दख्खनची दौलत - ६
गांधीवधानंतर दक्षिणेतील कारखाने आणि उद्योगधंद्याच्या जाळपोळीने फार मोठा धक्का बसला; पण त्यामधून डोके वर काढून पुन्हा उद्योग उभारण्याची ईर्षा त्या मंडळीत निर्माण व्हावी म्हणून शंकरभाऊंचे सतत प्रयत्न असत. उद्योग सुरू करायचा म्हणजे पहिला प्रश्न वीज मिळण्याचा असायचा. योग असा, की किर्लोस्कर मासिकाच्या १९४७च्या दिवाळी अंकामध्ये 'कोयनेची देणगी' हा माहितीपूर्ण व त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेल्या आश्वासनाचा लेख सिद्ध झाला. कऱ्हाडजवळ कृष्णा व कोयना यांचा संगम होतो खरा. परंतु तत्पूर्वी सह्याद्रीत उगम पावलेली दक्षिण वाहिनी कोयना हेळबाकजवळ पूर्ववाहिनी होते. सबब हेळवाक हे ठिकाण कोयनेला धरण घालण्यास योग्य आहे असे २५ वर्षांपूर्वी टाटांच्या लोकांनी नमूद केले होते; पण त्यावेळी ते शक्य झाले नाही. शंकरभाऊ दक्षिणी कारखानदार संघाच्या मंडळींना हेळवाकला घेऊन गेले आणि तेथील अनुभवी इंजिनीअर श्री. मनोळीकर यांनी तक्ते, नकाशे यांच्या साह्याने सर्व गहिती सांगून महाराष्ट्रात किती लांबपर्यंत वीजपुरवठा होईल याची खात्री करून दिली. वीज पुरवठ्याची खात्री पटताच सभासद अतिशय उत्साहाने विविध उत्पादनांची निर्मिती करू लागले आणि त्यांच्या उत्पादनांचे ''दख्खनची दौलत'' या नावाचे भव्य प्रदर्शन सर्वांच्या प्रयत्नाने कोल्हापूर येथील खासबाग मैदानावर उभे केले. आत्मारामपंत ओगले या नावाचे कोल्हापूरच्या कलादृष्टीला साजेलसे भव्य प्रवेशद्वार आणि त्याच्या जवळच असलेला औद्योगिक महाराष्ट्राचा उठावदार नकशाही सर्वांचे लक्ष वेधत होते. त्यातील ७५ स्टॉल्स दक्षिणेतील कारखान्यांचेच होते. याच सुमारास शंकरभाऊंनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्रांती ही पुस्तिका प्रसिद्ध वली.
त्यातील काही मजकूर पुढे देत आहोत.
बाबुराव पेंटर यांनी महात्मा गांधी यांचा २५ फूट उंच पुतळा केला होता. महाराष्ट्राचे राजकीय पुढारी, तसेच डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातील लहान-मोठे उद्योजक एकत्र आले होते. त्यांच्यात खेळीमेळीचे संबंध-सर्व भेदभाव विसरून-निर्माण झाले होते. एक लाखापेक्षा जास्त मंडळ
प्रदर्शन पाहून गेली. १९५० मध्ये प्रदर्शन ज्यासाठी भरवले तो उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न सफल झाला; पण आता कोयना धरणाची योजना यशस्वीहोईल तरच स्वस्त विजेचा पुरवठा कसा होईल, ही काळजी निर्माण झाली होती. त्यासाठी कोयना योजनेवर महाराष्ट्रांतील सर्व वर्तमानपत्रांतून लेख प्रसिद्ध केले.
तेव्हा दक्षिण महाराष्ट्र संधाने पुढाकार घेऊन १६ मार्च १९५२ रोजी हेळंवाक येथे कोयना परिषद घेतली. या आडवळणी ठिकाणी परिषदेला सहाशेच्यावर प्रतिनिधी
आले. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय माणसांची खात्री पटत नाही. भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, पां. वा. गाडगीळ, आण्णासाहेब खाडिलकर, वसंतराव पाटील, ना. ग. गोरे, इंदिराबाई मायदेव, मामा दाते, भाऊराव पाटील, मीनाक्षी साने, यमूताई किर्लोस्कर, शंकरराव ओगले अशी समाजजागृत मंडळी तेथे आली होती. आचार्य अत्रे म्हणाले, '' आजच्या परिषदेइतकी उपयुक्त परिषद महाराष्ट्रात कधी भरलीच नव्हती. मी कोयनेचे, तिच्या तीरावरील डोंगरांचे चित्र पाहिले आणि मनोळीकरांनी तर माझ्यापुढे धरणाचे चित्र मूर्तिमंत उभे केले.'' ''लक्षावधी लोकांना पाणी मिळेल, प्रकाश मिळेल, व्यवसाय मिळेल अशी ही अलौकिक योजना आहे.'' असे उपमुख्यमंत्री भाऊसाहेब हिरे यांनी सांगितले. त्या काळात मुंबईत द्वैभाषिक राज्य होते. राष्ट्रपती भवनांत प्लॅनिंग कमिशनपुढे कोयनेची बाजू मांडण्याचे काम डॉ. धनंजय राव गाडगीळांनी उत्तम रितीने केले. कोयना योजना मान्य होऊन महाराष्ट्राचे उदिष्ट तडीस गेले. पुढे नोव्हेंबर महिन्यात मुंबईत मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते कोयना धरणाया पाया घातला गेला. डेक्कन मॅन्यु. असोसिएशनच्या निरनिराळ्या ठिकाणी सभा होत. अनेक लहान-मोठ्या योजना विकासास मदत करण्यासाठी असत. पुणे, मिरज, कोल्हापूर रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करता आले, त्यामुळे कच्च्या मालाची चढउतार टाळता आली. औद्योगिक विकासाकडे जसे शंकरभाऊंचे लक्ष असे तसेच आपल्या परिसरातील माणसांच्या जीवनात सदैव उत्साही व चैतन्यशील वातावरण करणे त्यांना छान जमत असे.
आपल्या परिसरातून टेरीटोरिअल आर्मीसाठी रिक्रूट मिळवून देताना शंकरभाऊ नागरिकांना लुट्पुटूची लढाई कशी होते याचं स्वरूप दाखवीत. विविध कलावंत, गायक, वादक, नकलाकार यांचा आदरपूर्वक सन्मान करून, त्यांच्या कलेचा आनंद वाडीतील लोकांना मिळवून देत.
किर्लोस्कर प्रेस १९५९ साली पुण्यात आला. त्यानंतर 'स्त्री'च्या ४०० व्या अंकाचं प्रकाशन त्यांनी केले. 'सकाळ'च्या नानासाहेब परुळेकरांनी 'सकाळ'च्या
रौप्यमहोत्सवामध्ये शंकरभाऊंचा 'सन्मान्य संपादक' म्हणून जाहीर सत्कार केला.
लक्ष्मणराव (काका) बेंगलोर येथे मुलाकडे गेलेले आणि किर्लोस्करांचे नवे कारखाने पुणे-हरिहर, बेंगलोर अशा गावांतून विस्तारित झालेले. त्यामुळे किर्लोस्कर वाडीत शंकरभाऊ व अनंतराव असे दोघेच ज्येष्ठ अधिकारी राहिले. १६ डिसेंबर ४४ ला युनियनने संपाची नोटीस दिली. दादासाहेब मावळंकरांसारखे लवाद मिळून युनियनने तीन वर्ष नवी मागणी करता कामा नये हे मान्य केले.
१९४५ मध्ये पुन्हा युनियनने संप पुकारला. कारखान्याची घरघर थांबली. रस्त्यावरील नागरिकांची ये-जा मंदावली; पण कारखान्याचे रोज येणारे टपाल पाहणे, त्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक होते. मुख्यत: रेल्वे वॅगनमधून रोज येणारा कोळसा, लोखंड वगैरे जड माल उतरवून घ्यावा लागे. त्यासाठी संपात सामील न झालेले ऑफिसर्स, इंजिनिअर्स, कारकून अशा शंभर लोकांनी पुढे होऊन ही कामे निभावली.
८ दिवसांनी वाडीमधील घरांना खेड्यातून येणारे दूध, भाजीपालाही बंद झाला. शंकरभाऊंनी शंकरराव देव यांना परिस्थितीची कल्पना दिली व कामगार नेते र. के. खाडिलकर यांनी वाडीला येऊन सारे अत्याचार पाहिल्यावर ही कामगार चळवळीची तऱ्हा योग्य नाही हे सांगून वाडीबाहेरच्या मळ्यात कामगारांची सभा बोलावली व संप मागे घेण्याचा आदेश दिला.
पण १ ऑगस्ट ४९ला दुपारचे काम सुरू झाल्यावर दोन तास झाले नाहीत तो मशिन शॉपची यंत्रे थांबली. शंकरभाऊंनी तेथे जाऊन पाहिले तो इंजिनीयर एन. के. जोशी यांना तिथल्या १५० कामगारांनी वेढा घातला होता व बेभान होऊन ते ओरडत आणि दंगा करीत होते. शंकरभाऊ रेटारेटीत जोशी यांच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि 'कामगारांनी बाहेर पडून काय म्हणणे आहे ते सांगावे, ते मी ऐकून घ्यायला तयार आहे' असे सांगितले. मग गर्दी हटून जोशींची सुटका झाली. पण वातावरण शांत होण्याचे चिन्ह नव्हते. सर्वत्र अत्याचाराची वृत्ती बोकाळत होती.
Hits: 147