३. फावडे, तुरुंग आणि मतपेटी - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी भारतात अस्थिरता होती. फाळणीच्या वेळच्या भोषण रक्तपातामुळे लक्षावधी नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे जनता कमालीची अस्वस्थ ह्येती. या कालखंडात भारतातील संस्थानिकांपैकी अनेकांची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेस विरोधी होती. परंतु सरदार पटेल हे केन्द्रशासनात गृहमंत्री होते. त्यांनी संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणले. याच काळात काश्मीरवर पाकिस्तानने हल्ला केला. परंतु भारतीय सेना आणि काश्मीरची जनता हे एकत्र आल्यामुळे पाकिस्तानचा काश्मीर जिकण्याचा दुष्ट हेतू साध्य झाला नाही. त्या वेळी संपूर्ण काश्मीर भारतीय लष्कराला जिंकणे सहज शक्य होते. परंतु पंतप्रधान पं. नेहरूंनी युद्धबंदी स्वीकारली आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्याच ताब्यात गहिला, या सर्व प्रचंड उलवापालथी होत असताना एस्‌. एम्‌. आणि त्यांचे सहकारी फार अस्वस्थ होते. परंतु ते कोणत्याही सत्तास्थानावर नसल्यामुळे देशापुढच्या विविध समस्यांबाबत भाषणांतून आणि लेखांतून मते मांडणे इतकेच त्यांना शक्‍य होते.

म. गांधींची हत्या

कलकत्यामध्ये ज्या वेळो हिंदू आणि मुसलमान यांच्यात भीषण दंगल झाली त्या वेळी गांधीजी तेथे गेले आणि खूप प्रयत्न करून त्यांनी दंगल शमवली. १५ ऑगस्टला ज्या वेळी देशभर स्वातंत्र्यदिनानिमित्त जल्लोष सुरू होता त्या येळी गांधीजी कलकत्त्यातील एका झोपडपट्टीत रहात होते. तेथील दंगल त्यांनी थांबविली होती. तरी त्यांचे अंत:करण विदीर्ण झाले होते. देशाची फाळणी आपण टाळू शकलो नाही, हा त्यांना व्यक्तिश: त्यांचा फार मोठा पराभव वाटत होता. त्यांचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे स्वप्न भग्न झाले होते, तरीही हे ऐक्य भारतात घडवून आणण्याचा गांधीजींचा निर्धार कायम होता. हिंदुत्ववादी पक्ष आणि कार्यकते मात्र फाळणीवद्दल गांधीजींनाच सर्वस्वी जबाबदार धरीत होते. म. गांधींच्या विरोधी ही भावना महाराष्ट्रात पराकोटीला पोहोचली होती.

अखेर याचा स्फोट होऊन नधुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ला म. गांधींवर दिल्लीत गोळ्या झाडून त्यांची ते प्रार्थनास्थळाकडे जात असताना, हत्या केली. एस्‌. एम्‌. जोशींना आणि त्याच्या सहकाऱ्यांना ही बातमी ऐकून जबरदस्त धक्का बसला. हिंदुत्ववादी मंडळींच्या विरुद्ध महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला आणि अनेक ठिकाणी त्यांची घरे जाळण्यात आली. या वेळी राष्ट्र सेवादलातोल अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यानी जाळपोळ थांबविण्याचे प्रयत्न केले. सिद्धप्पा रानगे या एस्‌. एम्‌.जोशींच्या निष्ठावान अनुयायाने कोल्हापूरला स्वत:चा जीव धोक्यात घालून काही हिंदुत्ववादी व्यक्तींचे प्राण आणि घरे वाचविली. एस्‌. एम्‌, जोशी यांनी त्या वेळी शहर सेवादलाच्या कार्यकत्यांसमोर बोलताना म. गांधींच्या हत्येचा तीव्र निषेध केला. तो करणार्‍या गोडसेंच्या रूपाने जी विकृत दुष्ट मनोवृत्ती व्यक्त झाली तिच्यावरही कठोर टीका केली आणि त्याचजरोबर जाळपोळीचाही निषेध केला. निरपराध व्यक्तींना वाचविण्यासाठी कोल्हापूरच्या सिद्धप्या रानगेने आणि महाराष्ट्रातील राष्ट्र सेवादलाच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जे काम केले त्याबद्दल एस्‌. एम्‌. यांनी समाघान आणि अभिमान व्यक्त केला. साने गुरुजींनी या वेळो एकवीस दिवस उपोषण केले, तेव्हा एस्‌. एम. म्हणाले, 'साने गुरुजींच्या भावनेची तीव्रता आणि त्यांनी आत्मशुद्धीसाठी केलेले उपोषण यामुळे मी अंतर्मुख झालो. साने गुरुजींच्या उपोषणातून राष्ट्र सेवादलातील आम्हां सर्वांच्याच भावना व्यक्त झाल्या. त्यांनी आत्मक्लेषाचा जो मार्ग स्वीकारला त्यामुळे माझ्या मनातील किल्मिष धुवून गेले. आमच्या मनाला शुचितेचा पवित्र स्पर्श झाला.'

Hits: 105
X

Right Click

No right click