१६. किसान-कामगारांचे कैवारी -२

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१६. किसान-कामगारांचे कैवारी -२

खानदेशात अंमळनेर, धुळे, जळगाव व चाळीसगाव येथे कापडगिरण्या आहेत. गिरण्यांतील कामगारांचे गिरणीमालक शोषण करीत होते. ना भरपूर पगार, ना रहायला जागा. कामगारांत असंतोष धुमसत होता. कामगार संघटनेची न्याय हक्कासाठी लढा देण्याची तयारी चाललेली होती. अंतरीच्या कळवळ्याने गुरुजी त्या लढ्यात उतरले. 'पगारवाढ ताबडतोब' अशा घोषणांनी अंमळनेर, जळगाव, धुळे, चाळीसगाव ही सारे शहरे दणाणली. गुरुजींनी पुन्हा आपल्या शक्तीनीशी झुंज घेतली. कामगारांची मागणी मान्य झाली. कामगारक्षेत्रात उतरून गुरुजींनी भांडवलशहांशी दिलेला हा पहिला लढा यशस्वी झाला.

८ एप्रिल १९३८ रोजी हा लढा संपला. त्या आधी दोनच दिवस म्हणजे ६ एप्रिल १९३८ रोजी गुरुजींच्या 'काँग्रेस' पत्राचा जन्म झाला होता. प्रचारासाठी अशा पत्राची गुरुजींना फार आवश्यकता वाटू लागली होती. कितीतरी प्रश्‍न होते. त्यावर लिहिणे आवश्यक होते. गुरुजींनी पैशाची कशीबशी तुटपुंजी जुळणी केली होती. काँग्रेस साप्ताहिक दर सोमवारी अंमळनेरहून प्रसिद्ध होऊ लागले. गुरुजी त्यासाठी रात्र रात्र जागून लिहून देत असत. दिवसभर इतर संघटनांची कामे चालत.
खेड्यापाड्यांत जात असत. साप्ताहिक काढले, पण आर्थिक ओढाताण फार होऊ लागली. खप आणि खर्च यांचा मेळ जमेना. पण साप्ताहिकासाठी गुरुजी आपल्या सहकाऱ्यांसह शहराच्या निरनिराळ्या भागात झोळी घेऊन भिक्षा मागत असत. या वेळी म्हणण्यासाठी गुरुजींनी श्‍लोकही केला होता.

आम्ही सात वारातुनी एक वारी ।
असे येत जाऊ तुमच्याच दारी ।
विनंती अशी एक आहे तुम्हाला
स्वदेशार्थ भिक्षा घाला आम्हाला ॥

यावेळी 'काँग्रेस' पत्राचे अंकही खपवीत असत. दारुबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, सफाई, काँग्रेसचा संदेश, स्थानिक प्रश्‍न अशा अनेक विषयांवर गुरुजी लिहीत असत. किसान-कामगारांच्या गाऱ्हाण्यांना, अन्यायाला वाचा फोडीत असत.

त्याच सुमारास असेच एक टोल-टॅक्सचे प्रकरण उद्‌भवले होते. अंमळनेरच्या म्युनिसिपालिटीने खेड्यापाड्यांतून येणाऱ्या बैलगाड्यांवर टोल-टॅक्स लागू केला होता. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना भुर्दड पडणार होता. आधीच हलाखीची स्थिती.
गुरुजींना हा टॅक्स अन्यायी आहे असे वाटले व त्यांनी त्याविरुद्ध 'काँग्रेस' साप्ताहिकात जोरदार टीका केली. हा टॅक्स रद्द करावा अशी मागणी केली. म्युनिसिपालिटीने दाद दिली नाही, तेव्हा त्याविरुद्ध चळवळ करण्याची तयारी गुरुजींनी सुरू केली. त्यामुळे टॅक्स रद्द झाला. पण गुरुजींवर वरिष्ठ काँग्रेसवालेच रुष्ट झाले. 'आपले मंत्रिमंडळ असताना अशा चळवळी करू नयेत असे त्यांचे म्हणणे होते. गुरुजींचे त्यावर म्हणणे असे की, “देवाजवळही आपण हट्ट घरतो, गाऱ्हाणी मांडतो; मग काँग्रेस-मातेकडे प्रार्थना केली तर गुन्हा कसा ठरतो? गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे."

गुरुजींनी अशा प्रकारे अनेक तऱ्हेच्या अन्यायांना निर्भयपणे वेशीवर टांगले.

परंतु 'काँग्रेस' साप्ताहिकाची आर्थिक स्थिती काही ठीक नव्हती. गुरुजींना सारखी चिंता करावी लागे. तशातच एका लेखाबद्दल गुरुजी व प्रेसकडून सरकारने रोख रकमेचा जामीन मागितला. गुरुजींनी नाइलाजाने साप्ताहिक बंद करण्याचा
निर्णय घेतला. 'काँग्रेस' साप्ताहिक जवळ जवळ दोन वर्षे चालले होते.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 108
X

Right Click

No right click