श्रद्धा व विश्वास

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

काही गोष्टी अशा असतात ना की त्या प्रत्यक्ष दिसत नाहीत पण असतात हे मात्र खरे. आणि त्या असतात म्हणूनच ह्या भवसागरातून आपण आपली जीवननौका सहजपणे पार करू शकतो. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा व विश्वास. प्रत्येक माणसाची कशाना कशावर तरी श्रद्धा असतेच. मग ती एखाद्या तत्वावर, किंवा मूर्तीवर, व्यक्तीवर, स्थानावर किंवा इतर कशावर तरी पण अत्यंत गाढ श्रद्धा असतेच. त्यामुळे आपल्या मनाला शक्ती येते, उभारी येते व मुख्य म्हणजे आयुष्यात एकटेपणा वाटत नाही.

एखाद्या माणसाची एखाद्या ठराविक देवावर श्रद्धा असते. मंदिरातल्या त्या देवाचे दुरून का होईना पण दर्शन झाले निदान मनातल्या मनात स्मरण केले तरी तो देव आपला पाठीराखा आहे या दृढ श्रद्धेवर अनेक संकटे पचवू शकण्याची शक्ती त्याला प्राप्त होते. त्या देवाचे मूर्त स्वरूप दगड, माती, सोने, चांदी कशापासूनही बनलेले असले तरी त्याचे मूलतत्व एकच असते. प्रामाणिकपणा, सद्‌वर्तन, विवेकबुद्धी अशा एखाद्या तत्वावर सुद्धा एखाद्याची श्रद्धा असते. आमच्या सासूबाई सारख्या म्हणायच्या ‘लोक कसे का वागेनात. आपण मात्र चुकू नये. आपण नेहमी चांगले वागावे.’ नुसते असे त्या म्हणायच्या नाहीत तर तसे प्रत्यक्ष वागायच्याही. तुकाराम, ज्ञानेश्वर, साईबाबा, गाडगेबाबा, गजानन महाराज इत्यादी अनेक संत महात्मे होऊन गेले. कुणा एखाद्याचा अशा संतांवरही विश्वास असतो, अपार श्रद्धा असते. रोगग्रस्त माणसाचा डॉक्टरवर विश्वास असतो. आणि म्हणूनच डॉक्टर काय म्हणतील ते ‘प्रमाण’ असे त्याला वाटते.

परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थी देवाला नमस्कार करून जातो. वास्तविक बघता तो मूर्तीतला देव काही परीक्षा देत नाही की पेपेर सोडवत नाही. पण परीक्षा देणार्‍या त्या विद्यार्थ्याला मात्र तो मोठा आधार वाटतो. त्याच्या मनाला धीर येतो. अर्थात‌ त्यासाठी ९९% विद्यार्थ्याचा अभ्यास असावा लागतो तेव्हा उरलेला एक टक्का देव मदत करतो. पण आपले मन कणखर होण्यासाठी त्या नमस्काराचा, श्रद्धेचा मोठाच उपयोग होतो.

एखाद्या अवघड प्रसंगी आपल्याला वडीलधार्‍या मंडळींच्या छत्राखाली असले म्हणजे निवांत वाटते. काळजी वाटत नाही. कोणतीही अडचण आली तरी त्यातून सहीसलामत पार पडू शकू ही कात्री, विश्वास वाटतो. अर्थात्‌ या विश्वासाला पात्र होण्यासाठी त्या त्या तत्वाला, व्यक्तीला, कसोटीला उतरावे लागते. आणि तसे झाले म्हणजे मग ती व्यक्ती, ती मूर्ती किंवा ते तत्व देवत्वाप्रत पोहोचते. ही गोष्ट फार अवघड आहे हे तर खरेच. म्हणूनच सर्वजण संत होऊ शकत नाहीत. संत होण्यासाठी फार मोठ्या त्यागाची गरज असते. सर्वांनाच ते जमते असे नाही. जसे सर्वांनाच काशीला किंवा पंढरीला चालत जाणे जमतेच असे नाही मग आपण काशीला जाऊन आलेल्या व्यक्तीलाच नमस्कार करतो किंवा पंढरीच्या वारकर्‍याच्या पाया पडतो व त्यालाच काशीचा विश्वेश्वर किंवा पंढरीचा विठुराया आहे असे समजतो.

विश्वासाच्या जोरावर माणूस नाना प्रकारच्या संकटांवर मात करून मार्गक्रमणा करतो, दुःखाचे मोठमोठे डोंगर पचवू शकतो, किंवा कितीही लहानमोठ्या विपत्तींच्या लाटेवर स्वार होऊन भवसागर तरून जाण्यात यशस्वी होतो.

Hits: 229
X

Right Click

No right click