८५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०१२, चंद्रपूर
८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१२, चंद्रपूर
यापूर्वी १९७९ साली वामन चोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. ८५ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद शांताराम पोटदुखे यांच्याकडे होते, तर वसंत आबाजी डहाके संमेलनाध्यक्ष होते.
>संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके
साहित्य संस्कृतीची निर्मिती आहे आणि साहित्यातून संस्कृतीचा आविष्कार होतो. संस्कृतीमधून कल्पनाप्रणालीही व्यक्त होते. मात्र एकच एक कल्पनाप्रणाली नसते, अनेक कल्पनाप्रणाली असतात. सामाजिक जीवनात अर्थाची, चिन्हांची आणि मूल्यांची निर्मिती करणारी प्रक्रिया म्हणजे कल्पनाप्रणाली अशी व्याख्या केली जाते. प्रभावी राजकीय सत्ता नियमित, कायदेशीर ठरवण्यासाठी प्रचारित केली जाणारी भ्रामक विचारसरणी अशी ही कल्पनाप्रणालीची एक व्याख्या आहे. कधी विशिष्ट सामाजिक गटाचा किंवा वर्गाचा विचारव्यूह म्हणजे कल्पनाप्रणाली असते आणि तो विचारव्यूह सर्वाचा असल्याचे भासवले जाते. कधी संस्कृती हा शब्द उच्चारला जात असला तरी तेथे विवक्षित कल्पनाप्रणाली अध्याहृत असते. एका भूभागात राहत असलेल्या सर्वाची एकच एक संस्कृती असते, असे मानणे हा देखील विशिष्ट कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाखाली होत असलेला आग्रह असतो.
भारतासारख्या विशाल भूभागात अनेक वर्षांपासून विविध वंशांचे, जातींचे, धर्माचे, विविध भूप्रदेशांतून आलेले लोक राहत आहेत. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत अनेक समूहांनी भिन्न समूहांशी जुळवून घेतलेले असले तरी आपल्या वंशाचे, जातीचे, भूभागाचे स्मरण आणि त्यानुसार आचरण कायमच ठेवलेले दिसते. त्यामुळे राष्ट्रवादाच्या प्रभावी कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाच्या काळातही आपापल्या वेगळेपणाच्या, आपल्या उपरेपणाच्या, आपल्या गुलामीच्या, समाजश्रेणीतील आपल्या खालच्या स्थानाच्या जाणिवांनी विद्रोहाच्या चळवळीही सुरू झाल्या होत्या. मराठी साहित्यातील मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे, दलित-आदिवासी-भटक्या-विमुक्तांची स्वकथने पाहिली तरी सांस्कृतिक भिन्नता लक्षात येते. जागतिकीकरणाच्या कल्पनाप्रणालीत सपाटीकरण अभिप्रेत आहे.
एक भाषा (व्यापाराची), एक संस्कृती (बाजारवादी), एक जीवनशैली (चंगळवादी), एक कला (सुशोभीकरणाची), एक साहित्य (करमणूकप्रधान), एक मूल्य (आर्थिकसंपन्नता), एक सत्ता (आर्थिक उदारीकरणवादी), असे हे सपाटीकरण आहे. अशा सपाटीकरणाला नकार देण्याची क्षमताही साहित्यादी कलांमध्ये असते.
Hits: 82