मनाचे श्लोक ८१-९०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥

समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥८१॥

बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥

विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥८२॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥८३॥

विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वराचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ॥८५॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवूनि राहे ॥

तयावीण तो सीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥८६॥

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥

हरीभक्त तो शक्त कामास मारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥८८॥

जनी भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्य घोषे म्हणावे ॥

हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥८९॥

न ये राम वाणी तया थोर हानी ।
जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥

हरीनाम हे वेदाशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥९०॥

Hits: 401
X

Right Click

No right click