अखेरचे पर्व
अरे मम मना घेई समजुनी अखेरचे हे पर्व
नातीगोती नि घरदार हे विसरुनी जा तू सर्व . . . १
आजवरी जे विणले असती रेशीमधागेदोरे
वीण तयांची ह्ळूच उकलुनी दूर होई तू बा रे . . . २
बालपणीच्या गमतीजमती पुन्हा न हाती येती
मातपिता किती कोडकौतुके तुजला गोष्टी कथिती . . . ३
खेळ खेळता तुझिया संगे स्वयेचि हरवुनी जाती
शाळा-कॉलेज करिता तुजला उणे न भासू देती . . . ४
नोकरीधंदा करण्या तुजला सदैव साह्या करिती
यशवार्तेने तुझिया परि ते चिंब भिजुनिया जाती . . . ५
गृहस्थाश्रमी पडण्य़ा तुजला देती शोधुनी साथी
फूलपाखरी पंख लेऊनी दिवस उडोनी जाती . . . ६
चार करांचे होती कधी ते आठ हात ना कळती
चिमणपाखरांसंगे कशी ती वर्षे भुर्रकन् जाती . . . ७
म्हणता म्हणता चिमणपाखरे परदेशाला जाती
अवाढव्य त्या घरात आता दोनच व्यक्ती राहाती . . . ८
आयुष्याची तुझिया हळुहळू साठी-सत्तरी आली
छोट्या-मोठ्या व्याधींची ती संगतसोबत झाली . . . ९
आजवरी ना करण्या जमले जे जे तुजला काही
करूनी मनीचे दावी आता तूच सर्व ते काही . . . १०
वेळ तुझा तू लावी आता देवाजीच्या चरणी
ठाऊक नाही कधी घेई ती कुशीत तुजला धरणी . . . ११
Hits: 151