नांगर विक्री ते समाजमंदिर - ५

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

किर्लोस्करवाडी हे आता एक चिमुकले गाब झाले होते, त्यातील वस्ती व कारखान्यांतील कामगार या सर्वांचे मिळून एक विशाल कुटुंब होत जाणे स्वाभाविक होते. त्यांचे परस्परसंबंध एकोप्याचे व गोडीगुलाबीचे असणे अर्थांत आवश्यक होते. काका नुसते कारखानदार नव्हते; तर एक सुधारकही होते. त्यामुळे वाडीमध्ये अस्पृश्यता पाळणे व दारू यावर कडक बंदी होती. पण कोणतेही चांगले काम सर्वांनी मिळून करण्यास त्यांचे जोरदार प्रोत्साहन असे. दिवसभर कामानंतर सुट्टोचा वेळ आनंदात जावा यासाठी माळावर फुटबॉल खेळायला सुरुवात झाली. भरपूर व्यायाम देणारा, खेळायला सोपा. खेळ सुरु झाला कि गावातील माणसे खेळ बघायला यायचो. संध्याकाळी खेळताना छान रंग भरायचा. कोण वरिष्ठ- कोण कारकून याची कुणाला शुद्ध राहणार? काही दिवस जाताच औंधच्या युवराजांकडून क्रिकेट मॅचसाठी आमंत्रण आले. कारखान्यात क्रिकेटची बॅट हातात धरलेले इन मिन तीनच खेळाडू होते. इतरांना क्रिकेट कशाशी खातात हेही माहीत नव्हते. तरी टीम बनवून औंधला गेली. तेथे व्हायचे तेच झाले; पण तरुण मंडळींनी मनावर घेऊन वाडीस परतल्यावर क्रिकेटचा खेळ शिकण्यास सुरुवात केली.

पुढे गणपती उत्सव आल्यावर सामुदायिकरीत्या घडवून आणलेले कार्यक्रम यशस्वी होतात व सर्वांना आवडतात हे दिसून आले. वाडीकरांपैकी कोणीही कधी-नाटकात काम केले नव्हते, तरी तात्यासाहेब केळकरांचे ''तोतयाचे बंड'' हे गाजलेले नाटक करायचे ठरवले. त्यांनी पुस्तकाची एक प्रत व प्रयोग करण्याची परवानगी दिल्याचे कार्ड पाठवले होते. स्त्री पात्रांची कामे अंतोबा, शंकरराव ओगले यांनी पत्करली.

नाटक करण्यासाठी मोल्डिग शेडमधील वाळू बाजूस करून थिएटर तयार केले. भाऊरावांनी गावोगाव पत्रके औंधहून राजेसाहेब, कोल्हापूरहून भास्कराव जाधव अशी बडी नाटक पाहायला आली. नवख्यांचे नाटक असूनही नाटक रंगले खूप . श्रीमंतांनी व काकांनी सर्वांच्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली. पुढील एका वर्षी धुंडीराज फाळके त्यांचे चित्रपट घेऊन गणपती उत्सवाचेवेळी वाडीस आले. 'राम-रावणाचे युद्ध', 'मारुतीचे उड्डाण' असे पाहून लोक देहभान विसरले.

मनोरंजनाचे असे कार्यक्रम मोल्डिंग शेडमध्ये करण्याने कामाचा खोळंबा होतो हे खरेच होते. तेव्हा सर्वानी एकमत करून इमारतीच्या सामानाची तरतूद कारखान्याने केली तर आम्ही श्रमदानाने थिएटर बांधू अशी कल्पना काढली'' ही सूचना काकांनी लगोलग मान्य केली. कुणाला खरे वाटो - न वाटो, अस्तन्या सावरून दीड-दोनशे मंडळी कामाला लागली आणि वीस दिवसांत वाडीत समाजमंदिर उभे राहिले. कोल्हापूरच्या बाबुराव पेंटरांनी पडदे, विंगा, दर्शनी चौकटी करण्यास मदत केली. त्याचे उद्घाटन थोरल्या जांभेकर आत्याबाईच्या हस्ते झाले. पुढे बालगंधर्वापासून अनेक प्रमुख नाटक कंपन्यांची नाटके किर्लोस्करवाडीमध्ये याच समाजमंदिरात झाली.

प्रत्येकजण समाजमंदिरातील स्टेजची तोंड - भरून प्रशंसा करीत असे. वाडीच्या सर्व कार्यक्रमांना याच समाजमंदिराचा उपयोग होऊ लागला. युद्ध संपल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत किर्लोस्कर कारखान्याला भागभांडवलाची जोड मिळाली, तर अधिक विकासाची संधी होती, म्हणून कंपनी लिमिटेड करायचे ठरले. त्यासाठी बरीच स्टेशनरी छापावी लागणार म्हणून मुंबईस जाऊन छपाईसाठी चंडलर कंपनीचे एक ट्रेडल व अक्षरांचे खिळे वगैरे सामुग्री आणली. छपाईच्या कामात कारखान्यातील गणपतराव विजापुरे यांची शंकरभाऊंना मदत मिळाली. या निमित्ताने छापण्याची सोय झाल्यावर नियमित मासिक काढणे खूपच सुलभ झाले. शंकरभाऊंना वाटे, मासिकामुळे आपल्या कारखान्याला प्रसिद्धी तर मिळेलच; पण त्याच्या सहाय्याने आपणास थोडी सामाजिक जागृतीही करता येईल.

Hits: 87
X

Right Click

No right click