अकौंटिंग भाग ८ - स्टॉक इन्व्हेंटरी

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योग Written by सौ. शुभांगी रानडे

अकौंटिंगमध्ये उद्योगाकडे असणार्‍या कच्च्या व पक्क्या मालाच्या साठ्याचे मूल्य  विचारात घ्यावे लागते. स्टॉक-इन-हँड या नावाने या अकौंटची नोंद बॅलन्सशीटमध्ये करावी लागते.

याशिवाय शिल्लक कच्चा माल ( Raw material items) उत्पादनासाठी पुरेसा आहे की नाही याची काळजी घेणे जरूर असते. उत्पादन क्षमतेनुसार दररोज या कच्च्या मालाच्या साठ्यात घट होते. मालाची खरेदी केल्यास या साठ्यात वाढ होते.

विक्रीसाठी तयार केलेल्या वस्तूंचा साठा ( Stock of Sale Products) देखील विक्री झाल्यावर कमी होतो तर उत्पादन झाल्यावर वाढतो.

  गोडावूनमध्ये असणारा कच्चा माल व पक्का माल याशिवाय काही माल हा उत्पादन प्रक्रियेत अडकलेला असतो. या सर्व मालाला इन्व्हेंटरी स्टॉक असे म्हणतात.

कच्च्या मालाची खरेदी (purchase), कच्च्या मालाचा साठा (raw material stock), उत्पादनात असणारा माल ( material stock in process), विक्री योग्य पक्क्या मालाचा साठा (finished products stock) व विक्री (sale) यांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे इन्व्हेंटरी मॆनेजमेंट (inventory management).

  एखादा प्रॉडक्ट तयार करताना लागणार्‍या वस्तू विविध प्रकारच्या असतात.  त्यांचे आकार, वजन, किंमत व एका प्रॉडक्ट्साठी लागणारी संख्या वेगवेगळी असते. यातील एखादी वस्तू जरी कमी पडली तरी प्रॉडक्ट पूर्ण तयार हौ शकत नाही. यासाठी त्यांचा उत्पादन क्षमतेनुसार योग्य साठा असावा लागतो.

काही वस्तू मागविल्यावर त्या प्रत्यक्ष मिळण्यास वेळ लागतो. त्यामुळे पर्चेस ऑर्डर पाठविल्यापासून ते माल येईपर्यंतच्या काळात गोडावूनमधील त्या मालाचा साठा किमान पातळीपेक्षा (minimum stock level) खाली जाऊ देता येत नाही. अन्यथा उत्पादनात खंड पडू शकतो.

वस्तूचा वापर व येण्यासाठी लागणारा वेळ यांचा विचार करून नवा माल मागविण्यासाठी आवश्यक शिल्लक मालाची पातळी (reorder level) निश्चित केली जाते. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त मालाचा साठा करून ठेवणेही आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. कारण माल वापराविना पडून राहिला तर ती अनुत्पादक गुंतवणूक ठरते.

 जी गोष्ट कच्च्या मालाची तीच गोष्ट तयार प्रॉडक्टच्या बाबतीत लागू पडते. ज्या गतीने विक्री होते त्याप्रमाणातच उत्पादन करावे लागते. अन्यथा शिल्लक तयार प्रॉडक्टचा साठा अनुत्पादक  गुंतवणूक ठरते.

  यासाठी कच्चा माल व पक्का माल यांच्या साठ्याची तसेच त्यांच्यात होणार्‍या फेरबदलांची नोंद ठेवावी लागते. हे काम योग्य सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होऊ शकते.

Hits: 185
X

Right Click

No right click