१६. किसान-कामगारांचे कैवारी -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१६. किसान-कामगारांचे कैवारी -१

काँग्रेसचे ५० वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन महाराष्ट्रात आणि तेही फैजपूरसारख्या खानदेशातील एका खेड्यात घेण्याचे ठरले होते. अधिवेशनासाठी देशातून हजारो लोक व मोठे नेते येणार, तेव्हा पिण्याच्या पाण्यापासून ते सर्वांचे रहाणे-जेवणे, स्वच्छता, सभामंडप अशा सर्वच गोष्टी कराव्या लागणार होत्या आणि त्यासाठी खर्चही बराच येणार होता. काँग्रेसचे विरोधक तर म्हणून लागले होते, “फैजपूरचे फजितपूर होणार.” गुरुजी त्या वेळी पुण्यात होते. पण त्यांना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा ते अस्वस्थ झाले. 'खानदेशात काँग्रेस येत असता मी का इथे राहू ?' असे म्हणून ते निघाले आणि फैजपूरला दाखल झाले.

फैजपूरला 'टिळक नगर' बसवण्याची तयारी चाललेली होती. गुरुजी आले आणि त्यांनी तुफानी प्रचाराचे काम हाती घेतले. गुरुजींची वाणी खेड्यापाड्यांतून दुमदुमू लागली. गाणी, भाषणे यांचा त्यांनी नुसता पाऊस पाडला ! उन-वाऱ्याची
किंवा आपल्या शरीराची त्यांनी पर्वाच ठेवली नव्हती. बघता बघता त्यांच्याभोवती तरुणांची सेना उभी राहिली. पदयात्रेने गुरुजींनी गावन्‌गाव टिपले. स्वयंसेवक मिळवले. निधीही जमा केला. गुरुजींच्या प्रेरणादायी वक्तव्याने घराबाहेर न पडणाऱ्या भगिनीही पथक स्थापून गावोगावी निघाल्या. सारा खानदेश काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला,

भारतमाता माझी लावण्याची खाण ।
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान ॥

गुरुजी अशी स्वरचित गाणी म्हणत असत आणि सांगत असत, 'फैजपूरला चला. काँग्रेसची गंगा आपल्या घरात आली आहे. आपल्या देशाचे मोठमोठे पुढारी येणार, गांधीजी येणार, त्यांच्या दर्शनाला आणि त्यांचे विचार ऐकायला फैजपूरला चला. फैजपूरला जाऊ नका म्हणून पोलीस पाटील सांगतील, पण त्यांचे ऐकू नका...

आपली माता काँग्रेसमाता आपल्या घरी येत आहे. तिच्या स्वागताला आपण गुरुजींच्या या भावनाशील कळकळीच्या आवाहनाला लोकही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत असत. गुरुजींचा विनोबांशी या वेळी पुन्हा निकट संबंध
आला. खेड्याखेड्यांतून गुरुजी भाषणे देत फिरत होते. मन चैतन्यपूर्ण होते, पण शरीर थकून जायचे. बोलून बोलून गुरुजींचा घसा बसायचा. दुखायचा. विनोबा हे सारे पहात होते. मग ते गुरुजी येण्याची वाट पहात थांबायचे. रात्री कधीतरी गुरुजी यायचे. विनोबा त्यांना गाईचे तूप आणि थोडे मीठ घालून ते गरम पाणी प्यायला द्यायचे. गुरुजींचा घसा दुसऱ्या दिवशीच्या प्रचारासाठी मोकळा होई.

१९३६ चा डिसेंबर महिना होता. थंडीचा कडाका वाढू लागला. गुरुजी पहाटे उठले. प्रार्थना झाली. कुणीतरी शेकण्यासाठी निखाऱ्याने रसरसलेली शेगडी विनोबांपुढे आणून ठेवली. गुरुजी लांबच बसलेले. कुडकुडत. विनोबा शेगडी घेऊन
त्यांच्याजवळ आले. हसत हसत म्हणाले, “महंमद पर्वताकडे आला नाही, तर पर्वतानेच महंमदाकडे गेले पाहिजे!” गुरुजी संकोचून गेले.

अधिवेशनाचे दिवस जवळ येऊन ठेपले. बाहेरचे लोक येऊ लागले. प्रचार थांबला. गुरुजींनी हातात झाडू घेतला. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील सफाई पथकात सामील झाले. सफाईचे काम गुरुजींना फार आवडे. त्यांनीच म्हटले
आहे, “लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचे लालित्य प्रिय आहे.

अधिवेशनाच्या आधी कुणीतरी तरुणांनी गुरुजींना स्वागताध्यक्ष करावे असे म्हटले होते. पण गुरुजींना ते पसंत पडले नाही. स्वागताध्यक्ष होऊन भाषण करण्यापेक्षा त्यांना हे सफाई कार्य अधिक मनापासून प्रिय होते.

२७-२८ डिसेंबर १९३६ असे दोन दिवस अधिवेशन झाले. अध्यक्षपदी पं. जवाहरलाल नेहरू होते. गांधीजी, राजेंद्रप्रसाद, वल्लभभाई पटेल, मालवीय आदी नेत्यांची भाषणे झाली. अधिवेशन अत्यंत उत्साहाने, आनंदाने पार पडले, यशस्वी झाले. 'फैजपूरचे फत्तेपूर झाले!' या यशासाठी इतरांबरोबर गुरुजींनी अपार श्रम घेतले होते.

फैजपूरचे फत्तेपूर झाले आणि पुढे विधीमंडळाची निवडणूक आली. काँग्रेसने या निवडणुका लढविण्याचे ठरविले होते. गुरुजींनी यावेळी उभा खानदेश हीच आपल्या प्रचाराची समरभूमी मानली होती. खानदेशच्या भूमीत काँग्रेस विजयी झाली
पाहिजे. यासाठी गुरुजी पुन्हा सर्व शक्तीनिशी सिद्ध झाले. गावोगाव हिंडून भाषणे देऊ लागले.

“मी तुमचा उत्साह पाहून पवित्र होण्यासाठी आलो आहे. तुम्ही जागे आहात. पण तेवढ्याने भागणार नाही. सर्वांना जागे केले पाहिजे. तुम्ही उठा व दुसऱ्यांना उठवा. स्वत: पेटा व दुसऱ्यांना पेटवा, स्वयंसेवकांच्या हातात झेंडे द्या. आजुबाजूच्या गावांतून हिंडा, काँग्रेसचा सर्वत्र जयजयकार करा.” अशी भाषणे गुरुजी देऊ लागले. अशी गाणीही गाऊ लागले.

मतदारबंधू, तुम्ही काँग्रेसला मते सारे द्या रे
काँग्रेस सदा मरे, तुमच्यासाठी झुरे
तुमच्यासाठी ती लाठ्याही खाय रे ॥

निवडणूक संपली. प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले. ना. बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले. प्रांतात काँग्रेसचे मंत्रिमंडळ राज्य करू लागले. गुरुजी आपल्या कर्तव्यकर्मात बुडून गेले.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 92
X

Right Click

No right click