लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ३
शाहीर अमर शेख यांनी आपल्या या परममित्राच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात अण्णा भाऊंसंबंधी मांडलेले विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. "तसे पाहता आद्य शाहीर अगीनदास तुळशीदासापासून सगनभाऊ तो तहत आजच्या अनेक शाहिरांपर्यंत पोवडेकार झाले.
मग अण्णा भाऊंनी यात काय ते वेगळेपण दाखवलं? शाहिरी जीवन हा महाराष्ट्राला दिलेला अमोल नजराणा अण्णा भाऊंनी सार्थकी लावला. पोवाड्यांतून नुसती वर्णनं कडून वाडवडिलांनी केलेल्या कहाण्या पद्यरूप ऐकविणे हे शाहिराचे काम नाही, तर शाहिरानं जनमन सागरात सर्वभर संचार करून नव्हे, तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन त्यात चाललेल्या भावनोद्रेकांचा आविष्कार आपल्या लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त
करून अथवा जनमानस हेलावूनच नव्हे तर् त्या सागराच्या कणाकणाला ऊब देऊन, त्याच्या लाटांवर आरूढ होऊन गगनालाही गवसणी घालावी, तोच मराठी शाहीर. ही उक्ती सार्थ करणारे अण्णा भाऊ हे एकमेव शाहीर होते.”
-
अण्णा भाऊंचे साहित्य, इथे मुख्यत: पोवाडे, वाचताना जाणवते की, अण्णा भाऊंनी हिंसाचार-अत्याचार यांचा नेहमीच धिक्कार केला आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर पंजाब-दिल्ली येथे भडकलेल्या जातीय दंग्यावर रचलेल्या पोवाड्यात ते म्हणतात,
माणुसकी पळाली पार । होऊनी बेजार / पंजाबातून ॥
सूडाची निशा चढून । लोक पशुहून । बनले हैवान ॥
माणुसकीच्या या हत्येने विषण्ण झालेले अण्णा भाऊ कळवळून सांगतात -
द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला ।
आवरोनि हात आपुला ।
भारतीयांनो इभ्रत तुमची इर्षेला पडली ।
काढा बाहेर नौका देशाची वादळात
शिरली ॥ घरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली ।
काढा बाहेर राष्ट्रनौका ही
वादळात गेली ॥
शेवटी भारतवासीयांना आवाहन करतात -
तू उठ आता सत्वर । हे तुडवून दंगेखोर ।
म्हणे अण्णा साठे शाहीर ।
सावरून धर ।
तुझी तू शांतिध्वजा सत्वर ॥
'शाहिरांनो' या गीतातही शेवटी अण्णा म्हणतात -
सुखशांतीचा पोवाडा, गांजल्यांना ऐकवा ।
जाऊ द्या ती खोल खाली
दामिनीसम शाहिरी ॥
म्हणूनच 'खून का बदला खून' हे तत्त्वज्ञान अण्णा भाऊंना कधीच मानवले नाही. “स्वत:वर अन्याय होऊ देऊ नका आणि दुसऱ्यावर अन्याय करू नका' हाच मूलमंत्र त्यांनी जपला. अन्याय्य रूढी नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत ही त्यांची धारणा होती. जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव' म्हणणाऱ्या अण्णा भाऊंना घाव पडायला हवे होते ते दुष्ट रूढीवर आणि त्यातून नवमहाराष्ट्राची निर्मिती व्हायला हवी होती.