत्या आर्ट स्कूलमध्ये शिकले नाहीत. अगदी साधारण सांपत्तिक परिस्थितीमधून, कुणाचीही फारशी मदत न घेता केवळ स्वत:च्या अवलोकनशक्तीवर विसंबून राहून कलेतील तंत्रविषयक गोष्टींचा इतका अभ्यास करणे फारसे कुणाला जमत नाही. परंतु गणपतरावांनी दुसऱ्यांची चित्रे पाहून चिंतन, मनन, करुन जलरंग चित्रणपध्दतीचा इतका सखोलपणे कसा अभ्यास केला असेल असा विचार पडतो.
चित्रपध्दतीच्या बाबतीत गणपतराव, बाबूराव पेंटरांचे शिष्य शोभतात. प्रत्यक्षपणे ते बाबूराव पेंटरांकडे किती शिकले असतील हे सांगता येत नाही. पण दोघांची प्रकृती सारखीच, म्हणजे कल्पनावादी.
त्यांच्या निसर्गचित्रांत वातावरणाचा आभास व अवकाशाची जाणीव चांगल्या तऱ्हेने प्रगट झाली आहे. सुकलेल्या जलरंगांपासून ओल्या ब्रशने हळुवारपणे धुऊन काढलेल्या प्रकाशकडा चित्राला मुलायम बनवतात. उष:कालचा मंदधूसर प्रकाश सर्वं वस्तूंना एकमेकात गुंफून टाकतो. व समोरचा निसर्ग स्वप्नासारखा सुंदर भासू लागतो. हा सर्व भाव गणपतरावांच्या चित्रात पुरेपूर दिसतो.
गणपतरावांनी शिक्षणसंस्थाही काढली व विद्यार्थ्यांना कलाशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ते विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे देऊ शकले.