१४, भावनाशील छायाप्रकाश - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१४, भावनाशील छायाप्रकाश - २
गुरुजींच्या जीवनातील छाया-प्रकाश, आशा-निराशा त्यांच्या साहित्यातूनही प्रकट झाल्याशिवाय राहिलेली नाही. ते अतिहळुवार, भावनाशील होते. अत्यंत संवेदनशील मन त्यांना लाभलेले होते. त्यांच्या काव्यातून त्यांच्या वृत्तींचे दर्शन
होते, 'येवो वसंतवारा' नावाची अशीच एक सुंदर कविता 'पत्री' संग्रहात आहे. ही कवितादेखील गुरुजींनी या काळात कारावासातच लिहिलेली आहे-

नवजीवन प्रदाता । चैतन्य ओतणारा
सुकल्यास हासविता । आला वसंतवारा
आला वसंतवारा । वनदैन्य हारणारा
सुटला सुगंध गोड । भरला दिगंत सारा
रानीवनी बहार । आला फुलांफळांस
समृद्धी पाहुनिया । आनंद पाखरांस...

वसंत-स्पर्शाने सारी सृष्टी कशी नटली आहे, नव्या जोमाने उठली आहे, सगळीकडे कसा आनंद भरून राहिला आहे, संगीत कसे भरले आहे, हे सांगता सांगताच एखादी कळ यावी तसे गुरुजींचे कवीमन म्हणते --

सृष्टीत ये वसंत । परि मन्मनी शिशिर
मम जीवनी वसंत । येण्यास का उशीर
का अंतरी अजून । नैराश्य घोर राहे
का लोचनांमधून । ही अश्रुधार वाहे

परंतु ही नित्याची व्यथाही इथे घडीभराच्याच वस्तीला आलेली आहे. अंतर्मुख होऊन आपली असहायता निवेदिल्यावर पुढे प्रार्थना दिलेली आहे ती आशावंताची -

मम जीवनात देवा । येवो वसंतवारा
गळु देत जीर्ण पर्णे । फुटु दे नवा धुमारा

आणि असा वसंतवारा जीवनात आल्यावर कसे चैतन्य सळसळले ते पुढील ओळींत व्यक्त झाले आहे -

फुलतील वाळवंटे । हसतील शुष्क राने
नटतील भू उजाड । गातील पक्षी गाणे
जरी त्वत्कृपा वसंत । येईल जीवनात
चंडोलसा उडेन । संस्फूर्त गीत गात
त्वत्स्पर्श अमृताचा । मजला मृता मिळू दे
मम रोमरोमि रामा । चैतन्य संचरू दे
आता सदा दयेचा । सुटु दे वसंतवारा
फुलु देव जीवनाचा । जगदीश भाग सारा

तुरुंगातील कामें करता करता व लिहिता-वाचता चार महिने संपले आणि गुरुजींची धुळे तुरुंगातन १९३४ सालच्या जूनमध्ये सुटका झाली.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 124
X

Right Click

No right click