११. स्वदेशीचे व्रत - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

११. स्वदेशीचे व्रत - १

साने गुरुजी अंमळनेरला आले आणि त्याच दिवशी त्यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या फाशीचा निषेध करण्यासाठी मोठी सभा घेतली. या सभेत पुनश्च दहा-साडेदहा महिन्यांनी गुरुजींची ओजस्वी वाणी अंमळनेरकरांना ऐकायला मिळाली. या सभेत आणखी एक चित्तथरारक प्रसंग घडला. शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी १५ मे १९३० रोजी अंमळनेरच्या मल्हारी चिकाटे या बहाद्दराने भीम पराक्रम केला होता. पोलिसांच्या लाठ्या झेलून मिठागरावर हल्ला चढवला होता. त्या वेळी भयंकर लाठीमाराने मल्हारी बेशुद्ध पडला होता. जखमी झाला होता. मल्हारीचा अतुल पराक्रम पाहून त्या वेळच्या महाराष्ट्र सत्याग्रही मंडळाने त्याला 'कॅप्टन' अशी पदवी बहाल करून त्याचा गौरव केला होता. मल्हारी त्या सभेत होताच. गुरुजींनी त्या वेळी रक्ताने माखलेला मल्हारीचा सदरा सभेत आणला होता. तो लोकांना दाखवून साम्राज्यसत्तेची राक्षसी अमानुषता वेशीवर टांगली होती. गुरुजींनी मल्हारीच्या धैर्याचे गुणगान केले आणि त्या रक्ताने भरलेल्या सदर्‍याचा लिलाव पुकारला, सभेतल्या लोकांच्या भावना साम्राज्यविरोधी रोषाने सळसळत होत्या. तप्त झाल्या होत्या. एका महाभागाने १५०० रुपयांना तो सदरा घेतला.

गुरुजींची वाणी खानदेशात पुनश्च नवतेजाने घुमू लागली. दरम्यान गुरुजी तुरुंगातून सुटून आल्यानंतर एकदा पालगडला घरी जाऊन आले. गजाननदादा व वहिनी यांना भेटले. गुरुजींना १५ महिन्यांच्या शिक्षेबरोबरच २०० रुपये दंडाची शिक्षाही झाली होती. गांधी-आयर्विन करारामुळे गुरुजींची सुटका दहा-साडेदहा महिन्यांत जरी झाली होती, तरी ते तुरुंगात गेल्यावर त्यांच्या दंडाची रक्‍कम मात्र पोलिसांनी गजाननदादांकडून वसूल केली होती. कारण त्या वेळी गुरुजी आणि त्यांचे बंधू
यांचे एकत्र कुटुंबच मानलेले होते. हा त्रास आपल्यामुळे आपल्या भावांना होऊ नये व असा भुर्दंडही पुन्हा पडू नवे या हेतूने गुरुजींनी या मुक्कामात गजाननदादाला स्वत:च खरेदीखत करून देऊन एकत्र कुटुंबातल्या आपल्या वाटणीवरचा हक्‍क
सोडून दिला.

आणखी एक घटना याच मुक्कामात घडली. गुरुजींनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला आणि शिक्षाही भोगली; याचा अभिमान व कौतुक पालगडच्या ग्रामस्थांना वाटले आणि म्हणून गुरुजी गावात आलेले पाहून ग्रामस्थांनी आपल्या या पंढरीचा गणपतीच्या खेळात सभा भरवून सत्कारही केला. ५१ रुपयांची थैली पंढरीला त्यांनी या वेळी प्रेमाने दिली. गुरुजींनी ती थैली गावकार्यासाठी तिथेच ग्रामस्थांच्या हवाली करून टाकली. ग्रामस्थांनी त्यांचा गौरव केला होता आणि वर्षातून एकदा तरी आपल्या गावाकडे येत जा असा प्रेमळ आग्रहदेखील केला होता.

गुरुजी परत खानदेशात आले. त्यांच्या पायाची चक्रे पुन्हा फिरू लागली. लोकजागृतीची मशाल घेऊन ते खेड्यापाड्यांतून भाषणे देत, गाणी म्हणत फिरू लागले. १९३१ सालचा २ ऑक्टोबर जवळ येत होता. तो दिवस गांधी जयंतींचा.
गांधीजींनी सांगितले होते, वाढदिवस पाळावयाचा असेल तर तो “चरखा जयंती” म्हणून पाळावा. सर्वत्र सूतयज्ञ व्हावेत. हजारो चरखे फिरावेत. चरखा-संगीत घुमावे.

पूर्व खानदेश म्हणजे आताच्या जळगाव जिल्ह्याने गांधीजींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कोटी वार सूत अर्पण करण्याचा संकल्प केला होता. पण जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची जेव्हा सभा झाली, तेव्हा आपापल्या तालुक्यातून
सूत देण्याचे आकडे कार्यकर्तें कमी देऊ लागले. अशा कमी आकड्यांनी एक कोटी वाहायचा संकल्प कसा सिद्धीस जाणार? सभेत गुरुजी उठले आणि त्यांनी जाहीर करून टाकले, 'अंमळनेर तालुका २० लाख वार सूत देईल.' वीस लाख वार सूत हा काही कमी आकडा नव्हता. सहकारी चिंताग्रस्त झाले, पण आपल्या सोबत्यांना गुरुजी म्हणाले, 'तोंडून शब्द गेला तो गेला. आता माघार नाही. चला, कामाला लागा.' आणि तरुण सोबत्यांसह गुरुजींनी सूतयज्ञाच्या प्रचारासाठी खेडोपाडी पिंजून
काढली. सूतशाळा उघडल्या. नांदेड, मारवड, डांगरी अनेक गावांतून चरखे व टकळ्या फिरू लागल्या. विणकामाचीही व्यवस्था केली.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 131
X

Right Click

No right click