अतिथी देवो भव

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

प्रत्येक माणसाला सुख, दुःख, राग, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या सर्व भावना असतातच. कारण प्रत्येक सामान्य माणूस हा संतपदाला किंवा देवत्वाला पोहोचू शकत नाही. ‘कुणी तुमच्या एका गालावर मारले तर रागावण्यापेक्षा दुसरा गाल पुढे करा’ हे गांधीजींचे सांगणे ठीक आहे. पण त्याची अंमलबाजावणी करणारा एखादाच सापडतो. अन्यथा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यापलिकडची ती गोष्ट आहे हे खरे. पण निदान दुसर्‍याशी दोन गोड शब्द बोलावे एवढे तर आपल्या हातात असते. सर्वांशी नेहमी चांगले वागावे, गोड बोलावे. विशेषतः अतिथी म्हणजे पाहुणे, त्यांच्याशी त्यांच्याशी बोलताना नेहमी साखरपेरी भाषा असावी. कदाचित्‌ कुणी म्हणेल, ‘म्हणजे प्रत्येक अतिथीला चहापाणी, खाणेपिणे करायचे का? कसे शक्य आहे ते?’ तर तसे नाही म्हणत मी. पण निदान दोन गोड शब्द, चेहर्‍यावर हसू लावायला तर काही पैसे पडत नाहीत.

माझा स्वतःचा अनुभव सांगते हं. एकदा काय झालं दुपारची वेळ होती. ऊन ‘मी’ म्हणत होते. काही कामानिमित्त मी एका ओळखीच्यांच्या घरी गेले होते. मी दारावरची बेल दाबताच "कोण आहे? काय काम आहे?’ अर्धवट किलकिल्या केलेल्या दारातूनच त्या गृहिणीने विचारले. त्या विचारण्यातील रागाची, चिडचिडेपणाची बोच मला ताबडतोब जाणवली. मी शक्य तेवढ्या शांतपणे माझे काम सांगताच, ‘बरं. ठीक आहे.’ असे म्हणून खाड्‌कन्‌ दार लावून बाई घरात गेल्या सुद्धा.

मला थोडे वाईट वाटले. याऎवजी ‘या हं. बसा. काय काम आहे आपलं? खूप ऊन आहे. पाणी देऊ का?’ असे निदान विचारले असते तरी बरे वाटले असते मला. मी त्यावर ‘छे. छे. नको.’ असेच उत्तर दिले असते हे नक्कीच. मग सरबत वगैरे विचारणे तर दूरच! साधे दोन गोड शब्द बोलले असते ना तर ते सरबत किंवा आईस्क्रीमपेक्षा अधिक थंडगार वाटले असते. यातून मला काय धडा मिळाला तर ‘भले त्या बाई तशा वागू देत. पण मी मात्र असे कधीच वागणार नाही. दारावर आलेला प्रत्येक माणूस हा कोणत्या प्रकारचा आहे हे त्याच्याकडे पाहताक्षणीच ओळखता येते. खरोखरीचे पाहुणे आहेत की कुणी लफंगा आहे हे समजण्याइतपत प्रत्येक गृहिणी चलाख नक्कीच असते. आणि मला वाटते सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपण चांगले वागले की देवाच्या दरबारी तो चांगुलपणा आपल्या खात्यावर रुजू होतो.

इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तसे अगोदर आपण इतरांशी वागावे. दुसरा कुणी आपल्याशी रागाने, तुसडेपणाने वागला तर आपल्याला आवडेल का? नाही ना? मग आपणही इतरांशी तसे वागता कामा नये. म्हणजेच दुसर्‍या माणसाच्या जागी आपण स्वतः आहोत असे समजून वागावे. आपल्याला जी सुखदुःखे होतात ती दुसर्‍यालाही होतात ही जाणीव मनात असावी म्हणजे आपण इतरांशी नेहमी चांगलेच वागू. निदान वाईट तरी वागणार नाही.

स्वतःची कवचकुंडले सुद्धा दान म्हणून देणारा तो कर्ण खरोखरीच दानशूर होता. आपल्याला काही कवचकुंडले नाहीत आणि असलीच तरी कर्णाइतके आपण दानशूर होऊच असे नाही. पण निदान फूल ना फुलाची पाकळी एवढे तरी चांगुलपणाचे वागणे आपल्या हातून घडावे एवढीच माफक अपेक्षा. यामुळे जे काही थोडेफार पुण्य आपल्याला मिळेल त्याची मोजदाद करायला तो - तो परमेश्वर बसलाय ना! मग आपल्याला काय काळजी? आपण फक्त चांगले वागण्याचे काम करावे. आज ना उद्या त्याचे योग्य ते फळ आपल्याला मिळेलच.

Hits: 314
X

Right Click

No right click