काळाची पायवाट

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आप्त आपुला कथिते तुम्हा गेलासे अतिदूर
आठवणीने मनात माझ्या उठलेसे काहूर . . . १

दिवस-मास अन्‌ वर्षही गेले सरूनि ते कैसे
परि मनास माझ्या वाटे जणू ते कालच घडले ऎसे . . . २

कडू-गोड जरि आठवणी मनी किती तरी त्या असती
परि सोडुनि द्याव्या कडू तरी त्या माणूस गेल्यावरती . . . ३

रक्ताचे हे नाते कधि ना तोडू म्हटल्या तुटते
जरि अनंत यत्ने ‘चल हट्‌’ म्हणुनी दूर सारिले त्याते . . . ४

जन्मा आल्या जीवा आहे खचित एक दिन जाणे
परि कधी कसे ते जगी कुणी ना रावरंकही जाणे . . . ५

अमरत्वाचा शिक्का घेऊनि जन्मा कुणी ना येते
जरि रूपसंपदा, पैसा अडका असता जवळी किती ते . . . ६

ठाऊक सकला पैसा म्हणजे चीज असे गरजेची
परि दोन गोड ते शब्द बोलण्या गरज नसे पैशाची . . . ७

पायवाट त्या काळाची ती दुस्तर अन्‌ बहुभलती
अखेरचा तो प्रवास करण्या वाट दुजी ना अंती . . . ८

आपण सारे सूज्ञ आहा हे ठाऊक मजला पुरते
परि रागालोभा त्यजिता येई मनुजा देवत्वचि ते . . . ९

सुस्मरणे त्या नमन करू या पवित्र मनमंदिरी ते
सन्मार्गासी अनुसरिता या समाधानही मिळते . . . १०

Hits: 163
X

Right Click

No right click