१५. भारतीय संस्कृती : अंतरंग दर्शन -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

सेनानी साने गुरुजी
राजा मंगळवेढेकर
प्रकाशक
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

१५. भारतीय संस्कृती : अंतरंग दर्शन

धुळे जेलमधून सुटल्यावर गुरुजी अंमळनेरला आले. त्या वेळी तिथे यात्रा सुरू होती. गुरुजींनी यात्रेत गीतेवर प्रवचने दिली. त्याच सुमाराला वरिष्ठ कायदेमंडळाच्या निवडणुका होणार होत्या. काँग्रेसतर्फे श्री. काकासाहेब गाडगीळ आणि श्री. केशवराव जेधे उभे होते. गुरुजींनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुन खेडोपाडी पायी फिरून पिंजून काढली. "काँग्रेसला मत म्हणजे स्वातंत्र्याला मत" हे लोकांना तेजस्वी भाषणांनी पटवून दिले. आपल्या कर्तव्याचे भान करून दिले. गुरुजींचा पायी फिरण्याचा लोकांच्या मनावर एवढा चांगला प्रभाव पडला की, मोटारीतून प्रचारासाठी येणाऱ्या विरोधकांना ते म्हणत, “ते काँग्रेसचे लोक पायी पायी उन्हातान्हातून येतात, तुम्ही मोटारीतून हिंडता. तुम्हाला का म्हणून आम्ही
मत द्यावे?” काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले. गुरुजींना आनंद झाला.

पुढे विनोबा खानदेशात आले. गुरुजींची भेट झाली. तेव्हा त्यांनी विचारले, "गुरुजी, आता पुढे काय करणार?” गुरुजींनी तरी कुठे काय ठरविले होते? मग विनोबांनीच पूर्व आणि पश्चिम खानदेशाच्या सीमेवर नावरा-नावरी येथे आश्रम काढून दिला. परंतु गुरुजींचे मन तिथे रमेना. एके ठिकाणी बसून तेच तेच कर्मकांड करीत राहण्याचा त्यांचा पिंड नव्हता. आश्रमातील यमनियम, कर्मकांड, बांधीलपणा गुरुजींना मानवणारा नव्हता. त्यांचे मन तिथे गुदमरू लागले. म्हणून एके दिवशी कुणाला न सांगताच ते तिथून निघाले नि पुण्यास आले. विनोबांना कळवले. त्या पत्रात असेही लिहिले की, “कुठेतरी देवासाठी जाऊन बसावे, असे मनात येते.”

विनोबांनी उत्तर लिहिले, “कुठे जाणार? तीर्थाचे पावित्र्यही राहिले नाही. आणि देव सभोवती नाही का? आजूबाजूचे लोक म्हणजे परमेश्वर, अशी भावना नसती तर मी कधीच हिमालयात निघून गेलो असतो!”

विनोबांच्या पत्राने 'जनीजनार्दन' पाहून 'दरिद्रनारायणाची सेवा करीत राहण्याचे गुरुजींनी ठरविले. पुण्यात ते खानदेशातील मुलांची सेवा करू लागले. अंमळनेरला त्यावेळी कॉलेज नव्हते. त्यासाठी पुण्यात यावे लागे, पुण्यातला खर्च गरीब
विद्यार्थ्यांना परवडत नसे. गुरुजींनी अशा चार मुलांच्या शिक्षणास हातभार लावला. एका खोलीत पुण्यास त्या विद्यार्थ्यांसह ते रहात असत. 'एकदा खानदेशातील मित्र आले. त्या वेळी गुरुजी पंचा नेसून स्वयंपाक करत होते. मित्र चकित झाले. म्हणाले, "गुरुजी, हे काय चालले आहे?” गुरुजींनी सांगितले, “इथे मी मुलांची आई होऊन राहिलो आहे.” जेवू-खाऊ घालून मुले कॉलेजात गेली, म्हणजे आवराआवरीनंतर गुरुजींना दुपारचा वेळ लिहायला मिळत असे. या काळात गुरुजींनी लिहिलेले महत्त्वाचे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृती".

साने गुरुजींनी मुलांसाठी उदंड लिहिले. तसेच तरुण-प्रौढांसाठी कादंबऱ्या, कविता, चरित्रे आणि रवींद्रनाथ, राधाकृष्णन, भगिनी निवेदिता, टॉलस्टॉय आदी थोरांच्या चिंतनात्मक ग्रंथांचे अनुवादही केले. गुरुजींची “श्यामची आई” तर
महाराष्ट्राच्या घराघरांत गेली. ती सर्वांचीच आई झाली. “श्यामची आई” या पुस्तकाच्या खालोखाल गुरुजींचे अत्यंत लोकप्रिय असे पुस्तक म्हणजे “भारतीय संस्कृती” हे होय. भारतीय संस्कृतीचे एवढे सुलभ, सुबोध दर्शन कुणीच घडवलेले
नाही. भारतीय संस्कृतीच्या प्रास्ताविकातच गुरुजींनी प्रारंभास म्हटले आहे, “एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार ब संदर्भ, वचने वगैरे येथे
काहीएक नाही. येथे प्राच्यविद्या, विशारदत्व नाही, घनगंभीर, गूढ काही नाही.”

या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे आणि ही दृष्टीच गुरुजींनी या ग्रंथात आपल्या रसाळ आणि काव्यात्म भाषेत विशद केली आहे. या ग्रंथात काय नाही, या नकाराची मोठी यादी दिल्यानंतर गुरुजींनी या ग्रंथात काय आहे हे मात्र
थोडक्‍यातच पण अत्यंत मार्मिक शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात, “भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.” या गाभाऱ्यात प्रवेश करताना गुरुजींनी मातृहृदयाच्या जिव्हाळ्याने व वात्सल्याने नवागतांचे हळुवारपणे बोट धरून नेलेले आहे.

“भारतीय संस्कृती” असा शब्दोच्चार आपण उठता-बसता किंवा चालता-बोलता करीत असतो. पण भारतीय संस्कृतीचा नेमका आशय सर्वसामान्यांना क्वचितच ठाऊक असते. गुरुजींनी हेही ध्यानात धरून या ग्रंथाच्या प्रास्ताविकात आपला
हा अंथ लिहिण्यामागील हेतूच स्पष्ट केला आहे. गुरुजी लिहितात, “भारतीय संस्कृती हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. 'हे भारतीय संस्कृतीस शोभत नाही', 'हे भारतीय संस्कृतीस हानिकारक आहे' वगैरे वाक्ये लेखात व भाषणात
आपणांस वाचवयास व ऐकावयास मिळतात. अशा वेळेस “भारतीय संस्कृती या शब्दांचा अर्थ काय असतो? तेथे भारतीय संस्कृतीचा इतिहास अभिप्रेत नसतो. भारतीय संस्कृतीची एक विशेष दृष्टी तेथे अभिप्रेत असते. ही दृष्टी कोणती? भारतीय
संस्कृतीची ही दृष्टी दाखविण्याचा येथे मी प्रयत्न केला आहे.”

अशा प्रकारे ज्या धन्याचा हा माल आहे, त्याची कृतज्ञतापूर्वक पावती दिल्यावर भारतीय संस्कृतीची मी पुढे सविस्तर निबंधातून ओळख करून दिलेली आहे, तीच किंवा तिचे वैशिष्ट्यरूप-स्वरूप या प्रास्ताविकातच गुरुजींनी नोंदवून ठेवले आहे, ते असे : “भारतीय संस्कृती हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदारभावना व निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. ज्ञान-विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे कर्म-ज्ञान-भक्तीचा जिवंत महिमा. शरीर, बुद्धी व हृदय यांना सतत सेवेत झिजवण्याचा महिमा..”

“भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता, भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग, भारतीय संस्कृती म्हणजे स्थितिशील न रहाता सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे. जगात जे जे काही सुंदर, शिव व सत्य दिसेल ते ते घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे. जगातील सारे ऋषीमहर्षी ती पुजील. जगातील सर्व संतांना ती वंदील. जगातील सर्व धर्मस्थापकांना ती आदरील. मोठेपणा कोठेही दिसो, भारतीय संस्कृती त्याची पूजा करील. आदराने व आनंदाने त्याचा संग्रह करील..”

“भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे..”

“सर्वेषां विरोधेनं ब्रह्मकर्म समारभे” असे म्हणणारी ती संस्कृती आहे. संकुचितपणाचे वावडे असणारी ही संस्कृती आहे आणि म्हणूनच भारतीय संस्कृती म्हणताच माझे हात जोडले जातात. भारतीय संस्कृती म्हणताच सागर व अंबर या दोन महान वस्तू माझ्या डोळ्यांसमोर उभ्या रहतात. प्रकाश व कमळ या दोन दिव्य वस्तू डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक या गोष्टी आठवतात. भारतीय संस्कृती म्हणजे सान्तातून अनंताकडे जाणे, अंधारातून प्रकाशाकडे जाणे, भेदातून अभेदाकडे जाणे, चिखलातून कमळाकडे जाणे, विरोधातून विकासाकडे जाणे, विकारातून विवेकाकडे जाणे, गोंधळातून व्यवस्थेकडे जाणे, आरडाओरडीतून संगीताकडे जाणे. भारतीय संस्कृती म्हणजे मेळ, सर्व धर्माचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञानविज्ञानांचा मेळ, सर्व काळांचा मेळ. अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी, सर्व मानवजातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी अशी जी थोर संस्कृती तिचाच लहानसा निदान मानसिक तरी उपासक मला जन्मोजन्मी होऊ दे, दुसरी कोणतीही इच्छा मला नाही.”

Hits: 92
X

Right Click

No right click