आई

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

‘हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखा एकच शब्द आहे, आणि तो म्हणजे आई.’ ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ इत्यादी अनेक सुवचने शाळेत लहानपणी आपण पाठ केलेली असतात. त्यांचा वापरही निबंधातून, भाषणातून केलेला असतो. पण ‘आई’ म्हणजे काय ‘चीज’ आहे हे अनुभवल्याशिवाय कळतही नाही आणि वळतही नाही. शाळेतली एक गंमत मला अजूनही आठवते. ‘आईची माया वेडी असते का नसते’ असे विचारल्यावर मी बिनधास्तपणे ‘नसते’ म्हणून उत्तर दिल्याचे मला चांगलेच स्मरते. माझ्या मनात स्वाभाविकपणे हा प्रश्न होता की ‘आई इतकी चांगली मग तिची माया वेडी कशी असेल?’ पण त्यावेळी ‘आईची वेडी माया’ या शब्दाचा अर्थ कळण्याची क्षमता माझ्यासारख्या लहान मुलीत नव्हती हेच खरे.

माझी आई भारी धीराची! अनेक संकटे अनपेक्षितपणे अंगावर येऊन कोसळली तेव्हा ती मुळुमुळू रडत बसली नाही. तर त्या संकटांतून पार कसे पडायचे याचा नीट विचार करून त्यानुसार निर्णय घेऊन कृती करीत असे. आई पुण्याला ‘ताराचंद हॉस्पिटलमध्ये’ नर्स म्हणून नोकरीला जात असे. माझ्या जन्माच्या वेळची तिने सांगितलेली हकीकत माझ्या मनावर कोरली गेली आहे. माझ्या जन्माच्या एक दिवस आधी ती ‘उद्यापासून एक महिना कामावर येणार नाही’ असे हॉस्पिटलमध्ये सांगून आली होती. त्यानंतर घरी चालत येताना ‘तूप, खारीक, डिंक’ वगैरे काय काय लागते ते सर्व सामान घेऊनच आली. दुसर्‍या दिवशी माझ्या जन्माची पूर्वसूचना मिळताच तिने थोरल्या भावंडांना बाहेर गॅलरीत थांबण्यास सांगून दाराला आतून कडी लावून घेतली. आत ती एकटीच होती. पण ‘हुं नाही की चूं नाही’. यथावकाश माझा जन्म झाल्यावर माझे व तिचे सर्व काही आवरून तिने दार उघडले. एवढेच नव्हे तर नंतर लागणारी कॉफी पण अगोदरच करून ठेवली होती तिने. सांगायचे कारण एवढेच की आजकाल डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल वगैरे असले तरी आम्हाला लहान बाळाचा जन्म म्हणजे मोठा बाऊ वाटतो. माझ्या दोन्ही मुलांचा जन्मही तिच्या हातूनच त्याच एका खोलीत झाला. कसे केले असेल तिने कोण जाणे!

मुलांना लहानाचे मोठे करताना प्रत्येक आईला अनेक अडचणी येतात. त्या सर्वांवर मात करून ती आपल्याला या सुंदर जगाचे दर्शन घडवते. आपल्यावर सुसंस्कार करते. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मुलांची लग्नकार्ये झाल्यावर तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपलेली असते. अशावेळी मुलांनी आईशी कसे वागावे हे खरे म्हणजे कोणालाच शिकवायला लागू नये. पण आजकालच्या जगात पैसा हेच सर्वस्व मानणार्‍या मुलांच्या ध्यानात ही गोष्ट येत नाही. वास्तविक बघता उतारवय झाल्यावर त्या आईला मुलांकडून काय अपेक्षा असते? ना पैशाची, ना दागिन्यांची, ना कपडालत्त्याची! फक्त ‘दोन गोड शब्द’ एवढीच माफक अपेक्षा असते. मुलांनी पाच मिनिटे तिच्याजवळ बसावे. विचारपूस करावी. कधीमधी जुन्या आठवणीत रममाण व्हावे यापरता दुसरा आनंद तिला वाटत नाही. पण नेमक्या याच गोष्टीचे विस्मरण मुलांना का व्हावे हे कोडे मला उलगडत नाही.

मला अगदी मनापासून असे वाटते की ‘आज आईचे वय झाले. तिच्या अंगावर सुरकुत्या पडल्या तसा एक ना एक दिवस माझ्यावरही येणार आहे.’ प्रत्येकाने असा सूज्ञ विचार करायला हवा. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणार आहेतच. या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव मला असल्याने मी सहसा ज्येष्ठ, वयस्कर व्यक्तींशी जवळीक करते. त्यांच्याशी घटकाभर बोलून क्षणभर का होईना त्यांच्या जीवनात आनंदाची झुळूक निर्माण करण्यात मला अधिक समाधान वाटते. आणि अशी एकादी कविता त्यांना म्हणून दाखवते -

‘मातपिता हे प्रत्येकाचे पहिलेवहिले गुरू हो
त्याजविणा मी दुजा कोणा सांगा कैसे स्मरू हो’
------------

Hits: 276
X

Right Click

No right click