९० वेअ. भा. साहित्य संमेलन, डोंबिवली- २०१७
संमेलनाध्यक्ष डॉ अक्षयकुमार काळे
‘‘एरवी अशा मनाअभावी निर्माण झालेल्या लेखनाच्या प्रेरणा बहुधा बाह्य़स्वरूपाच्या, उथळ आणि बाजारू असतात; तथापि लेखकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की समकालीन सामान्य अभिरुचीचा, बाजारलक्ष्यी विचाराचा किंवा तशी विचार गणिते करण्यात प्रवीण असणाऱ्या प्रकाशकांच्या आग्रहाचा विचार करून आपले साहित्य; विशेषत: नाटके आणि कादंबऱ्या निर्माण करण्यापेक्षा आपले हृदय, मन, चित्त ज्या अनुभूतीने भारले गेले आहे तिचे मर्म समजून आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत वाङ्मयप्रकारात निर्मिती केल्यास तिला काही एक दर्जा मिळू शकेल. आपल्या समाजातील जातीयता, धार्मिकता, प्रादेशिकता, लिंगभेद, वर्णविग्रह आडमार्गाने साहित्यात शिरून पूर्वद्वेषाची आणि वैमनस्याची बीजे नव्याने पेरीत असतील तर ते साहित्य विकृत मूलतत्त्व वादाचे, जात्यंधतेचे, धार्मिक दुरभिमानाचे प्रतिनिधित्व करू लागेल.’’