निवेदन
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणत: शंभर ते सव्वाशे पानांची सुबोध मराठी भाषेत चरित लिहून ती ''महाराष्ट्राचे शिल्पकार'' या योजने अंतर्गत पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील ''उद्योग उत्साहाचे जनक श्री. शंकरराव किर्लोस्कर'' हा सहावा चरित्रग्रंथ आहे.
आधूनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या दिवंगत व्यक्तींचं मोलाचं योगदान आहे त्या व्यक्तिपैकी श्री. शंकरराव किर्लोस्कर हे एक आहेत.
शंकररावांचं व्यक्तिमत्व एखाद्या खळाळत्या प्रवाहाप्रमाणं आहे. ''उद्योग उत्साहाचे जनक'' हे अन्वर्थक नाव लेखिकेनं या चरित्रग्रंथाला दिलेलं आहे.
शंकरराव हे व्यवहारी असूनही ध्येयवादी होते. कलावंत असूनही यंत्रप्रेमी होते. तत्त्वनिष्ठा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष होता. '' 'किर्लोस्कर' 'स्त्री' आणि 'मनोहर' अशी तीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांची व्यासपीठे निर्माण करणे ही शंकरभाऊनी मराठी माणसाला दिलेली फार मोठी देणगी आहे.
मराठी माणसांचे विचारचक्र गतिमान ठेवण्याच्या कार्यात त्यांचे स्थान मोठे आहे.'' असे त्यांच्या संदर्भात पु. ल. देशपांडे यांनी काढलेले उद्गार अथवा ''किर्लोस्कर नांगर माहित नाही असा शेतकरी आणि किर्लोस्कर मासिक माहित नाही असा साक्षर महाराष्ट्रीय माणूस मुद्दाम शोधायला गेले तरी सापडणे कठीण, अशी आज जी वस्तुस्थिती आहे, तिचे बरेचसे श्रेय आपल्या कर्तबगारीलाच आहे.'' हा त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रातील मजकूर महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा किती मोठा वाटा आहे, ह स्पष्ट करणारा आहे.
श्रीमती शांता किर्लोस्कर यांनी या चरित्रग्रंथात शंकरराव किर्लोस्कर यांच्या व्यक्तिमत्वाचे घडविलेले मनोज्ञ दर्शन मराठी वाचकांना आवडेल, प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे.
रा. रं. बोराडे
मुंबई, अध्यक्ष,
दिनांक : ८ मे, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ