लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Written by सौ. शुभांगी रानडे

शेतकरी आणि गिरणीकामगारांची दु:खे पाहिलेल्या, भोगलेल्या अण्णा भाऊंना साम्यवादी विचार आपलासा वाटणे स्वाभाविकच होते. दलित-शोषित-पीडितांना माणूस म्हणून ताठ मानेने जगायला शिकविणारे हे नवे तत्वज्ञान अण्णा भाऊंना इतकं भावले की, अखेरपर्यंत त्यांनी त्याची कास सोंडली नाही. स्तालिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनीजनांची मुक्तिसेना, लेनिन शुभनामाचे गाऊ गान या साऱ्यांमधून त्यांनी साम्यवादाची मुक्त आणि मन:पूर्वक स्तुती केली. 'आपली प्रतिभा त्यांनी साम्यवादाच्या प्रचारासाठी राबविली अशी टीका अण्णा भाऊंवर नेहमीच झाली. परन्तु कविमनाला जे भिडते त्याचीच अभिव्यक्ती त्याच्या काव्यातून घडते, हे कसे नाकारता येईल? *मोले घातले रडाया' पद्धतीचा प्रचार आणि आंतरिक ऊर्मीतून उचंबळून आलेली कलाकृती ह्यातील जमीनअस्मानाचा फरक लक्षात येत नसेल तर तो साहित्याचा आस्वादक कसला?

साम्यवादाचे निस्सीम उपासक असलेल्या अण्णा भाऊंनी साऱ्या जगातील कामगारांनी, दलित-पीडित-शोषितांनी एक व्हावे या घोषणेचा उद्घोष करीत असतानाच आपले जाज्वल्य देशप्रेमही धगधगते ठेवले होते हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यावरील त्यांचे मन:पूर्वक प्रेम त्यांच्या साहित्यात जागोजागी उमटले आहे. महाराष्ट्र देशा अमुच्या, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, महाराष्ट्राची परंपरा या केवळ नावांवरूनही ते दिसून येईल. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड, उंबरगाव, डांग, हा सीमाभाग महाराष्ट्राला दुरावणार, कदाचित मुंबईही वेगळी. काढली जाणार ही व्यथा त्यांचे काळीज पोखरीत होती, या व्यथेतून जन्मली एक अप्रतिम लावणी -

माझी मैना गावाला राहिली ।
माझ्या जिवाची होतिया काहिली ॥

तरुण, सुंदर, गुणी पत्नी दूर गावाला राहिल्यामुळे, तिच्या विरहाने जळणारा गिरणीकामगार पती हा प्रत्यक्षात मुंबईला, सीमाभागाला दुरावणारा महाराष्ट्र होता.

मुंबईचे अंतरंग जाणून घेतलेल्या अण्णा भाऊंच्या डोळ्यांना दिसलेली मुंबई फार वेगळी आहे. पठ्ठे बापुरावांना 'मुंबी नगरी बडी बांका' वाटली, 'हे मुंबई बंदर, सगळ्यात सुंदर' अशी ग्वाही त्यांनी दिली,

परंतु अण्णांच्या कारुण्यमयी दृष्टीला मुंबईच्या लावणीत दिसली ती मुंबई अशी -

मुंबईत उंचावरी । मलबार हिल. इंद्रपुरी । कु्बेरांची वस्ती तिथे सुख भोगती ॥
परळांत राहणारे । रात्रंदिवस राबणारे । मिळेल ते खाऊनी घाम गाळती ॥

ही विषमता त्यांचे हृदय हेलावून टाकीत होती. जो श्रम करून, घाम गाळून मुंबईला भारताची आर्थिक राजधानी बनवितो, त्याच्या नशिबी अर्धपोटी राहणे यावे हा दैवदुर्विलास त्यांना मुंबईत प्रकर्षाने जाणवला; म्हणूनच या 'तळहातावर पृथ्वी पेलणाऱ्या समर्थ हातांना संघटित करणारे साम्यवादी तत्त्वज्ञान त्यांना मोहवून गेले. कष्टकऱ्यांनी, शेतकरी-कामगारांनी एक होऊन आपले सामर्थ्य वाढवावे, आपले न्याय्य सुख मिळवावे ही त्यांची तळमळ त्यांच्या अनेक गीतांमध्ये प्रतिबिंबित झाली.

दौलतीच्या राजा । उदूनि सरजा ।
हाक दे शेजाऱ्याला रे । शिवारी चला ॥
किंवा
'पूर्वेला आली जाग",'रवि आला लावुनी तुरा', 'दुनियेची दौलत सारी' यासारख्या अनेक मधुर गीतांनी १९५०-६० या दशकाच्या सुमाराला सार्‍या महाराष्ट्रात लोकप्रियता मिळविली होती, ती केवळ नादमाधुर्यामुळे नव्हे, तर त्यातील विचार जनतेला आपले वाटले म्हणून.

Hits: 146
X

Right Click

No right click