संपादकीय

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

शब्द शब्द जपून ठेव -----------

एक सामाजिक, अराजकीय (राजकारण विरहित) , सर्वसमावेशक व्यासपीठ जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांसाठी म्हणजे “मायमराठी डॉट कॉम “ हे संकेतस्थळ ! अर्थात संकेतस्थळ म्हणजे जागतिक कार्यक्षेत्र.
"मातृभाषा " शब्दापेक्षा "मायमराठी" जणू आईच्या कुशीत असल्यासारखे वाटते. नाहीतरी आपण आपल्या भाषेतच जन्मतो. त्यामुळे भाषेतून जन्मलेली - शब्द , वाक्य, साहित्य ही मंडळी आयतीच पाळण्यात येऊन भेटतात. त्यांचा वापर करत करत आपण सरावतो. ढोबळमानाने आणि प्रचलित अर्थ मग ओळखीचे होत जातात आणि नकळत सवयींचेही ! त्यांची काटेकोर निवड आणि अर्थच्छटा दैनंदिन जीवनात अभिप्रेत नसतात.
पण माध्यम निवडले की सगळं तपासून बघावं लागतं. शब्दांमागचा, अर्थांमागचा सुरु झालेला तरल प्रवास, त्यांच्यासमवेतचे विचार आणि लगडून आलेल्या भावना सगळंच सांभाळावं लागतं.
खरंच संशोधन करायला हवं - दिवसातून आपण आपल्या मायबोलीतून किती शब्द उच्चारतो, किती ऐकतो, किती बघतो आणि किती लिहून काढतो.
इथे अजून एक मिती आहे- " किती वाचतो ! "
छापील कागदांपासून आपण हळूहळू दुरावत चाललो आहोत आणि अंकीय (डिजिटल) विश्वाकडे निघालो आहोत. काहींची सुरुवातच या व्यासपीठावर तर काहींनी काही वर्षे इथे घालविली आहेत. कोरोनाला आपण कसेही संबोधिले तरी एक मात्र - त्याने सगळ्यांनाच ऑनलाईन व्यवहारांच्या दावणीला बांधले. काही महिन्यात ते सवयीचं वाटायला सुरुवात झालीय.
मराठी भाषेचं , मराठी मनांचं, मराठी कर्तृत्वाचंअवकाश विस्तीर्णआहे आणि त्याला ज्ञानोबा-तुकारामांचा परीघआहे. " लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी " हे आपल्या संकेतस्थळाचे ब्रीद ! त्यामुळे या विशाल परंपरेचा त्रोटक परिचय करून देण्याचा येथे विचार आहे. जगभर पसरलेली महाराष्ट्र मंडळे जशी येथे सापडतील, तद्वत आजवरचीअखिल भारतीय साहित्य संमेलने येथे भेटतील. महाराष्ट्राचा भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक परिचय जागोजागी असेल. हे दस्तावेजीकरण नोंद घेण्याजोगे असेल हा आम्हां सर्वांचा प्रयत्न आहे.
हे कार्य आव्हानात्मक जरूर आहे पण तितकेच आनंददायीदेखील. मराठी भाषिकांसाठी हा एक आधारवड बनला तर खरे सार्थक वाटेल. डिजिटल पुस्तके, अनुवाद कार्य, ब्लॉग्स, पॉडकास्ट , साहित्यिक उपक्रम आणि बरंच काही मनात आहे. टप्प्याटप्प्याने आपण भेटत राहूया.

ॉ. नितीन ह. देशपांडे, संपादक

Hits: 205
X

Right Click

No right click