३. फावडे, तुरुंग आणि मतपेटी - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे


तुरुंग आणि मतपेटी

यानंतर काही दिवसांनी अन्नधान्यावी टंचाई, शिधावाटप केंद्रातून मिळणारे खराब धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव यांविरुद्ध एस्‌ एम्‌. यांनी सत्याग्रह करण्याचे ठरविले. मे महिन्यात झालेल्या या सत्याग्रहाचे नेतृत्व एस्‌. एम्‌. वांनी केले. आणि महाराष्ट्रभर हा सत्याग्हह गाजला. अनेक स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांनी या सत्याग्रहात भाग घेतला. एस्‌. एम्‌. यांना दोन महिन्यांची शिक्षा झाली. यानंतर काहच दिवसांनी पुण्यातून शुक्रवार पेठ वॉर्डातून विधानसभेवर निवडून गेलेल्या बाबासाहेब घोरपडे यांची लोकसेवा आयोगावर नियुक्ती झाल्यामुळे वा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. समाजवादी पक्षातर्फे एस्‌. एम. जोशी यांना उभे करण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार थोर शिक्षणतज्ज्ञ बाबुराव जगताप हे होते. निवडणूक जाहीर होऊन एस्‌. एम्‌. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी त्यांची प्रकृती बरी नव्हती. ती अधिकच बिघडली आणि एस्‌. एम्‌. यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एस्‌. एम्‌. स्वत: प्रचारासाठी नसताना समाजवादी पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी नेटाने प्रचारकार्य केले आणि एस्‌. एम्‌. विजयी झाले. एस्‌. एम्‌. यांच्या या विजयानंतर समाजवादी पक्षाचे थोर विचारवंत नेते डॉ. लोहिया त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पुण्यामध्ये आले. अभिनंदनासाठी जमलेल्या कार्यकर्त्याच्या सभेत डॉ. लोहिया म्हणाले, 'मी मे महिन्यात समाजवादी पक्षाच्या पंचमढी येथील अधिवेशनात असे म्हणालो होतो की, भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी आपल्याला फावडे, तुरुंग आणि मतपेटी असा त्रिशूल वापरावा लागेल, एस्‌. एम्‌. जोशी यांनी सानेगुरुजी सेवापथक सुरू करून शेकडो तरुणांना फावडे वापरून विधायक काम करायला लावले. धान्य भाव वाढीच्या विरोधात सत्याग्रह करून एस्‌. एम्‌. अनेक कार्यकर्त्यांना घेऊन तुरुंगात गेले आणि या पोटनिवडणुकीत लोकशिक्षण करून मतपेटीद्वारा ते लोकप्रतिनिधी झाले. म्हणजे मी सांगितलेला त्रिशूल एस्‌. एम्.ने प्रभावीपणे वापरला. मी मांडलेला विचार एस्‌. एम्‌.यांनी साकार केला. या त्रिशूलाबद्दल आज आपण त्यांचा गौरव करीत आहेत. समाजवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा त्रिशूल वापरून नवभारताची निर्मिती करावयाची आहे.

प्रकृती सुधारताव एस्‌. एम्.नी आमदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी विधानसभेत अनेक प्रश्‍न विचारून सरकारला धारेवर घरले. त्या वेळचे महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, एस्‌. एम्‌. यांना म्हणाले, 'एस्‌. एम्‌., तुम्ही इतके प्रश्‍न आणि तेही ग्रामीण भागातले - अगदी दुर्गम अशा खेड्यातले, विचारता याचं मला आश्चर्यच वाटतं.' एस्‌. एम्‌. जोशी सतत दौरे करीत.साने गुरुजी सेवापथकामुळे ग्रामीण भागातील तरुण कार्यकतें त्यांना फार मानीत आणि्‌ त्यांच्या अडचणीही ते सांगत. त्यामुळेच त्यांच्याबद्दलचे प्रश्‍न विचारणे एस्‌. एम्‌. यांना शक्‍य झाले. हे हिरे यांना कसे समजणार? त्या वेळीही अंदाजपत्रकात 'मुख्वमंत्री निधी, असे. मुख्यमंत्र्यांना जनतेला साहाय्य करण्यासाठी अनामत म्हणून कुठलाही तपशील न देता, प्रचंड रक्‍कम देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यास एस्‌. एम्‌. यांनी आक्षेप घेतला. त्यावेळचे विधानसभेचे सभापतो नानासाहेब कुंटे यांनी हा आक्षेप मान्य केला आणि अंदाजपत्रकातील ही मागणी वगळावयास सांगितली. हा विरोधी पक्षाने मिळविलेला विजय होता. एस्‌. एम्‌. यांच्या दक्षतेमुळे हे घडू शकले.

एस्‌. एम्‌. विधानसभेचे अधिवेशन संपल्यांवर समाजवादी पक्षातील कार्यकर्त्याचे बौद्धिक घेताना म्हणाले, विधानसभेत काही आमदार उत्तम वक्ते होते. काही आमदारांनी कामकाजांच्या नियमांचा अभ्यास केला असल्यामुळे त्यांना लक्षवेधी सूचना, हक्कभंग आदी संसदीय आयुधे प्रभावीपणे वापरता येतात. मी सभागृहाचे नियम नीट वाचले होते. परंतु तेवढ्यावर माझे समाधान नव्हते. तुमच्यामार्फत माझा चळ्वळीशी जो संबंध होता त्याचे प्रतिबिंब माझ्या असेंब्लीतील कामात उमटले. विधानसभेतील कामकाज म्हणजे नुसती भाषणे, चर्चा नाही. तो राजकीय चळवळीचा सत्ता-संघर्षाचा भाग आहे. हे मी कधी विसरलो नाही. असेंब्लीतील काम आणि जनतेतील चळवळी यांचा अतूट संबंध आहे. तुम्ही समाजवादी कार्यकर्ते संघर्ष करता म्हणून मी विधानसभेत यशस्वी होतो. यशाचे मानकरी तुम्ही आहात. अन्यायाविरुद्ध लढणारी जनता हीच खरी यशाची मानकरी आहे' या भूमिकेमुळेच एस्‌. एम. आमदार म्हणून प्रभावी झाले.

Hits: 101
X

Right Click

No right click