२३. आंतरभारतीचा ध्यास

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------



सेनानी साने गुरुजी

लेखक - राजा मंगळवेढेकर

प्रकाशक
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

माझ्या मनात भारतीय भाषांचे नेटवर्क उभे करण्याची कल्पना आली त्यावर लेख लिहिला. आज वराल पुस्तकातील आंतरभारतीचा लेख वाचला आणि ज्ञानदीपचा हा उपक्रम यशस्वी झाला तर पूज्य सानेगुरुजींचे अधुरे स्वप्न साकारहोईल असे वाटले. आपल्या माहितीसाठी हा लेख खाली देत आहे.

२३. आंतरभारतीचा ध्यास

“आंतरभारती' हे गुरुजींनी आपल्या हृदयाशी बाळगलेले एकात्म भारताचे महन्‌-मंगल असे सुंदर स्वप्न होते. भारताच्या विविधतेमधून एकतेचे दर्शन घेण्याची 'अविभक्तं विभक्तेषु' अशी ही थोर दृष्टी होती. या आपल्या स्वप्नाच्या पूर्तीला
थोरामोठ्यांचा हातभार लागावा म्हणून पुणे येथे आचार्य जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनासाठी गुरुजी गेले होते. संमेलनात गुरुजींनी 'आंतरभारती'चा ठराव मांडला होता. या ठरावावर गुरुजींनी जे कळकळीचे भाषण केले होते. ते ऐकून सारे साहित्य रसिक प्रभावित झाले होते.

संमेलनाच्या आधी 'साधने'च्या एका अंकात गुरुजींनी 'आंतरभारती'विषयी लिहिताना म्हटले होते :

“१९३० साली आम्हाला त्रिचनापल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. अंमळनेरच्या हायस्कूलमधील नोकरी सोडून मी सत्याग्रहात सामील झालो होतो. आमच्या शाळेत एक बंगाली मित्र होते. त्रिचनापल्लीच्या तुरुंगातील एक मित्र
श्री. व्यंकटाचलम्‌ सुटणार होते. त्यांना तमीळ, तेलगू, मल्याळम भाषा येत होत्या. ते बी. एससी. होते. मी अंमळनेरच्या मित्रांना लिहिले, “त्यांना आपल्या शाळेत घ्या. बंगाली मित्र आहेत. हे दक्षिणेकडील एक मित्र होतील. आपली शाळा भारतीय ऐक्याचे प्रतीक होवो. त्या त्या प्रांताची भाषा कानी येईल. त्या त्या प्रांताची संस्कृती, वाड्मय सारे कळेल. तेव्हापासून माझ्या मनात स्वप्न होते की, केव्हातरी अशी संस्था काढायची, जी भारताचे ऐक्य शिकवील, अनुभवील. आपण अखंड भारत म्हणत आलोत, परंतु या भारताचे आपणांस ज्ञान नाही. हे सारे प्रांत माझे भाऊ. सर्वांना भेटेन, सारे अभ्यासीन, असे आपणास कोठे वाटते?

महात्माजी देशातील निरनिराळ्या भाषा वेळात वेळ काढून अभ्यासीत. पू. विनोबाजी तेच करीत आले. आपणापैकी कितीकांना ही तहान आहे? मुंबईत रशियन, जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकवायची सोय आहे; परंतु अशी संस्था नाही; जेथे सकल भारतीय भाषा शिकता येतील. परंतु आंतरभारती संस्था स्थापण्याचे माझे कधीपासूचे स्वप्न. सुंदरशी जागा असावी, सरकारजवळ मागावी किंवा कोणा भल्या सज्जनाने दिली तर कृतज्ञतेने घ्यावी. त्या त्या प्रांतीय भाषेतील वाड्मय तेथे राहील. संस्थेला जोडून विद्यालय असावे. शेती, हस्तोद्योग असावेत. भारतीय भाषा शिकविण्याची तेथे सोय होईल. विदयार्थ्यांच्या कानांवर सर्व भाषा पडतील. त्या त्या साहित्यांचे मराठीला परिचय करून देण्यात यावेत. इतर भाषांतूनही मासिके काढून त्या त्या प्रांतीयांना सकल भारताची ओळड करून द्यावी. असे माझे स्वप्न.

गुरुदेव रवींद्रनाथ विश्वकवी. त्यांनी विश्वभारती स्थापिली. जगाचा नि भारताचा संबंध असू दे. पूर्व ती पूर्व, पश्चिम ती पश्चिम असे नाही. पूर्वेकडून निघाला तो पश्चिमेला भेटतो, पश्चिमेकडून निघाला तो पूर्वेला भेटेल. पृथ्वी वाटोळी आहे. पूर्ण आहे. भारत विश्वाच्या ऐक्याचा अनुभव घेण्यासाठी आहे. स्वत:चा अनुभव घ्या. भारतातील प्रांतांची तरी एकमेकांस ओळख कुठे आहे? त्या त्या प्रांताचे सांस्कृतिक कार्य, नवसर्जन आपणांस कोठे आहे माहीत? आंतरभारती भारतीयांना एकमेकांची भक्तिप्रेमाने ओळख करून देईल. त्या त्या प्रांतातील सर्व क्षेत्रातील थोरामोठ्यांच्या तेथे तसबिरी राहतील; हे सारे नवभारत निर्माते असे नवपिढीला सांगण्यात येईल.

“साहित्याबरोबर तेथे चित्रकला, नृत्यकला यांचाही अभ्यास असावा. सहकारी शिक्षण दिले जावे. नवभारताच्या निर्मितीचे ते एक तीर्थक्षेत्र असावे. माझ्या डोळ्यांसमोर सुंदर स्वप्न आहे. प्रांतभारतातील मुले सुट्टीत खेडोपाडीत जातील. मेळे, संवाद करतील. स्वच्छता करतील. प्रांतभारतीतून सहकारी चळवळ फैलावायला ध्येयवादी तरुण बाहेर पडतील. ग्रामीण कला तेथे फुलतील. कोकणातील काटखेळ, नाना नाच तेथे अभ्यासिले जातील. मौज, आनंद ! सेवा, संस्कृती, उदारता, ज्ञान, विज्ञान, कला अशी एक गंभीर प्रकृती आंतरभारती निर्मू.

परंतु हे स्वप्न कृतीत कसे आणावयाचे ? महाराष्ट्रभर भिक्षा मंडळे स्थापावीत आणि गीतेवर प्रवचने देत सर्वत्र हिंडावे, शेवटच्या दिवशी आंतरभारतीसाठी मदत मागावी, अशी योजनाही गुरुजींच्या मनात घोळत होती.

त्या काळी आंतरभारतीची आवश्यकता आणखी एका कारणामुळे गुरुजींना तीव्रतेने लागली होती. स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यास काँग्रेस पूर्वीच वचनबद्ध झालेली होती. स्वातंत्र्यानंतर त्या त्या प्रांतातला
कारभार त्या त्या भाषेत चालावा, तिथल्या सामान्य माणसाला सर्व क्षेत्रात आपल्या मातृभाषेचा वापर करण्याची संधी मिळावी; त्या त्या भाषेची साहित्य, कला, संस्कृतीविषयक समृद्धी वाढावी आणि या द्वारा तिथल्या माणसाची अस्मिता जागावी हे इष्टच होते. परंतु इष्ट ते घडत असताना अनिष्टही टाळणे आवश्यक होते. त्या त्या प्रांतातील माणसांची प्रांतीय भावनाच वाढीस लागून अतिरिक्त प्रांताभिमानात तिचे पर्यवसान होऊ नये, भारताच्या एकात्मतेला ती बाधक ठरू नये याची खबरदारी घेणे आवश्यक होते. भाषावर प्रांतरचनेमधील प्रांतीय दुरभिमान वाढीस लागण्याचा धोका लक्षात घेऊनच गुरुजींनी पुढे असे म्हटले होते :

“आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभी रहायची आहे. भाषावर प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे. परंतु अशी रचना केली जात असताना द्वेष, मत्सर न फैलावोत, परस्पर प्रेम राहो, सहकार्य राहो, भारताचे हृदय एक आहे ही जाणीव
सर्वांना राहो. परमेश्वराला सहस्रशीर्ष, सहस्राक्ष अशी विशेषणे आपण देतो. परंतु सहस्रहदय असे विशेषण कधीच नाही आढळत. परमेश्वराला हृदय एकच, त्याचप्रमाणे भारताचे प्रांत अनेक झाले तरी अंत:करण एक असो.

“आंतांनी भारती व्हावे व भारताने अतिभारती व्हावे. आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नवे. व्याप वाढवाल तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा.”

पुढे भाषावर प्रांतरचना झाल्यावर सरहद्दी, नद्यांचे पाणी, कारखाने, विविध प्रकल्प इत्यादी गोष्टींवरून राज्याराज्यांमध्ये उद्भवलेले तंटे आणि त्यावरून प्रकट झालेली प्रांतीय भावना हा एक चितेचाच विषय बनला आहे. त्यासाठीच अखिल
भारतीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करण्याची पाळी सरकारसह सर्व विचारवंतांवर आली. ही घटना चांगली असली तरी या एकाच गोष्टीवरून गुरुजींच्या दृष्टेपणाची कल्पना येते. ही भावी समस्या स्वातंत्र्याच्या उष:कालीच गुरुजींनी जाणून घेऊन 'आंतरभारती'चा उपाय, मार्ग सुचवलेला होता ! गुरुजींची 'आंतरभारती' ही भारतीयांच्या दृष्टीने एक अत्यावश्‍यक अशी ज्वलंत जीवननिष्ठाच आहे! भारत ऐक्याची तहान असलेली व्यापक जाणीव आहे! भारतीय जीवन समृद्धीची विशाल दृष्टी आहे! आणि म्हणूनच गुरुजींनी आपली ही कल्पना अधिक विशद करताना पुढे म्हटले आहे :

“केवळ भाषांचा अभ्यास हेच काही या संस्थेचे ध्येय नव्हे. तेथे दुसऱ्याही अनेक चळवळी जोडाव्या असे मनात आहे. कला आणि ग्रामीण जीवन यांचा तेथे अभ्यास व्हावा. धंद्यातून कला कशी नेता येईल, ते येथे कलावान सांगतील. साध्या चटयाच विणायच्या परंतु त्यांच्यात सुंदरता कशी आणता येईल, साध्या बांबुच्याच टोपल्या परतु त्यात कला कशी मिसळता येईल, साधी मातीची भांडी परंतु ती रमणीय कशी करता येतील, हेही येथे अभ्यासिले जावे, शिकविले जावे. म्हणून उद्योग तज्ज्ञ व कलावान यांना येथे सन्मानाचे स्थान राहील. नाना प्रकारचे नृत्य प्रकार, तेही तेथे संग्रहित करून त्यांचा प्रचार करू. सहकारी जीवनाचे शिक्षण देऊ. जर संस्थेभोबती बरीच जमीन असेल तर्‌ फुलझाडे, शेती, फळझाडे यांचे प्रयोग करू. विद्यार्थी श्रमतील, नवीन नवीन निर्माण करतील. भाझ्या मनातील स्वप्न अनंत आहे...” तथापि, “कोठून तरी राष्ट्राचे महान ऐक्य जीवनात अनुभविण्याचे मंगल प्रयत्न होवोत' एवढीच तहान अखेरच्या दिवसांत त्यांना होती.

-----

ज्ञानदीपला आपल्या भावी प्रगतीसाठी पूज्य साने गुरुजींनी दिलेला हा भावी आराखडाच आहे. असे मी मानतो. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 174
X

Right Click

No right click