बाबूराव पेंटर
ज्येष्ठ कलाकार बाबूराव पेंटर. रंगछटांचे वजन जराही ढळू न देता सफाईदार रंगेलपन करणे व ते करीत असताना समोरच्या व्यक्तीमधून एक कल्पनारम्य प्रतिमा उभारणे हे त्यांच्या इतके कोणत्याही समकालीन चित्रकाराला जमले नाही. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील भोसलेमास्तर एक ज्येष्ठ दर्जाचे पोर्टेट पेंटर होते आणि त्यांच्या चित्रात रंगलेपनाचा जो तजेलदारपणा दिसत असे तशाच प्रकारचा रंगलेपन बाबूरावांच्या चित्रातही दिसून येतो. तथापि, या दोघांमधील फरक असा की, बाबूरावांची रंगलेपन पध्दती त्रिंदादच्या पध्दतीची म्हणजे ब्राऊन स्कूलमधून उदय पावलेली अशी होती.
(ब्राउन स्कूल म्हणजे अप्रत्यक्ष रंगलेपन संबंध चित्र टोनव्हॅल्यू मधून पाहायचे व रंगलेपनही टोनव्हॅल्यूच्या अनुषगांने भरत यायचे.) तर भोसले यांची रंगलेपन पध्दती `प्रत्यक्ष रंगलेपन'(डायरेक्ट पेंटिंग) प्रकारची होती. रंगाच्या विविध छटांमधून छायाप्रकाशचा आभास निर्माण करायचा असतो.
म्हणून छायाक्षेत्रातही (शेड पोर्शन) विविध रंगछटांची गुंफण तयार करुन टोनव्हॅल्यू प्रस्थापित करावयाच्या असतात. इतके असले तरी बाबूरावांनी आपल्या तीक्ष्ण अवलोकन बुध्दीमुळे व संवेदनाक्षमतेमुळे ब्राउन स्कूलच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या व गहिऱ्या घनशील रंगाने रसरसलेली स्वतंत्र्य अशी लेपन पध्दती निर्माण केली. रंगाच्या शुध्दतेची त्यांची जाणीव विलक्षण होती. व रंगमिश्रणाचे त्यांचे ज्ञान अचूक होते आणि हे सर्व बाबूराव स्कूल ऑफ आर्टमध्ये न शिकता करु शकले हे विशेष.