६. संक्रांतीचे तीळगूळ
Parent Category: मराठी पुस्तके
Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता
Written by सौ. शुभांगी रानडे
६. संक्रांतीचे तीळगूळ
(वसंततिलका)
सुप्रेम योजुनि वरा तिळ शुभ्ररागें ।
पाकोनियां सुसहवास रसांत आंगे ॥
मित्रत्व-अंकुर फुटे सहजी सुयोगें ।
सौजन्य-केशर पुढें मग फार रंगे ॥१ ॥
संक्रांति-क्रांति घडतां सण हा अुदेला ।
आनंद नंदनवनासम येथ झाला ॥
पत्रा सुपात्र गणुनी कविता-वधूला ।
आज्ञापिलें तिळगुळा तुज अर्पिण्याला ॥ २ ॥
ह्या आदरा, अुपरि प्रेम असेंच ठेवा ।
होवो सशास्त्रगुण ह्यां मन हाचि ठेवा ॥
श्री राजश्रेष्ठ शिवकीर्तीरसास सेवा ।
जेवा यथेष्ट न असा अितरत्र मेवा ॥३ ॥
हे श्लोक संक्रांतिनिमित्त एका मित्रास धाडले होते.
३०-१-१८९९