प्रारंभ
आपण बहुतेक सर्व माणसे पोटपुजेपुरते कष्ट करत कालच्यासारखी आजच्या दिवसाची आपल्या जीवनाची होडी वल्हवित राहतो; पण होडी योग्य दिशेने जावी यासाठी सुकाणू धरलेला नाविक सर्वांना सांभाळीत असतो.
' आपण तरला हे नव्हे नवल लोकांशी तारील तोची ज्ञानी!'
या संतवचनाप्रमाणे समाजाचे सुकाणू सांभाळण्याच्या विचाराची माणसे जन्मतात. १९२० मध्ये येणाऱ्या औद्योगिक युगास आवश्यक अशी प्रयत्नवादी, आत्मविश्वासू आणि आधुनिक विज्ञानदृष्टोची माणसे घडविण्यासाठी शंकरराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर मासिकातून उद्योग, उत्साह, आत्मोन्नती, विचारसरणी महाराष्ट्रास दिली आणि पुढे मोठी औद्योगिक कामगिरी केली. त्यांचे हे चित्र आजच्या वाचकांनासुद्धा या ध्येयाची प्रेरणा देईल असा विश्वास वाटतो.