दख्खनची दौलत - ४
त्या माळरानाचे स्वरुप संपूर्णत: बदलून तिथे सुख, स्वास्थ्य आणि समता यांची बाग उठवायची, तर त्याकरिता तिथली सारी काटेरी झाडे तोडली पाहिजेत, झाडून साऱ्या निवडुंगाचा नायनाट केला पाहिजे, प्रसंगी त्यातून फुसफुसत बाहेर येणाऱ्या सापांना ठेचून टाकले पाहिजे, हे उघड होते. पूर्वी हे कार्य आगरकरांच्या ''सुधारका''ने अविचल निष्ठेने आणि प्रभावी लेखणीने केले होते. पण आगरकरांच्या मृत्यूनंतरच्या पाव शतकांत ती परंपरा खंडित झालो होती. १९२० नंतरच्या दोन तपांत ''किर्लोस्करा''ने ते काम मोठ्या हिरीरीने केले. बुवाबाजीविरूद्ध ''किर्लोस्करा''ने उचललेले हत्यार व ''अभिसार ' या कथेच्या निमित्ताने झालेले वादळ आणि त्या वादळाला तोंड देतांना ''किर्लोस्करा''ने घेतलेली भूमिका यांची चांगली आठवण अजूनही तत्कालीन वाचकांना असेल केवळ सामाजिक सुधारणेला वाहिलेले होते असे नाही. त्यात सुधारणांचा जो पुरस्कार केला जाई त्याचे स्वरुप मोठे जहाल होते असेही नाही. असे असूनही ''किर्लोस्कर'' मासिकाविरुद्ध सनातनी मंडळींनी जेवढा गिल्ला करायचा तेवढा केलाच याबाबतीत शंकररावांनी आपली भूमिका पुढील शब्दात स्पष्ट केली आहे. ''मी ज्या विचारांचा पुरस्कार करतो, ते उगीच कुणाच्या खोड्या अगर कुचाळक्या करण्यासाठी मुळीच नाही, नव्या कल्पनांना प्रथम लोकांचा विरोध व्हायचाच. आम्ही लोखंडी नांगर केले, त्यालासुद्धा सुरवातीला विरोध झालाच ना? किर्लोस्करवाडीतून अस्पृश्यतेचं उच्चाटन केलं ही तरी जुन्या माणसांना आवडणारी गोष्ट थोडीच होती? म्हणून ही सुधारणा आपण थांबवायची की काय? शिवाय ज्या सुधारणा नव्या वाटतात, त्या दोन दिवसांनी अंगवळणी पडल्या म्हणजे त्याचा कोणीसुद्धा विचार करीत नाही.''
''किर्लोस्कर'' मासिकाने घेतलेली ही सुधारकाची भूमिका कोणत्याही दृष्टीने आत्यंतिक स्वरुपाची नव्हती हे यावरून सहज दिसून येईल. प्रत्येक आठवड्याला जीर्ण धार्मिक आणि सामाजिक मतांवर घणाचे घाव घालणारे आगरकर १८९०-९५ च्या काळांत सनातनी समाजांत आप्रिय झाले याचे कारण आपल्याला सहज कळू शकते. पण त्यानंतर तीन तपांनी ''किर्लोस्करां''ने बुवाबाजी, क्षेत्रबाजी, जातीयवाद, स्त्रियांचे दास्य, दैनंदिन जीवनांतील विसाव्या शतकाला न शोभणारा धर्मभोळेपणा, निराधार विज्ञान-विन्मुखता आणि उथळ तंत्रविरोध यांच्याविरुध्द हत्यार उगारतांच ती आगरकरांची पांचबारी बंदूक नव्हती, साधे पिस्तुल होते तोच विरोध त्याच्या वाट्याला आला! याचे मुख्य कारण एकच आहे. या मधल्या दीर्घ कालांतसुद्धा समाजाचे मन विचारप्रवण झाले नव्हते. काळाच्या ओघांत वाहत जातजात त्याने काही सुधारणांचा स्वीकार केला होता. पण जाणूनबुजून, बुद्धीच्या कसोटीवर घासून आणि भावनेच्या रेशमी वस्त्राने पुसून, नको ते जुने टाकायला व हवे ते नवे घ्यायला जी विवेकनिष्ठा लागते, जो सामाजिक आत्मविश्वास हवा असतो, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची सोनेरी स्वने पाहण्याची जी शक्ति सामान्य मनुष्याच्या अंगी यावी लागते, तिला आपला समाज शतकानुशतक मुकला होता.
आपले हे जड सामाजिक मन आणि अत्यंत मंदगति झालेले समाजजीवन लक्षांत घेता, '"किर्लोस्करा''ने सुधारणेचे निशाण हाती घेऊन जे कार्य केले ते मोलाचे होते.हे कार्य करतांना ''किर्लोस्करा'*ची भूमिका केवळ प्रचाराची नव्हती, ती मुख्यत: संस्कारांची होती. तात्विक खंडनमंडनात त्याने स्वत:ला कधीही फारसे गुरफटून घेतले नाही. कारण दैनंदिन जीवन हीच सर्व प्रकारच्या सामाजिक सुधारणेची खरी कसोटी आहे, याची त्याला पूर्ण जाणीव होती. प्रामाणिक मूर्तिपूजक असला हा अंतरंगात मूर्तिपूजक असला पाहिजे. केवळ मूर्तिभंगाच्या क्षणिक आसुरी सुखासाठी तो मूर्तिभंजक होत नाही. सत्याचा तर ''किर्लोस्करा''ला कधीच विसर पडला नाही! त्यामुळे एका बाजूने जीर्ण रुढींवर आणि तत्वशून्य झालेल्या संकेतांवर प्रहार करीत असतांना दुसऱ्या बाजूने नव्या जीवनाची स्वप्ने साकार करण्याचा त्याने मन:पूर्वक प्रयत्न केला. सावरकरांचे
किलॉस्कर मासिकांतील लेखन हे या प्रवृत्तींये सर्वोत्तम उदाहरण आहे.
''किर्लोस्करा''ची सामाजिक सुधारणेची कल्पनाही मोठी व्यापक होती. जीवन हे अनेकांगी आहे, त्यातल्या कोणत्याही अंगाच्या विकासाची उपेक्षा करणे हे अंती समाजाला घातक ठरते, हे लक्षांत घेऊन व्यक्तिजीवन आणि सामाजिक जीवन यांच्या सर्व पैलूंचा परामर्श घेण्याची प्रथा ''कि्र्लोस्कर''ने सुरू केली व ती अखंड पाळली. राजकीय सुधारणा, औद्योगिक प्रगति, शैक्षणिक सुधारणा, ग्रामीण जीवनाची पुनर्घटना इत्यादि विषयांचा ''किर्लोस्करा''ने सतत जिव्हाळ्याने विचार केला. याचे कारण ''किर्लोस्करा''च्या मागे उभ्या असलेल्या शंकररावांनी यंत्रयुगाच्या कर्तृत्वाची व सामाजिक सुधारणेची विशाल क्षितिजे एकाचवेळी पाहिली, हेच होय. नव्या सामाजिक कल्पनांचा आमि जीवनपोषक विचारांचा प्रसार करतांना ''किर्लोस्करा''ने नाना प्रकारच्या रंजक माध्यमांचा आश्रय केला. व्यंगचित्रांपासून प्रवासवर्णनांपर्यंत॑ आणि स्वदेशांतील नामांकित व्यक्तींच्या मुलाखतींपासून परदेशांतील घडामोडींच्या वृत्तांतापर्यंत निरनिराळ्या साधनांनी वाचकांचे रंजन करतांकरतां त्यांचे उद्बोधन करण्याची कला ''किर्लोस्कर'*ला साधली याचे कारण त्याच्या मागे असलेली प्रेरक शक्ति ज्याचे सामाजिक मन पूर्णपणे जागृत झाले होते, अशा एका कलावंताची होती, हे होय.
हा कलावंत जसा विविध चित्रे काढण्यांत कुशल होता, तसा दारिद्रय, अज्ञान आणि धर्मभोळेपणा यांनी ग्रासलेला आपला समाज सुखी, समर्थ आणि संपन्न कसा होईल याची भविष्य काळांतील चित्रे आपल्या मन:चक्षूंपुढे उभी करण्यांतही निपुण होता. कारखान्यातला लोखंडाचा लाल प्रवाही रस पाहतांना जिथे लोखंडासारखी वस्तू विशिष्ट आचीने वितळवितां येते, तिथे समाजांत दृढमूल झालेल्या अपायकारक कल्पनांचे निर्मूलन नव्या विचारांच्या आचीने का करता येऊ नये ही कल्पना या कलावंताला सुचणे स्वाभाविकच होते. त्या कल्पनेचा शंकररावांनी सतत पाठपुरावा केला आणि बुद्धिवादाच्या बैठकीवरून जीवनाच्या सर्व अंगाचा विचार करण्याची शिकवण महाराष्ट्रातल्या अगदी सामान्य माणसापर्यंत नेऊन पोचविली.
Hits: 121