या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे. |