४. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन - ४
ज्या वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मान्य झाला त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकीत एस्. एम्: म्हणाले, 'आपली मागणी केवळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे' अशी नव्हती. आपली मागणी 'मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशी होती, याचा आपल्याला विसर पडता कामा नये असे मला वाटते. आपण तडजोड न स्वीकारता आपल्या संपूर्ण मागणीचा प्रश्न आत्ताच धसाला लावावा, अशी माझी भूमिका आहे. कर्नाटक राज्यात ज्या मराठी
भाषिकांना सक्तीने घालण्यात आले आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईपर्यंत आपण तडजोड स्वीकारू नये.' परंतु एस्. एम्. यांच्या या भूमिकेस संयुक्त महाराष्ट्र समितीत पुरेसा पाठिंबा मिळाला नाही, एस्. एम्. जीव तोडून सांगत होते की आपण आत्ता या प्रश्नाचा निकाल लावून घेतला नाही तर कदाचित तो दीर्घकाळ लोंबकळत पडेल आणि सीमा भागातील आपल्या बांधवांची आपण प्रतारणा केली, असे होईल. परंतु त्यांचे म्हणणे त्या वेळी कोणी ऐकले नाही.
यशाचे श्रेय मराठी माणसांना
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल एस्. एम्. यांचा गौरव करणारे उद्गार बँ. जयकर यांनी काढले. त्या वेळी एस्. एम्. म्हणाले, 'आमच्या यशाचे खरे मानकरी महाराष्ट्रातील लोक आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे, त्यागामुळे हा लढा यशस्वी झाला. शिवाय आचार्य अत्रे यांची लेखणी तलवारीसारखी प्रतिपक्षावर तुदून पडत होती. समितीतील भाई डांगे, उद्धवराव पाटील आदी सहकाऱ्यांमुळेच आम्ही संयुक्तपणे लढा दिला.' समितीच्या अंतर्गत वादांचा एस्. एम्. यांनी कधी उल्लेखही केला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील काँग्रेसजन, " यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणला," असे म्हणू लागले. एका वृत्तपत्राने एस्. एम्.ना याबद्दल विचारले असता ते फक्त हसले आणि म्हणाले, "सत्याची जाहिरात करावी लागत नाहो!" एस्. एम्. जोशीचे हे आत्मविश्वासपर उद्गार अहंकाराने काढलेले नव्हते. ते एका भाषणात म्हणाले, "प्रत्येक चळवळीला नेता लागतो. संयुक्त महाराष्ट्रांच्या लढ्यात भाई डांगे, आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, मी आणि समितीच्या कार्यकारिणीतले आमचे सहकारी संवुक्तपणे नेतृत्व करीत होतो. त्याचबरोबर लोकांनी आम्हांला उत्स्फूर्तपणे प्रचंड पाठिंबा दिला म्हणून आमचे नेतृत्व प्रभावी ठरले.
मराठी जनतेने संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली लढून संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणला. सिंहासनावर कोण बसले आहे याचे मला महत्त्व वाटत नाही.' एस्. एम्.च्या उद्गारांना प्रचंड टाळ्या देऊन श्रोत्यांनी प्रतिसाद दिला. परंतु सत्तेच्या राजकारणात सिंहासनाला, खुर्चीला महत्त्व असतेच. यशवंतराव घव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. सुरवातीस त्यांनी ग. त्र्यं. माडखोलकरांना उत्तर देताना आपली व्यापक भूमिका स्पष्ट केली. यशवंतराव म्हणाले की, 'महाराष्ट्र हे सर्व मराठी जनतेचे राज्य असेल. महाराष्ट्र कधी संकुचित होऊ शकणार नाही, हे स्पष्ट करून वशवंतराव चव्हाणांनी माडखोलकरांच्या 'महाराष्ट्र' 'हे मराठ्यांचे राज्य असेल का? या खोडसाळ प्रश्नाचा खरपृस समाचार घेतला. यशवंतराव हे कुशल प्रशासक आणि मुत्सद्दीही होते. १९५७च्या निवडणुकीनंतर ट्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी विरोधी नेत्यांशी आणि आमदारांशी सौजन्याने वागून स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले. १९६० नंतर मात्र त्यांनी धूर्तपणे सत्तेच्या राजकारणातील डावपेच खेळण्यास सुरुवात केली. 'महाराष्ट्राचे भविष्य घडवताना मला कर्तबगार सहकारी हवेत. बहुजन समाजातील कर्तबगार व्यक्तींनी विरोधाचे नकारात्मक राजकारण करण्याऐवजी सत्तेत सहभागी होऊन महाराष्ट्राचे हित साधावे' असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आणि शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांमधील यशवंतराव मोहिते, रामभाऊ तेलंग, भाऊसाहेब शिरोळे आदी अनेक तडफदार कार्यकर्ते विरोधी पक्ष सोडून काँग्रेस पक्षात गेले.
राजकारणाचे बदलते रंग
१९५७ च्या निवडणूकोत संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे एस्. एम्. जोशी यांनी बाबुराव सणस यांच्यासारख्या लोकप्रिय काँप्रिस उमेदवारावर नेत्रदीपक विजय मिळविला होता. परंतु १९६२ ला सर्व चित्र पालटले होते. १९५७ साली शुक्रवार पेठेत एस्. एम्.च्या प्रसार मोहिमेतील एक नेते, स्वातंत्र्य चळवळीत एस्. एम् बरेबर कार्य केलेले कार्यकर्ते आणि एक वर्षांपूर्वीच समाजवादी पक्षातर्फे पुण्याच्या महापौरपदी निवडून आलेले नगरसेवक रामभाऊ तेलंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि काँग्रेसने त्यांनाच एस्. एम्. जोशींविरुद्ध उभे केले होते. निवडणूक चुरशीवी झाली आणि रामभाऊ तेलंग हे एस्. एम्.चा पराभव करून निवडून आले. अनेकांना मोठा धक्का बसला. नानासाहेब गोरेही लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि काँग्रेसचे शंकरराव मोरे निवडून आले. एस्. एम्. आणि गोरे यांच्या पराभवामुळे
समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना फार दु:ख झाले.